Function of Agriculture Land : जमिनीचे कार्य समजून घेऊ या

The Story of Agriculture Land : ज्या जमिनीच्या बळावर शेतकरी अधिक उत्पादन काढतो ती मात्र दुर्लक्षित राहते. शेतकऱ्यांनी कितीही कष्ट केले तरी अधिक उत्पादनासाठी जमिनीची प्रतही चांगली असणे गरजेचेच असते.
Agriculture Land
Agriculture LandAgrowon
Published on
Updated on

Good Quality of Land For More Production : सर्व सजिवांना जन्म देऊन त्याचे पालनपोषण करणारी जमीन म्हणजेच भुमाता! यामुळेच तिला जीवसृष्टीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. पिकाचे उत्पादन देण्याची क्षमता जमिनीमध्ये आहे. परंतु याचे सर्व श्रेय आपण घेतो.

एखादा शेतकरी जास्त उत्पादन घेतो म्हणून त्यांना आपण अनेक बक्षिसे देऊन त्याचा सन्मान करतो. परंतु ज्या जमिनीच्या बळावर शेतकरी उत्पादन काढतो ती जमीन मात्र दुर्लक्षित राहते. याच शेतकऱ्‍यांना एखाद्या निकृष्ट, खराब झालेल्या, कमी प्रतीच्या जमिनीवर उत्पादन घेण्यास सांगितले तर मात्र तो अपेक्षित उत्पादन घेऊ शकत नाही.

म्हणूनच अधिक उत्पादनात जमीनही महत्त्वाची असते. चांगले उत्पादन घेणारा शेतकरी जमिनीचे कार्य समजावून घेतो. तिच्या अंतरंगामध्ये डोकावतो, तिच्या हृदयाची धडकन ऐकून भुमातेच्या मनाप्रमाणे तिचे संवर्धन, पालनपोषण करतो, तिची काळजी करतो. याचमुळे भूमिपुत्राला अपेक्षित उत्पादन मिळते.

जमीन हा काही कारखाना नाही की ज्यामध्ये पुस्तकात सांगितल्याप्रमाणे बियाणे, खते, पाणी आणि औषधे दिली म्हणजे त्याच्या गुणाकारानुसार उत्पादन मिळते. कारखान्यामध्ये कधीही त्यामध्ये टाकलेल्या वस्तूच्या वजनाच्या जास्त प्रमाणात उत्पादन मिळत नाही. जमिनीचे तसे नाही. एका किलो बियाणापासून टनाहूनही अधिक उत्पादन देण्याची क्षमता जमिनीमध्ये आहे.

म्हणजेच हजारो पटीने उत्पादन वाढविण्याची क्षमता जमिनीमध्ये आहे. कारण जमीन ही एक जैविक संपदा आहे. जमीन जिवंत आहे आणि जिवंत जमिनीमध्येच सजिवांची निर्मिती आणि वाढ होत असते. कारखान्याप्रमाणे या जमिनी निर्जीव झाल्या तर मात्र एका किलोपासून एकच किलो उत्पादन येईल. म्हणून जमिनीला समजून-उमजून घेऊन तिचे कार्य करण्याच्या पद्धतीचा विचार करूनच शेती केली पाहिजे.

Agriculture Land
Dr. Anand Nadkarni : ‘निर्मितीक्षम’ इच्छाशक्ती

सर्व क्षेत्रातून चुकलेला-हुकलेला समाज, इतर काहीही व्यवसाय, नोकरी धंदा करता येत नाही म्हणून शेतकरी झाला. शेती सोपी आहे. शेती करण्यासाठी डोकं लागत नाही ही मानसिकता मधल्या काळात सर्व समाजामध्ये झाल्यामुळे मागील ४०-५० वर्षांत शेतीची अधोगती झाली. पूर्वीच्या काळी घरातील हुशार मुलाच्या हातात आपले पूर्वज शेती देत होते. त्याचमुळे शेतीची सुपीकता टिकून होती.

अर्थात आज सुशिक्षित, हुशार तरुण समाज नाइलाजाने का होईना शेतीकडे वळाला आहे. त्याच्या माध्यमातून अनेक नवनवीन प्रयोग, संकल्पना शेतीमध्ये येत आहे. जमीन, पाणी, निसर्ग, पर्यावरण, जीवसृष्टी या सर्वांवर मधल्या काळात मोठ्या प्रमाणात आघात झाल्यामुळे आजच्या तरुण पिढीला शेती करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

अर्थात यातून बाहेर पडण्यासाठी जमीन आणि तिची कार्यपद्धती याचा शास्त्रीय पद्धतीने विचार करून त्याला संस्कृतीची जोड देऊन पुढचे पाऊल टाकले तर निश्‍चितच ऐच्छिक स्थळी पोहोचता येईल.

जमीन अनेक घटकांपासून बनलेली असली तरीही तिचे भौतिक, जैविक आणि रासायनिक असे तीन गुणधर्म असतात. या तीनही गुणधर्माचा समतोल राहिला तरच पिकाचे उत्पादन येते.पिकाची लागवड केल्यापासून ते काढणीपर्यंत जमिनीला अनेक प्रक्रियेतून जावे लागते.मानवी आयुष्यात लहानपण, तरुणपण आणि म्हातारपण असते. प्रत्येक वयामध्ये त्यांची वाढ वेगळी असते आणि त्यानुसार आहाराची आवश्यकता असते.

