Agriculture Journalism: कृषी क्षेत्राचा उमगला व्यापक अर्थ

Journalistic Travel Experience: मुकुंद पिंगळे यांच्या ॲग्रोवनमधील पत्रकारितेच्या प्रवासाचा अनुभव शेती क्षेत्राच्या सखोल समजाचे दार उघडतो. शेतकऱ्यांच्या यशकथांच्या माध्यमातून त्यांनी कृषी क्षेत्राला नवा दृष्टीकोन दिला आहे.
Agrowon Anniversary
Agrowon AnniversaryAgrowon
Published on
Updated on

Agrowon Newspaper Success Story: मी ‘ॲग्रोवन’चा नाशिक प्रतिनिधी म्हणून काम करतो. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने आजी-आजोबांसोबत लहानपणी शेतात खेळलो, बागडलो. पुढे वडिलांनी शेतीचा विस्तार केला. त्यामुळे शिक्षण घेत असताना कधी शेतीकामेही केली. पुढे अभियांत्रिकी शिक्षणासाठी परगावी गेलो. अभियांत्रिकी क्षेत्रात मन रमेना, त्यामुळे आवडीच्या पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयाची पदवी पूर्ण केली.

त्यानंतर पदव्युत्तर पदवीसाठी अंतिम वर्षात ‘कृषी पत्रकारिता’ विषय निवडला होता. आमचा भाग कांदा उत्पादक असल्याने ‘‘कांदा लागवड ते अर्थकारण’’ या विषयावर सविस्तर प्रकल्प सादर केला होता. त्यावेळी मांडणी करताना ‘ॲग्रोवन’ माझा सोबती झाला. त्यानंतर कालांतराने ॲग्रोवनमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि कृषी क्षेत्राचा व्यापक अर्थ उमगल्याचा अनुभव येत गेला.

ॲग्रोवनमध्ये काम करताना शेती विषयाच्या अनेक अंगांचा परिचय झाला. पारंपरिक पिकांसह नावीन्यपूर्ण पीकप्रयोग थेट बांधावर जाऊन समजून घेता येतात. आजवर द्राक्ष खरेदी व निर्यात, शासकीय कांदा खरेदी, पीकविमा, सिंचनप्रश्न, बाजार समित्यांमधील गैरप्रकार आदी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे विषय हाताळल्याने शेतकरी आपल्याला हक्काचे समजतात. यशकथांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यासपीठ मिळाले.

Agrowon Anniversary
Agriculture Journalism: शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागल्याचे समाधान

त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळाली, तसेच तालुका स्तरापासून राष्ट्रीय पातळीपर्यंत सन्मान प्राप्त झाले. एखाद्या विषयाच्या खोलात जाऊन बातमी, वृत्तमालिका प्रकाशित होते, तेव्हा लोकप्रतिनिधी त्याची दखल घेऊन विधान भवनात बोलतात. तसेच राजकीय नेते, शेतकरी, अभ्यासक संदर्भ विचारण्यासाठी संपर्क साधतात.

एका बाजूला शेतीचे प्रश्न समजून घेऊन त्यांना वाचा फोडणे आणि दुसऱ्या बाजूला यशोगाथांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणे या दोन आघाड्यांवर काम सुरू आहे. या प्रवासात शेतकरी, कृषी अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ, धोरणकर्ते, राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांच्याशी सातत्याने संपर्क आल्याने अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले, हे पत्रकारितेचे खरे संचयधन आहे. बदलत्या काळात पत्रकारिता आणि पत्रकारांविषयी नकारात्मक बोललं जातं.

