Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये जुलैचा पहिला आठवडा संपल्यात जमा असताना -पाणीसाठ्यात वाढच होत नसल्याची स्थिती आहे. अजूनही सुमारे ९० लघू-मध्यम प्रकल्प कोरडेच असून, ४११ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखालीच आहे.
पावसाचा पहिला महिना संपला असताना अपवाद वगळता बहुतांश भागात सरासरीपेक्षा पाऊस जास्त दिसत असला, तरी हा पाऊस पाणीसाठ्यासाठी फारसा पोषक ठरला नसल्याचेच चित्र आहे. ३ मे अखेर मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांमध्ये सरासरी १४.३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. २८ जून अखेरच्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातील सर्व प्रकल्पातील पाणीसाठा ११.४० टक्क्यांवर खाली आला होता.
त्यामध्ये मोठ्या ११ प्रकल्पांतील सरासरी १२.९२ टक्के पाणीसाठासह ७५ मध्यम प्रकल्पातील ६.३७ टक्के, ७४९ लघू प्रकल्पातील ८.१५ टक्के, तर गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यातील ११.६५ टक्के व तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २७ बंधाऱ्यांमधील ३९.४९ टक्के उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश होता. ५ जुलैअखेर मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा १३.३६ टक्क्यांवर असून, मध्यम प्रकल्पात ६.५८ टक्के, लघू प्रकल्पात ८.६७ टक्के गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमध्ये १२.९४ टक्के, तर तेरणा मांजरा रेणा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये ४०.१२२ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला असल्याची स्थिती आहे.
अजूनही कोरड्याच असलेल्या ९० प्रकल्पांमध्ये ८४ लघू व सहा मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. या ६ मध्यम प्रकल्पांमध्ये बीड मधील चार जालना व धाराशिवमधील प्रत्येकी १ प्रकल्पाचा समावेश आहे. दुसरीकडे ८४ कोरड्या पडलेल्या लघू प्रकल्पांमध्ये बीडमधील सर्वाधिक ३२ धाराशिवमधील १८ छत्रपती संभाजीनगरमधील १८ जालन्यातील १३ व लातूरमधील ३ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या ४११ प्रकल्पात ३७३ लघू व ३८ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे.
ज्या मध्यम प्रकल्पांचा पाणीसाठा जो त्याखाली आहे त्या ३८ प्रकल्पांमध्ये छत्रपती संभाजी नगरमधील ११, धाराशिवमधील १०, जालन्यातील ५, बीडमधील ६, लातूरमधील ३, परभणीतील २ व नांदेडमधील १ प्रकल्पाचा समावेश आहे. दुसरीकडे जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या ३७३ लघू प्रकल्पांत छत्रपती संभाजीनगरमधील ३६, जालन्यातील ३९, बीडमधील ६७, लातूरमधील ८३, धाराशिवमधील ७९, नांदेडमधील ३२, परभणीतील १८ व हिंगोलीतील १९ प्रकल्पांचा समावेश आहे. पाच जुलै अखेरपर्यंत केवळ सोळा प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के दरम्यान पाणीसाठा असल्याची स्थिती आहे.
चार मोठे प्रकल्प मृतसाठ्यात
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी चार प्रकल्प मृतसाठ्यात गेले आहेत. त्यामध्ये धाराशिवमधील सीना कोळेगावसह हिंगोलीतील सिद्धेश्वर, बीडमधील माजलगाव व मांजरा या प्रकल्पांचा समावेश आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी निम्न दुधना प्रकल्पात केवळ २ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. निम्न तेरणामध्ये १५ टक्के, जायकवाडीत २८ टक्के, ऊर्ध्व पैनगंगामध्ये ३१ टक्के, निम्न मनारमध्ये २२ टक्के, तर विष्णुपुरीत ३४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची स्थिती आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.