Chana Arrival : खानदेशात हरभऱ्याची आवक सुरू

Chana Market Update : खानदेशात आगाप पेरणीच्या हरभऱ्याची आवक बाजारात सुरू झाली आहे. देशी प्रकारच्या हरभऱ्यास जळगाव बाजार समितीत मुहूर्तालाच पाच हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे.
Chana Market
Chana MarketAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात आगाप पेरणीच्या हरभऱ्याची आवक बाजारात सुरू झाली आहे. देशी प्रकारच्या हरभऱ्यास जळगाव बाजार समितीत मुहूर्तालाच पाच हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे.

लहान आकारातील काबुली हरभऱ्यास शिरपूर (जि. धुळे) येथील बाजार समितीत मुहूर्ताला १० हजार २०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. जळगाव बाजार समितीत शनिवारी (ता. २७) देशी हरभऱ्याची सुमारे १५ क्विंटल आवक झाली. शिरपुरातही लहान काबुली हरभऱ्याची आवक रखडत किंवा अत्यल्प होत आहे.

मोठ्या प्रकारातील काबुली किंवा डॉलर (मॅक्सीको) हरभऱ्याची आवक अद्याप खानदेशातील बाजारांत सुरू झालेली नाही. मोठ्या प्रकारातील काबुलीची पेरणी जळगाव जिल्ह्यातील रावेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा भागात अधिक झाली आहे. त्याची मळणी पुढील महिन्याच्या अखेरीस होईल. सध्या कोरडवाहू क्षेत्रातील देशी हरभरा व आगाप पेरणीच्या लहान प्रकारातील काबुली हरबऱ्याची आवक सुरू आहे. आवक याच आठवड्यात जळगाव, धुळे येथील बाजारांत झाली आहे.

यंदा हरभऱ्यास मागील हंगामाच्या तुलनेत मुहूर्ताला अधिकचा दर मिळाला आहे. मागील वर्षी देशी हरभऱ्यास मुहूर्ताला ५२०० ते ५३२० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. तर सरासरी दर ४५०० रुपये प्रतिक्विंटल, असा मिळाला होता. तसेच लहान प्रकारातील काबुली हरभऱ्यास मागील वर्षी मुहूर्ताला नऊ हजार २०० ते नऊ हजार ३८० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता.

Chana Market
Chana Rate : किरकोळ बाजारात हिरव्या हरभऱ्याचे दर २० रुपये किलो

यंदा हरभऱ्याची पेरणी खानदेशात सरासरी क्षेत्राच्या किंवा अपेक्षित क्षेत्रापेक्षा कमी झाली आहे. मागील वर्षी खानदेशात हरभऱ्याच सुमारे अडीच लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. एकट्या जळगाव जिल्ह्यातील हरभऱ्याची पेरणी सुमारे पावणेदोन लाख हेक्टरवर झाली होती.

यंदा जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याची पेरणी सुमारे एक लाख ६५ हजार हेक्टरवर झाली आहे. तर खानदेशात मिळून हरभऱ्याची पेरणी सुमारे दोन लाख ३५ हजार हेक्टरवर झाली आहे. क्षेत्रात मोठी घट झालेली नाही. परंतु काबुली, मोठा काबुलीची पेरणी काही भागात कमी झाली आहे.

Chana Market
Chana Sowing : हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्राने पार केला सरासरी क्षेत्राचा टप्पा

कारण या हरभऱ्यास पाणी व खते, फवारणीचे नियोजन काटेकोरपणे करावे लागते. यंदा पाऊसमान कमी राहिल्याने काबुली प्रकारातील हरभऱ्याची पेरणी काहीशी कमी झाली आहे.

सध्या आवक रखडत किंवा कमी आहे. पुढे आवकेत चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. देशी व संकरित, सुधारित वाणांच्या हरभऱ्याची आवक खानदेशात अधिक असते. अनेक शेतकऱ्यांच्या क्षेत्रात अद्याप कापणी, मळणीचे काम सुरू आहे. यामुळे आवक पुढील महिन्याच्या मध्यात वाढेल, असेही संकेत आहेत.

गुजरातमधून असते मागणी

खानदेशात हरभऱ्यासाठी धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा (ता.शिंदखेडा), नंदुरबारातील शहादा व नंदुरबार, जळगावमधील अमळनेर, जळगाव व चोपडा या बाजार समित्या प्रसिद्ध आहेत. तसेच पाचोरा-भडगाव बाजारातही अलीकडे हरभऱ्याचे सौदे बऱ्यापैकी होवू लागले आहेत.

खानदेशात चोपडा, शिरपूर, यावल भागातून थेट गुजरात व मध्य प्रदेशातील इंदूर येथील मोठे खरेदीदार काबुली हरभऱ्याची खरेदी करतात. या खरेदीदारांकडून हरभऱ्यासंबंधी विचारणा खानदेशातील पुरवठादारांकडे सुरू आहे. काही शेतकरी थेट इंदूर व गुजरातमधील सुरत, बडोदा, अहमदाबाद भागात मोठा काबुली हरभरा खरेदीदारांकडे पाठवितात. त्यासंबंधीचे सौदे लवकरच खानदेशात पार पडतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com