मात्र ‘ॲग्रोवन प्रतिनिधी’ असे सांगताच मिळणारा सन्मान सुखावणारा असतो. अगदी लहानपणापासून आठवतं ‘काळया आईचं गाणं, रमलं माझं मन, देवा लेकरांना ठेव आनंदानं'' हे ग्रामीण गीत माझी आजी रेशमाई नेहमी गात असे. कधी सुटीच्या दिवशी बाहेरगावी असलो तरी कुणी मान्यवर, पाहुणा भेटला की शेतीवर चर्चा होते. एखादा नवीन शेतीतील प्रयोग पाहण्यासाठी जातो. हे सर्व आतून येते. ‘ॲग्रोवन’ने कामासोबत शेती-मातीचा आनंद घेत जगण्याची संधी दिली.

Agrowon Anniversary
Agriculture Journalism: शेतीमातीशी जुळण्याचा समृद्ध अनुभव

ॲग्रोवनची द्विदशकपूर्ती हा क्षण सुखावणारा आणि प्रेरणा देणारा आहे. यातील सहा वर्षांच्या प्रवासाचा मी साक्षीदार आहे. या अर्ध्या तपामध्ये माझी खरी जडणघडण झाली. शेती क्षेत्राची जितकी व्याप्ती, तितकेच वेगवेगळे गुंते आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी अनेक जण रस्त्यावर उतरतात. आपणही लेखणीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शेती विकासाच्या चळवळीत असतो ही भावना नेहमी सुखावून जाते. आजवर प्रकाशित झालेल्या अनेक संघर्षमय व प्रेरणादायी यशकथा राज्यभरात गाजल्या.

त्यातील अनेकांना स्थानिक ते राष्ट्रीय पातळीपर्यंत सन्मान प्राप्त झाले. शेतकऱ्यांशी निर्माण झालेले ऋणानुबंध कामासाठी ऊर्जा देतात. कामामुळे प्रेम, सन्मान मिळतो आणि आपल्याकडून अपेक्षा ठेवल्या जातात. आपल्या कामाची ही सर्वात मोठी पावती आहे. या वाटचालीत अनेक दिग्गज मान्यवर मार्गदर्शक म्हणून पाठीशी आहेत. कधी एखादे काम करताना धावपळ होते; मात्र वरिष्ठांपासून सहकाऱ्यांपर्यंत सर्व जण विषय तडीस नेण्यासाठी पाठबळ देतात. ॲग्रोवन हे आमचं जणू एक विस्तारित कुटुंब आहे.

बातम्यांच्या माध्यमातून विषय मांडल्यानंतर सरकारी कामकाजात सुधारणा झाल्याचे अनुभव आले. अनेकांनी सकारात्मक पद्धतीने टीका स्वीकारली, तर कुणी सूचना केल्या. वार्तांकनाच्या निमित्ताने राष्ट्रीय पातळीवर शेतकरी नेते, कृषी शास्त्रज्ञ, कृषी उद्योजक, धोरणकर्ते यांच्याशी चर्चा होते. ते ‘ॲग्रोवन''सारखे वृत्तपत्र इतर भाषांतही सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त करतात. त्यामुळे मराठी भाषेत असलेल्या मात्र कृषी क्षेत्राचा संपूर्ण धांडोळा घेणाऱ्या ॲग्रोवनची व्याप्ती किती मोठी आहे, याची जाणीव होते.

ॲग्रोवनमुळे अनेक पारितोषिके व सन्मान माझ्या वाट्याला आले. ॲग्रोवनमुळेच लेखणी समृद्ध झाली, शेतकऱ्यांचे भरभरून प्रेम मिळाले. कोणी घर बांधलं, वाहन घेतलं किंवा घरात मंगल कार्य असेल तर आवतन थेट घरापर्यंत येतं. अनेकदा शेतकरी, वाचकांशी थेट भेट होत नसते; मात्र वृत्त, यशकथा प्रकाशित झाल्यानंतर फोनवर संवाद हा ठरलेलाच असतो. ॲग्रोवनमध्ये काम करताना आलेले अनेक अनुभव, घटना आणि आठवणी जगणं समृद्ध करून टाकणाऱ्या आहेत.

( : ९८६००६५३५५)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com