मातीतील ओलावा (Soil Moisture) हा पिकासंदर्भातील अत्यंत महत्त्वाचा विषय असून, त्यावरच जागतिक अन्नसुरक्षेचे (Food Security) भवितव्य अवलंबून आहे. पाऊस कमी पडल्यामुळे निर्माण होणारी पाण्याची (Water) कमतरता ही पिकांच्या उत्पादनावर (Crop production) सरळ परिणाम करणारी ठरते. ही बाब न्यू जर्सीसारख्या अमेरिकेतील दुष्काळग्रस्त पट्ट्यामध्येच जन्मलेव्या मायकेल कोश यांच्यासाठी नवी नाही.
सध्या डॉ. मायकेल कोश हे अमेरिकी कृषी विभागाच्या कृषी संशोधन सेवेमध्ये रिसर्च हायड्रोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे आव्हान असलेल्या मातीतील ओलाव्याचे चांगले वाईट परिणाम शेतकरी आणि अभियंत्यांना समजवण्याचे काम ते करत आहेत. कारण मातीतील प्रमाणापेक्षा कमी किंवा अधिक पाण्यामुळे पिकांचे उत्पादन घटण्याचा धोका असतो. त्याचे सरळ परिणाम शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीवर होतात.
अधिक पाण्याच्या स्थितीमध्ये तुमची ट्रॅक्टरसारखी यंत्रे शेतामध्ये कामच करू शकत नाहीत. तसेच पिकाच्या लागवडीसाठी आवश्यक ओलावा जमिनीमध्ये नतसा तरी पिकांच्या लागवडीचा किंवा पेरणीचा कालावधी उलटून जातो. जितका उशीर होत जाईल, तितके पीक उत्पादन अन्य वेगवेगळ्या कारणामुळे घटू शकते.
काढणीपर्यंत हवामानासह अन्य अनेक अडचणी उभ्या राहू शकतात. म्हणजेच शेतकऱ्यांसाठी पिकाची लागवड करावी, तरी नुकसान आणि न करावी तरीही नुकसान अशी दुहेरी नुकसान शेतकऱ्यासमोर आ वासून उभे असते. एका शेतकऱ्याची ही समस्या राहत नाही.
एखाद्या प्रदेशामध्ये अतिपाऊस किंवा दुष्काळी स्थिती उद्भवल्यास त्याचा परिणाम त्या प्रदेशाच्या संपूर्ण कृषी उद्योगावर होतो. संपूर्ण विमा क्षेत्रही अचानक उद्भवलेल्या स्थितीमध्ये कोलमडून पडते. अशी स्थिती सातत्याने उद्भवत असेल, विम्याचे हप्ते प्रचंड वाढून शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याचा धोका असतो.
२००८ पासून अमेरिकी कृषी विभागाच्या पशुधन चारा आपत्ती प्रकल्पांतर्गत ७.५ अब्ज डॉलर इतकी मदत, साह्य शेतकऱ्यांना दिली गेली. सिंचनावर केल्या जाणाऱ्या खर्चाच्या ७० टक्के खर्च हा मातीतील आर्द्रता, ओलावा यांच्या सुव्यवस्थित मापनातून कमी करणे शक्य असल्याचा दावा डॉ. कोश करतात. या क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी डॉ. कोश यांनी वेगवेगळ्या फेडरल एजन्सीज आणि उच्च शिक्षणामध्ये असलेल्या संशोधन सहकाऱ्यांना एकत्र आणले आहे. त्यांनी संशोधक सहकाऱ्यांसह राष्ट्रीय समन्वयीत मृदा आर्द्रता निरीक्षण नेटवर्क तयार केले आहे.
या नेटवर्कद्वारे मरेना ओक्लोहामा येथील सेन्सर टेस्टबड तपासण्या आणि वार्षिक कार्यशाळांचे आयोजन केले जाते.वेगवेगळ्या राज्यांमध्ये राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील संस्थामार्फत प्रत्यक्ष शेतीक्षेत्रातील सेन्सरद्वारे घेतलेल्या नोंदींची माहिती ही राष्ट्रीय मेसोनेट प्रकल्पामध्ये जमवली जाते. या माहितीची सांगड ही उपग्रहाद्वारे उपलब्ध होणारी विविध राज्यातील माहितीशी घातली जाते. उदा. राष्ट्रीय सागरी आणि वातावरणीय प्रशासन (NOAA) या दुहेरी माहितीमुळे कृषी विभाग आणि नोआ या संस्था सातत्याने दुष्काळाच्या स्थितीवर लक्ष ठेवू शकतात.
ही माहिती खोऱ्यातील पाण्याचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवली जाते. त्यामुळे मानवी समाजासाठी पाण्याचा वापर आणि शेतीसाठी सिंचन अशा बाबींचे व्यवस्थापन सुलभ होते. काही शेतकऱ्यांपर्यंतही हा माहितीसाठा सरळ पोहोचवला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचे माहितीसाठी शासन, प्रशासनावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होते.
मात्र सामान्य शेतकऱ्यांना माहितीसाठी शासकीय माहितीसाठ्यावरच अवलंबून राहावे लागते. उपल्बध झालेला माहिती साठा शेतकऱ्यांसाठी सोप्या भाषेमध्ये भाषांतरीत केला जातो. ती माहिती शेतकऱ्यांपर्यतं विविध माध्यमांतून पोचवली जाते. येऊ घातलेल्या दुष्काळ, अतिपाऊस, चक्रीवादळे किंवा पुराची शक्यता लक्षात घेऊन नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे सोपे जाते.
या माहितीमध्ये त्या प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये कोणत्या उपाययोजना राबवाव्यात, याची माहितीही दिलेली असते. त्यामुळे या माहितीचा आधार घेऊन शेतकरी आपल्या शेतजमिनीमध्ये आवश्यक त्या उपाययोजना करू शकतो.
वेगवेगळे गटही जोडले गेले
अमेरिकी संरक्षण दलाच्या अभियंता अधिकाऱ्यांनी अप्पर मिसोरी नदी खोद्यातील जमिनी व मातीला आर्द्रतेच्या निरीक्षणासाठी खास व्यवस्था उभारली आहे. या व्यवस्थेमध्ये ३०० पेक्षा अधिक केंद्रे उभारली आहेत. या केंद्राचा उपयोग मध्य पश्चिमेतील आणि पश्चिमेतील राज्यांना होत आहे. अशा सर्व हवामान आणि आर्द्रता मापन केंद्राच्या सातत्याने संपर्कात राहून माहितीची देवाणघेवाण केली जाते. त्यामुळे प्रदेशातील पाऊस, नद्या व त्यांच्या पाणी पातळीमध्ये झालेली वाढ किंवा घट यांची त्वरित माहिती उपलब्ध होते.
त्यांचा गट देशातील सातत्याने आपत्तिग्रस्त असलेल्या कृषी क्षेत्रातील समस्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. त्याच प्रमाणे फ्लोरिडा, जॉर्जिया आणि अलाबामा यासारख्या विविध राज्यांतील मृदा शास्त्रज्ञही मातीमधील आर्द्रतेचे मापन करण्यासोबतच योग्य पातळी ठेवण्यासाठी काम करत आहेत. त्याचाही मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. यातील अनेक नेटवर्कचे प्रमुख म्हणून डॉ. कोश कार्यरत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.