Sugarcane Farming : एकरी ११० टन ध्येयातून ऊस उत्पादन

100 Tone Sugarcane Production : जमिनीच्या प्रतीनुसार जोड ओळ पद्धत, दर्जेदार बेणे निवड, मातीच्या सुपीकतेला प्राधान्य देऊन ऊस उत्पादनात एकरी ११० टन उत्पादनाचे सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करतो.
Sugarcane Farming
Sugarcane Farming Agrowon
Published on
Updated on

शेतकरी नियोजन ऊस

 शेतकरी ः अमोल कुमार खोत

 गाव ः करनूर, ता. कागल, जि. कोल्हापूर

 क्षेत्र ः सहा एकर

जमिनीच्या प्रतीनुसार जोड ओळ पद्धत, दर्जेदार बेणे निवड, मातीच्या सुपीकतेला प्राधान्य देऊन ऊस उत्पादनात एकरी ११० टन उत्पादनाचे सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करतो. जमीन सुपीकतेचे महत्त्व लक्षात घेऊन मी वीस वर्षांपासून शेतात पाचट कुजवत आहे. याचप्रमाणे रासायनिक, जैविक आणि सेंद्रिय खतांचा एकात्मिक पद्धतीने वापर करतो. माझी माळजमीन तसेच काळी खोल अशी विविध प्रतीची जमीन आहे. या क्षेत्रात मी साधारणतः ५ ते १५ जूनपर्यंत ऊस लागवड करतो.

प्रत्येक वर्षी लागवडीपासून ते खोडवा, निडव्यापर्यंत माझे नियोजन असते. सध्या माझ्याकडे दोन एकर लागण, दोन एकर खोडवा आणि दोन एकर निडवा ऊस आहे. निडवा ऊस काढल्यानंतर मी उन्हाळी भुईमूग घेतो किंवा हिरवळीच्या खतासाठी तागाची लागवड करतो. आडसाली लागवडीच्या अगोदर दरवर्षी तागासारखे हिरवळीचे पीक घेतो. पन्नास दिवसांनी ताग मोडून जमिनीत गाडला जातो. काही वेळा सोयाबीनच्या माध्यमातून पीकबदलाचे नियोजन असते.

Sugarcane Farming
100 Tons Sugarcane Production : एकरी शंभर टन ऊस उत्पादनासाठी स्पर्धा

 पूर्वी मला उसाचे एकरी ४० टनांपर्यंत उत्पादन यायचे. मी साडेतीन फुटी सरीत लागवड करायचो. पुढे व्यवस्थापनात सुधारणा करताना लागवडीची पद्धत बदलली. जसा जमिनीचा प्रकार असेल आणि चढ-उतार असेल त्यानुसार सरीची पध्दत आणि ती किती अंतरावर सोडायची, याचे गणित तयार केले आहे. मी साडेचार फुटांपासून ते साडेसात फुटी पट्ट्यापर्यंत ऊस लागवडीचे प्रयोग करून पाहिले आहेत. सध्या मी जोड ओळ पद्धतीने म्हणजेच चार फूट बाय आठ फूट या अंतराने सऱ्यांचे नियोजन करून लागवड करतो.

 जोड ओळ पद्धतीमध्ये दोन रोपांतील अंतर दीड फूट ठेवतो. सुटसुटीत अंतरामुळे रोपांची चांगली वाढ होते. त्याचा परिणाम ऊस उत्पादनवाढीवर होतो. मुरमाड जमिनीत अंतर जादा आणि काळ्या जमिनीत काहीसे कमी ठेवले जाते. पाणी देण्याच्या पद्धतीतही सुलभपणा येतो.

 नदी, विहीर आणि कूपनलिका अशा तिन्हींचे पाणी विविध क्षेत्रांमध्ये आहे. शेती प्रामुख्याने ठिबक सिंचनावर असली, तरी ज्या वेळी पाण्याची अधिक गरज लागते किंवा अतिशय उष्ण तापमान होते अशावेळी महिन्यातून एखादे पाट पाणी दिले जाते. मात्र त्याचा अतिरेक केला जात नाही. उन्हाळ्यात गरजेनुसार सुमारे दोन तास रेन गन तंत्राने पाणी दिले जाते.

