
Rajgurunagar News: कांद्याची मागणी आणि उत्पादन याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे बाजारभाव सतत वर-खाली होत आहे. अन्य पिकांचेही तसेच आहे. ‘ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी’ या उपक्रमाद्वारे उत्पादनाची गरज आणि मागणी यांचा ताळमेळ घालून सांख्यिकीकरणाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे धोरण सरकार ठरवत आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी नुकतीच कृषिमंत्री कोकाटे यांनी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी मंत्री कोकाटे म्हणाले, की आपल्याकडे शेती उत्पादन आणि मागणी यांचा ताळमेळ बसत नाही. मात्र ‘ॲग्रीस्टॅक’ उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांची अचूक माहिती गोळा करणे व शेतकऱ्यांशी संबंधित डेटाबेस तयार करणे हे काम केले जाणार आहे. त्यातून पिकांचे लागवड क्षेत्र समजेल. कोणते उत्पादन पुरेसे झाले आहे आणि कोणते उत्पादन घेण्याची गरज आहे, याचे सांख्यिकीय मार्गदर्शन सरकार करू शकेल.
बाजारभावाच्या अनियमिततेवर नियंत्रण मिळविणे आणि शेतकऱ्यांचा तोटा कमी करणे, यातून शक्य होईल. शेती परवडत नाही असे सातत्याने सांगितले जाते, याची कारणमीमांसा होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे कल्याण व सुरक्षितता यांची जबाबदारी सरकारची आहे. त्यासाठी सरकार शेतीत भांडवली गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सरकार कार्यक्रम ठरवत आहे, असेही कोकाटे यांनी या वेळी सांगितले.
शेतकऱ्यांनी विचारपूर्वक कांदा पिकवावा
शेतकऱ्यांनी विचारपूर्वक कांदा पिकविला पाहिजे. एखाद्याला चांगला भाव मिळाला की सगळेजण कांदाच करत सुटतात. मग उत्पादन वाढते आणि भाव पडतात. त्यासाठी ९ महिने टिकू शकेल अशी कांद्याची जात संशोधकांनी शोधली आहे. तिची लागवड केली पाहिजे. कांद्याच्या आधुनिक चाळी उभारून साठवणक्षमता वाढवली पाहिजे. एकंदरीतच पेरणीपासून ते साठवणुकीपर्यंत नियोजन करून पीक घेतल्यास कांद्यात सारखा सारखा तोटा होणार नाही, असेही मत कोकाटे यांनी व्यक्त केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.