
Agricultural Media: गेली १२-१३ वर्षे मुख्य प्रवाहातील तीन-चार दैनिकांत काम केल्यानंतर ‘ॲग्रोवन’सारख्या शेतीला वाहिलेल्या दैनिकात संधी मिळाली तेव्हा पत्रकारितेतील नव्या जगाची कवाडं खुलल्याचं आज मागं वळून बघताना जाणवतं. तसं बघितलं तर शेती, गावगाडा मला नवीन नाही. माझी मुळं तिथलीच आहेत. पण शेती आयुष्याची पार्श्वभूमी असली तरी शेती करणं आणि शेती पत्रकारिता करणं यात मूलभूत फरक आहे. मुंबईत पाय ठेवला तेव्हा मनात गोंधळ होता, की एवढं मोठं शहर आणि या शहरात शेतीचं काय असणार? आणि आपला तग कसा लागणार? मात्र काम सुरू केलं आणि एकेक गोष्ट शिकता आली.
मुख्य प्रवाहातील दैनिकात पत्रकारिता करताना विविध विभागांचे वार्तांकन म्हणजे पत्रकारितेच्या भाषेत बीट कव्हर करता येतात. ती मी केलीही होती. काही काळ संपादनाचं म्हणजे टेबलवरील काम केलं. मात्र आपण पत्रकारितेत काहीतरी विचाराने आलोय आणि ती केल्याचे समाधान मिळालं पाहिजे असं सारखं वाटत होतं. बरीच वर्षे मनात तो संघर्ष सुरू होता. विविध विभागांची पत्रकारिता करताना काही काळ तिथल्या बातम्या देता येतात. पण एखाद्या विषयाचे दीर्घकाळ वार्तांकन केल्यानंतर तुम्हाला नावलौकिक मिळतो तसे व्यक्तिगत आयुष्यातही अनेक बदल होतात. हाती घेतलेल्या विषयाच्या खोलात जाता येते आणि त्या विषयातील कंगोरे तुम्हाला कळत जातात. हाच नेमका बदल माझ्या आयुष्यात ‘ॲग्रोवन’ने आणला.
मी मुंबईत दाखल झाल्यानंतर आधी कृषी, सहकार, जलसंपदा, वित्त, मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो. त्याआधी जिल्हा पातळीवर काम केलं होतं. तिथले अधिकारी आजही चांगले मित्र आहेत. पण मंत्री आणि सचिव, सहसचिव, उपसचिव पातळीवरील अधिकारी कसे व्यक्त होतील, माहिती मिळेल का किंवा एकूणच आपला तग कसा लागेल याचा विचार करून प्रचंड निराशा दाटून आली होती. मात्र माहितीसाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना भेटायचो तेव्हा ॲग्रोवनचं नाव ऐकून सगळे अलर्ट होत.
कृषी, जलसंपदा, मृदा-जलसंधारण, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, वित्त या विभागांबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयांतील अधिकारी यांचे ॲग्रोवनविषयी मत अतिशय सकारात्मक होते. ही माझ्यासारख्या नवख्याला अप्रुपाची आणि दिलासा देणारी गोष्ट होती. निराशेचं परिवर्तन आत्मविश्वात झालं. याचे मुख्य कारण म्हणजे ॲग्रोवनने गेल्या २० वर्षांत कमावलेली विश्वासार्हता हेच होय.
मी ॲग्रोवनमध्ये काम सुरू केल्यानंतर अनेक सुखद अनुभव यायला लागले. विधिमंडळ अधिवेशन असेल तर शेतीच्या विषयांवर आमदार सभागृहात बोलत असत. बोलून झाल्यानंतर लगेच त्यांचे फोन येतात. एवढं ॲग्रोवनमध्ये आलं पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. हा त्यांच्या प्रसिद्धीचा भाग असला तरी त्यांना माहीत आहे, की ॲग्रोवन हे शेतकऱ्यांचं वृत्तपत्र आहे आणि आपण जे बोललो किंवा निर्णय करून घेतला तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारं हे एकमेव माध्यम आहे.
माझं काम मुंबईत आणि आमचं सर्व संपादकीय कामकाज चालतं पुण्यातून. पुण्यातील प्रत्येक सहकारी एकेका विषयाला वाहून घेतलेला. माझ्यापेक्षा कितीतरी अनुभवी. त्यामुळे आपण लिहिलेल्या बातमीची काय चिरफाड होईल आणि ती होऊ नये याची धास्ती कायम ठेवूनच बातमी लिहिण्याकडे माझा कल असतो. अचूक आकडेवारी हे आमच्या ॲग्रोवनचं प्रमुख वैशिष्ट्य.
त्याचा प्रत्यय येतो तो विधिमंडळ अधिवेशनादरम्यान. आमदारांना प्रश्न द्यायचे झाल्यास बहुतांश आमदारांचे पीए फोनवरून आकडेवारी, शासनाने वेळोवेळी जारी केलेले आदेश, केंद्र सरकारच्या आयात-निर्यात धोरणांची माहिती, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत अद्ययावत माहिती, पीकविम्यातील घोळ, नुकसानग्रस्तांच्या मदतीचे अपडेट आदी बाबी जाणून घेत असतात. त्यासाठी त्यांचा सगळ्यात मोठा स्रोत असतो तो ॲग्रोवन. सभागृहात बोलण्याआधी काही आमदार ॲग्रोवनचे जुने अंक चाळून मगच त्यावर आधारित बोलतात.
दोन वर्षांपूर्वी नागपूर अधिवेशनात माझे पुण्यातील सहकारी मनोज कापडे यांनी तत्कालिन कृषिमंत्र्यांची बातमी दिली होती. त्या वेळी सभागृहात विरोधकांनी हल्लाबोल करून त्यांना पळता भुई थोडी केली. त्या वेळी संबधित कृषिमंत्री विधिमंडळाच्या आवारात मी दिसलो तरी ते लांबून जायचे. माझ्या एका सहकाऱ्यामुळे माझाही दबदबा वाढला होता. हल्ली वृत्तपत्रांच्या कार्यालयांत दुर्मीळ असलेलं वातावरण ॲग्रोवनमध्ये अनुभवायला मिळतं. ॲग्रोवन म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेलं दैनिक आहे, असं आमचे वरिष्ठ नेहमी सांगतात आणि ते शंभर टक्के खरं आहे. ॲग्रोवनमधील प्रत्येक सहकारी शेती-मातीशी संबंधित असल्याने शेतीसंबंधी अचूक बातम्यांसाठी ते आग्रही असतात.
माझे महाविद्यालयातील शिक्षक डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणायचे, की सर्व जण पाट्या टाकतात; तर तुम्ही भरून टाका. पत्रकारितेत हल्ली जुबबी माहितीवर बातम्या देण्याकडे कल असतो. पण आपण देणार ती बातमी गावगाड्यातील सामान्य शेतकरी वाचणार आहे, याची जाणीव सतत जागती ठेवून बातमी देण्यासाठीची बांधिलकी असल्यामुळे आमची पाटी भरलेली असते. एका दाण्याचे हजार दाणे करण्याची ताकद असते शेतीत. अशा या समष्टीचे कल्याण साधणाऱ्या शेती क्षेत्राची पत्रकारिता करणे म्हणजे खळ्यातील रास जशी समृद्ध करते तसा आयुष्य समृद्ध करणारा अनुभव आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.