बेणे निवड

उसाच्या वाढीसाठी दर्जेदार बेणे महत्त्वाचे ठरते. अनेक वर्षांपासून को ८६०३२ या जातीची मी लागवड करत आहे. वाढ झाल्यानंतरही याला जादा तुरे येत नाहीत, असा अनुभव आहे. मी पूर्वी महाराष्ट्र, कर्नाटक सीमा भागातील अनेक गावातील प्रयोगशील ऊस उत्पादकांच्या बेणे प्रक्षेत्राला भेट देऊन जातिवंत बेण्याची खरेदी करत होतो.

अगदी पाच हजार रुपये प्रति टनांपर्यंत बेण्यासाठी ऊस खरेदी केली आहे. मात्र अलीकडील चार वर्षांपासून प्रयोगशील शेतकऱ्याच्या रोपवाटिकेतून मी ऊस रोपांची निर्मिती करून घेतो. कांडी लागवडीऐवजी रोप लागवडीवर भर आहे. यामुळे उसाची चांगली वाढ होते. माझ्या क्षेत्रातील प्रत्येक ऊस सरासरी ४५ कांड्यावर जातो. यामुळे उत्पादनात मोठी वाढ मिळते.

Sugarcane Farming
100 Tone Sugarcane Production : शास्त्र, अनुभवाची जोड दिल्यास एकरी १०० टन उत्पादन शक्य

जमीन सुपीकतेला प्राधान्य

 उच्चांकी ऊस उत्पादनवाढीसाठी जमीन सुपीकता हा घटक महत्त्वाचा आहे. उन्हाळ्यामध्ये जमिनीची आडवी नांगरट करतो. दरवर्षी नाही, मात्र गरजेनुसार एकरी दहा ट्रेलर शेणखत जमिनीत मिसळतो. गेल्या वीस वर्षांपासून उसामध्ये पाचटाचे आच्छादन करत आहे. पाचट व्यवस्थित कुजण्यासाठी एकरी चार पोती सिंगल सुपर फॉस्फेट आणि दोन पोती युरिया असे मिश्रण करून पसरतो.

बैलाच्या साह्याने खोडव्याच्या बगला फोडतो. माती परीक्षण अहवालाच्या शिफारशीनुसार एका बाजूला ‘एनपीके’, तर दुसऱ्या बाजूला दुय्यम अन्नद्रव्यांची मात्रा दिली जातात. निंबोळी पेंड आणि शेणखताच्या माध्यमातून रासायनिक खते देण्यावर भर असतो. त्यानंतर पाटाद्वारे पाणी सोडले जाते. माती आणि दिलेल्या खताचे मिश्रण होऊन पाचट चांगले कुजते. यामुळे जमिनीची सुपीकता टिकून आहे.

 खोडवा उसात साठ दिवसांनी रोटाव्हेटर फिरवून पाचट, माती एकत्र मिसळून जमिनीत व्यवस्थित गाडले जाते. गेल्या वीस वर्षांतील पाचट आच्छादनाच्या अनुभवातून जमिनीचा सेंद्रिय कर्ब १ ते १.१० टक्क्यांपर्यंत गेला आहे.

उत्पादनात सातत्य

आडसाली लागणीच्या उसाचे एकरी सरासरी १०८ ते ११३ टन उत्पादनात सातत्य आहे. गाळपाला जाणाऱ्या उसाची संख्या ४० हजार ते ४३ हजारांपर्यंत असते. लागणीच्या उसाचे चांगले उत्पादन असल्याने खोडवा, निडव्याचे योग्य व्यवस्थापन ठेवतो. खोडव्याचे एकरी ६५ ते ७८ टन आणि निडव्याचे ५० ते ५५ टन उत्पादन मिळते.

लागवडीच्या उसाचा उत्पादन खर्च आता एकरी लाख रुपयांवर गेला आहे. खोडव्याचा खर्च ६० हजार रुपयांपर्यंत येतो. कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी कारखान्याला ऊसपुरवठा करतो. प्रति टन तीन हजार रुपये दर मला मिळतो आहे. वजनदार ऊस उत्पादनावर माझे लक्ष असते.

- अमोल खोत ८८०५५९६३६९

(शब्दांकन ः राजकुमार चौगुले)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com