याचप्रमाणे प्रत्येक पीक हे जमिनीचे अपत्य आहे. बियाणे जमिनीत टाकल्यानंतर ते उगवत असताना जमिनीला वेगळी क्रिया करावी लागते. लहान मुलांना ज्याप्रमाणे आहार दिला जातो त्याचप्रमाणे भुमातेलाही आपल्या लहान मुलांना (पिकाला) वेगळा आहार द्यावा लागतो.

पीक काढण्यास आल्यानंतर त्यामध्ये बदल करावा लागतो. पिकाच्या वाढीनुसार जमिनीमध्ये बदल होत असतात. परंतु जमिनीमधील होत असलेल्या या बदलाला पोषक अशी कार्यवाही करण्याची गरज ही शेतकऱ्यांची आहे. म्हणूनच जमिनीच्या अंतरंगात चाललेल्या घटना शेतकऱ्‍यांना समजायला हव्यात.

Agriculture Land
Solapur Drought : सोलापूर जिल्ह्यातील नऊ महसूल मंडले दुष्काळापासून लांबच

जमिनीमध्ये सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे हवा-पाणी यांचे योग्य प्रमाण म्हणजेच वाफसा परिस्थिती. हवा, पाणी यांचे योग्य प्रमाण राहिल्यामुळे पिकाची उगवण, पांढऱ्‍या मुळांची वाढ, मुळांच्या माध्यमातून अन्नद्रव्यांचे शोषण करून पिकांना पुरवठा या सर्व बाबी होत असतात. तसेच जमिनीमध्ये हवेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्राणवायू जमिनीला मिळतो.

हा प्राणवायू पिकांना मिळतोच, परंतु त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे जीव-जीवाणूंना त्याची उपलब्धता होते. त्यामुळे जमीन सजीव राहते. जमिनीमध्ये घातक आणि उपयुक्त जीव-जीवाणू बुरशी असतात. योग्य वाफसा स्थितीमध्ये प्राणवायूचे प्रमाण वाढून उपयुक्त जिवाणू, बुरशीचे प्रमाण वाढते. तसेच जमिनीमध्ये अनेक घातक संयुगे तयार होतात. म्हणूनच जमिनीमध्ये सतत वाफसा स्थिती ठेवणे गरजेचे आहे.

जमिनीमध्ये पिकांच्या मुळांची वाढ मुख्यतः दोन बाबींसाठी होत असते. एक तर पिकाला आधार देण्यासाठी आवश्यक असणारी मुळे आणि पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा करणारी मुळे. पिकांची चांगली वाढ होण्यासाठी पिकांच्या आधारमुळांपेक्षा अन्नद्रव्यांचा पुरवठा करणाऱ्‍या मुळांची मोठ्या प्रमाणात वाढ होणे महत्त्वाचे आहे. अन्नद्रव्यांचा पुरवठा करणाऱ्‍या पांढऱ्‍या मुळांच्या वाढीसाठी जमीन भुसभुशीत आणि वाफसा परिस्थितीमध्ये असणे गरजेचे आहे.

ही पांढरी मुळे जमिनीच्या वरच्या थरामध्ये वाढतात आणि ती फारच कार्यक्षम असतात. त्यांचे कार्य योग्य पद्धतीने चालण्यासाठी त्यांना प्राणवायूचा भरपूर प्रमाणात पुरवठा होणे गरजेचे असते. कडक जमिनीमध्ये मुळांना जखमा होऊन पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा होत नाही. जखमा झालेल्या मुळांमध्ये बुरशी जाऊन पिकांना रोग होतो. रोगाचे प्रमाण वाढून उत्पादनात मोठा प्रमाणात घट येते. पिकांची मुळे चांगली वाढली तरच पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादन वाढते.

म्हणून पिकांच्या मुळांची चांगली वाढ होण्यासाठी जमीन भुसभुशीत आणि वाफसा परिस्थितीमध्ये ठेवावी लागते. मुळांद्वारे अन्नद्रव्यांचा पुरवठा होत असतानाही त्यांची उपलब्धता आणि पाहिजे त्या ठिकाणी घेऊन जाण्याचे काम अनेक जीव-जीवाणू करत असतात.

म्हणूनच जिवाणूंचे प्रमाण वाढविण्यासाठी जमिनीचे व्यवस्थापन चांगले ठेवावे लागते. पिकांच्या मुळांच्या आवडीचे खाद्य म्हणजे ह्यूमस. जमिनीत जेवढ्या जास्त प्रमाणात ह्यूमस तयार होतो तेवढ्याच प्रमाणात पिकांच्या पांढऱ्‍या मुळांची वाढ होते.

ह्यूमस तयार करण्यासाठी जमिनीतील भरपूर प्रमाणात सेंद्रिय पदार्थ आणि जीव-जिवाणूंचे कार्य सुरू असावे लागते. ह्यूमस जास्त तयार झाला तर पांढऱ्‍या मुळांची संख्या वाढून त्यांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे पिकांची जोमदार वाढ सुरू होते.

सेंद्रिय खतांचा जास्त वापर, आच्छादनांचा वापर, योग्य प्रमाणात जमिनीत वाफसा परिस्थिती यामुळे पांढऱ्‍या मुळांची वाढ आणि कार्यक्षमता वाढून पिकांच्या उत्पादनात वाढ होते. जमीन निर्जीव कारखाना नसून नवनिर्माण करणारी निसर्गाची एक निर्मिती आहे, हे समजून घेतले तर अनेक प्रश्न सुटतील.

(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com