
Mumbai News: ‘‘रस्त्यावरील गुंड, मवाली आता थेट विधानभवनात घुसले आणि त्याला फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत,’’ असा गंभीर आरोप करत फडणवीसांनी प्रायश्चित्त म्हणून राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केली.
‘‘विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, असेच म्हणावे लागेल. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, महिला सुरक्षित नाहीत, ड्रग्जचा सुळसुळाट जोरात सुरू आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीकविमा, बेरोजगारी यातील एकाही प्रश्नावर ना सविस्तर चर्चा झाली ना काही निर्णय. हे अधिवेशन लक्षात राहिले ते फक्त विधानभवनाच्या इमारतीत झालेल्या तुंबळ हाणीमारीच्या घटनेने,’’ अशी टीकाही त्यांनी केली.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले, की विधिमंडळ अथवा संसदेत जनता आपले लोकप्रतिनिधी पाठवते, ती त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी. पण अलीकडे हे चित्र बदलत चालले आहे. महाराष्ट्राच्या जनतेने या वेळी असे चित्र पाहिले जे आजपर्यंत या लोकशाहीच्या पवित्र मंदिरात कधीही घडले नव्हते. कालपर्यंत जे रस्त्यावर होत होते ते आज लोकशाहीच्या पवित्र मंदिरात घडले.
जणू कुस्तीच सुरू झाली आहे अशीच ही घटना होती. जे घडले त्याची निंदा करावी तेवढी कमीच आहे, पण ही घटना घडण्यास राज्याचे मुख्यमंत्रीच हे सर्वस्वी जबाबदार आहेत. भाजपने ही नवी संस्कृती जाणीवपूर्वक आणली आहे. अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या मकोकाच्या गुंडाला भाजपचे नेतेच ‘भिऊ नकोस मुख्यमंत्री तुझ्या पाठीशी आहेत’ असे सांगत आहेत.
तर आमदार निवासाच्या कँन्टीनमध्येही एका आमदाराने असेच ‘बॉक्सिंग’ केले. आका, कोयता गँग आता जुने झाले आहे. आमदारांना ‘मवाली’ म्हटले जाते असे मुख्यमंत्री म्हणतात, हे भाजपने जे पेरले तेच उगवले आहे. आणि हा डाव आता भाजपवरच उलटत आहे.
‘सत्तेच्या पिंडीवर विंचू ’
महाराष्ट्राच्या विधिमंडळात जे झाले त्याने जनतेत प्रचंड संताप आहे, पण हे सत्तेच्या पिंडीवर बसलेले विंचू आहेत त्यांना ठेचायची सोय नाही. भाजपने लोकशाही रसातळाला आणून ठेवली आहे. भाजपला लोकशाही व संविधान मान्य नाही पण संस्कृती व परंपरा बुडवण्याचे पाप तरी करू नका. महाराष्ट्राच्या जनतेच्या अंत पाहू नका जनता याचा हिशोब नक्की करेल असा इशाराही हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
‘जनसुरक्षाला सुरुवातीपासून हरकत’
काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून यावर हरकत घेतलेली असून काँग्रेसचा या विधेयकाला विरोध आहे. या विधेयकासाठी नियुक्त केलेल्या समितीतही अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. बजरंग दल, आरएसएस या संघटनांही या कायद्याच्या कक्षेत येतात का, असा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता, त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काही बोलत नाहीत, असे श्री. सपकाळ म्हणाले. काँग्रेसचा या विधेयकाला विरोध आहे आणि विधिमंडळाच्या आत व बाहेरही विरोधच राहील, असेही ते म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.