Dam Water Stock : राज्यातील मोठी धरणे अद्याप तहानलेलीच

Dam Water Storage : राज्यातील धरणक्षेत्रांत अद्याप अपेक्षित असा पाऊस नसल्याने कोयना, जायकवाडी, वारणा, उजनी, मुळा, पवना अशा मोठ्या १३८ धरणांत केवळ २५.५३ टक्केच पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
Dam Water Stock
Dam Water StockAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील धरणक्षेत्रांत अद्याप अपेक्षित असा पाऊस नसल्याने कोयना, जायकवाडी, वारणा, उजनी, मुळा, पवना अशा मोठ्या १३८ धरणांत केवळ २५.५३ टक्केच पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हलका ते मध्यम पाऊस झाल्याने नवीन पाण्याची आवक सुरू आहे. मात्र सव्वा महिन्यात मोठ्या धरणांत बुधवारी (ता. १०) सकाळपर्यंत २६१.९७ टीएमसी एवढाच पाणीसाठा झाला आहे.

गतवर्षी या प्रकल्पांत ३० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्या तुलनेत साडेचार टक्क्यांनी पाणीसाठा कमी असून, राज्यातील धरणे पाण्यासाठी अद्याप तहानलेली असल्याचे चित्र आहे.

मॉन्सून दाखल होऊन जवळपास महिना लोटला आहेत. सव्वा महिन्यात राज्यातील सर्व धरणांत नव्याने एकूण ६१ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. यामध्ये उजनी, कोयना, वारणा, दूधगंगा, राधानगरी, भातसा, मांजरा, तेरणा, येलदरी, गोसी खुर्द, भंडारदरा, डिंभे, पानशेत, मुळशी, वीर, भाटघर या प्रमुख धरणांतील पाणी पातळीत दोन ते १२ टीएमसीपर्यंत वाढ झाली आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास धरणांतील पाण्याच्या आवकेत आणखी वाढ होऊन पाणीसाठा वाढण्यास मदत होईल.

Dam Water Stock
Dam Water Stock : धरणांत नव्याने ३५.५४ टीएमसी पाण्याचा येवा

जलसंपदा विभागाकडे लहान, मध्यम व मोठे असे एकूण तब्बल दोन हजार ९८९ प्रकल्प आहे. या प्रकल्पाची उपलब्ध पाण्याची क्षमता ही सुमारे १४२२.१२ टीएमसी एवढी आहे. यंदा तीव्र उन्हाळ्यामुळे राज्यात पाण्याचे बाष्पीभवन आणि पाणी वापरही वाढल्याने मे अखेरीस तब्बल ५० हून अधिक धरणांनी तळ गाठला होता. विशेषतः, यात बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, बुलडाणा जिल्ह्यांतील धरणांचा समावेश असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला होता.

पश्‍चिम महाराष्ट्रातही पाणीटंचाईची चांगलीच झळ बसली. मे अखेरीस उपयुक्त पाणीसाठा ३२६ टीएमसी म्हणजेच २२.८३ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. यंदा हवामान विभागाने १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

त्यानुसार सात जूनच्या दरम्यान मॉन्सून दाखल झाला होता. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. परंतु मागील आठवड्यापासून कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा वाढला. आतापर्यंत काही धरण क्षेत्रांत जोरदार पाऊस पडला असला तरी बहुतांश धरणक्षेत्रात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.

Dam Water Stock
Dam Water Stock : महिनाभरातच धरणांत १६.४१ टीएमसी पाण्याचा येवा

सध्या १ जून ते ९ जुलै या काळात राज्यातील एकूण प्रकल्पांमध्ये सुमारे ३८७.३९ टीएमसी (१०९७२.९६ दशलक्ष घनमीटर) म्हणजेच सरासरी २७.०९ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात ३२.२१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी पाणीसाठा कमी आहे. मागील आठ दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी कमीअधिक स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी योग्य असला तरी धरणांतील पाणीपातळीत वाढ होण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे.

आतापर्यंत झालेल्या पावसामुळे कोकण, नागपूर आणि पुणे या विभागांतील धरणांतील पाण्याची वाढ झाली असून, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या विभागांतील पाण्यासाठ्यात किंचित घट झाली आहे.

मध्यम, लघू प्रकल्पांत साठा कमीच : यंदा मध्यम व लघू प्रकल्पांत पावसाचे प्रमाण कमीअधिक राहिले. त्यामुळे काही धरणांत अजूनही पाण्याची आवक सुरू झालेली नाही. सध्या मध्यम असलेल्या २६० प्रकल्पांत ७०.५६ टीएमसी म्हणजेच ३६.३० टक्के पाणीसाठा आहे.

गेल्यावर्षी या धरणांत ४२.६३ टीएमसी साठा होता. तर लघू असलेल्या २५९९ प्रकल्पांमध्ये ५४.८४ टीएमसी म्हणजेच २६ टक्के एवढा साठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी या धरणांत ३० टक्के एवढा पाणीसाठा होता.

पाणीसाठ्याची स्थिती...

पुणे, नागपूर विभागांतील धरणांतील पाणीपातळीत वाढ.

नाशिक विभागात धरणांतील पाणी पातळी ‘जैसे थे’.

सव्वा महिन्यात सर्व धरणांत एकूण ६१ टीएमसी पाण्याची आवक.

धरणांतील पाणीपातळीत वाढ होण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे.

विभागनिहाय धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) :

विभाग संख्या पाणीसाठा टक्के

नागपूर ३८३ ६१.२७ ३७.६८

अमरावती २५९ ५४.२० ४०.६०

छत्रपती संभाजीनगर ९२० २६.४५ १०.३२

कोकण १७३ ६२.२१ ४७.५७

नाशिक ५३५ ५०.९७ २४.३२

पुणे ७२० १३२.२६ २४.६३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com