Sugarcane Farming: उसाला तुरा येण्याची कारणे, उपाय

Sugarcane Management: उसाच्या सर्व जातींमध्ये तुरा येण्याची क्षमता असते. परंतु तुरा येण्याच्या कालावधीत फरक पडतो. पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात नायट्रोजनची कमतरता निर्माण झाली, तर मोठ्या प्रमाणात तुरा येतो.
Sugarcane
SugarcaneAgrowon
Published on
Updated on

डॉ. कैलास भोईटे, डॉ. राजेंद्र भिलारे

Sugarcane Flowering: उसाच्या सर्व जातींमध्ये तुरा येण्याची क्षमता असते. परंतु तुरा येण्याच्या कालावधीत फरक पडतो. पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात नायट्रोजनची कमतरता निर्माण झाली, तर मोठ्या प्रमाणात तुरा येतो. हे लक्षात घेता जमिनीतील पाणी पातळी नियंत्रित ठेवणे, हंगामानुसार योग्य वेळी उसाची लागवड करणे आवश्यक आहे.

ज्यावर्षी ऊस पिकाखालील क्षेत्र वाढते त्याच वर्षी तुरा येण्याचे प्रमाण अधिक आढळून येते. शास्त्रीयदृष्ट्या उसाला फुले येणे ही अवस्था चार टप्प्यातून पूर्णत्वास येते. यात सर्वप्रथम ऊस पिकात फुलकळीस सुरुवात होते. त्यानंतर फुलोरा लागणे, फुलाची परिपक्वता आणि चौथा टप्पा म्हणजे तुरा बाहेर येण्याची अवस्था. या सर्वांमध्ये फुलकळीची सुरुवात ही महत्त्वाची अवस्था होय. ही अवस्था म्हणजेच पुष्पांकुर तयार होण्याची प्रक्रिया होय. ही प्रक्रिया दिवसाचा प्रकाश कालावधी किती मोठा आहे यावर अवलंबून असते.

प्रकाशकाळाच्या प्रभावावर दिवसाचे तापमान, जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण, पोषणद्रव्याची उपलब्धता, पानातील उपलब्ध संजीवकांचे प्रमाण यावर परिणाम करते. दिवसाचा प्रकाशकाळ अधिक असल्याने सूर्यप्रकाशाची तीव्रता ऊस पिकास अधिक प्राप्त होते. त्यामुळे उसाची पाने सूर्यप्रकाशाची तीव्रता ६६० एन./एम. ते ७४० एन./एम. एवढी प्राप्त करते. यामुळे उसात फ्लोरिजन हे संप्रेरक तयार होते. हे संप्रेरक फुलकळीचे रूपांतर तुऱ्यात करते. महाराष्ट्रातील हवामानात उसाच्या वाढीवरील अग्रांकुर जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरुवात होऊन ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात फुलकळीचे रूपांतर तुऱ्यात होते.

पुष्पांकुर तयार होण्यास अनुकूल परिस्थिती

सर्वसाधारणपणे दिवसाचे तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस तसेच दिवसा आणि रात्रीच्या तापमानातील फरक हा कमीत कमी असेल तर फुलकळी तयार होते. राज्यात जुलै व ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असेल तर हवेतील आद्रता ६५ ते ९० टक्क्यांच्या आसपास असते. यामुळे पुष्पांकुर तयार होण्यास मदत होते. प्रकाशाची तीव्रता १०००० ते १२००० फूट कॅण्डल असलेले वातावरण पुष्पांकुर तयार होण्यास अनुकूल असते.

Sugarcane
Sugarcane Crop Protection: पाचट आच्छादनातून उसाचे संरक्षण

तुरा येण्याच्या क्रियेवर परिणाम करणारे घटक

जात

सर्व जातींमध्ये तुरा येण्याची क्षमता असते. परंतु तुरा येण्याच्या कालावधीत फरक पडतो. म्हणजेच तुरा येण्याचे प्रमाण उसाच्या आनुवंशिक गुणधर्मावर अवलंबून असते.

लवकर तुरा येणाऱ्या जाती : को ७२१९, को सी. ६७१, को ९४०१२, को एम. ११०१५.

मध्यम कालावधीत तुरा येणाऱ्या जाती को ७१२५, को ८६०३२, फुले ऊस १५०१२, फुले ऊस १५००६

उशिरा तुरा येणाऱ्या जाती : फुले ऊस १३००७

अति पाऊस किंवा पाणथळ जमीन

ज्या वर्षी जुलै- ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त पाऊस होतो, त्या वर्षी तुऱ्याचे प्रमाण अधिक असते. पाणथळ जमिनीत तुरा अधिक प्रमाणात येतो. ९९००४ या जातीस उशिरा तुरा येतो, परंतु पाणथळ जमिनीत लवकर तुरा येतो.

प्रकाश कालावधी आणि तापमान

दिवसाचा कालावधी १२.३० तास व रात्रीचा कालावधी ११.३० तासांचा असेल, तर हा कालावधी तुरा येण्यास अनुकूल असतो. सलग १० ते १२ दिवस असे वातावरण राहिल्यास पुढे ७० ते ९० दिवसांत तुरा येतो.

नत्राचे प्रमाण

पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात नायट्रोजनची कमतरता निर्माण झाली तर मोठ्या प्रमाणात तुरा येतो. अधिक पावसामुळे जमिनीतील नत्र वाहून गेले किंवा पाणथळ परिस्थिती निर्माण झाल्याने उसाला नत्र उपलब्ध न झाल्यास देखील तुरा येतो.

पाण्याचा ताण

पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात पाण्याचा ताण पडला तर तुरा येण्याचे प्रमाण कमी राहते.

Sugarcane
Sugarcane Management: आडसाली उसासाठी व्यवस्थापन गरजेचे

जमिनीचा प्रकार

भारी खोल, काळ्या हलक्या, उथळ तांबड्या पाणथळ जमिनीत लवकर तुरा येतो.

लागवडीचा हंगाम आणि पिकाचा प्रकार

लागण उसापेक्षा खोडवा उसामध्ये तुरा येण्याचे प्रमाण जास्त असते. सुरू, पूर्वहंगाम आणि आडसाली असा कोणताही लागण हंगाम असला तरी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात तुरा येतो.

एप्रिल ते जून या काळात लागण केलेला ऊस ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये तीन ते चार कांड्यावर असेल आणि तुरा येण्यास अनुकूल हवामान मिळाल्यास डिसेंबरपर्यंत तुरा येऊ शकतो.

ऑगस्ट - सप्टेंबर मध्ये उगवण किंवा फुटवा अवस्था असेल तर त्या वर्षीच्या ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये तुरा येत नाही.

भौगोलिक स्थान

विषुववृत्तापासून जवळ म्हणजेच दक्षिण भारतात उसाला लवकर तुरा येतो. दक्षिण भारताकडून जसजसे उत्तर भारताकडे जाऊ तसे उशिरा तुरा येण्याचे आढळून आले आहे.

तुऱ्यामुळे उसावर होणारा परिणाम

तुरा येण्यापूर्वी उसाला बाणासारखी टोके (ॲरोइंग) दिसू लागतात आणि वाढ थांबते.

तुरा आल्यावर सर्वसाधारणपणे दीड ते दोन महिन्यांपर्यंत ऊस उत्पादनात जास्त घट येत नाही.

तुरा येऊन फुले गळू लागल्यावर उसामधील रसाची गुणवत्ता कमी होऊ लागते आणि साखरेचे रूपांतर ग्लुकोज व इतर प्राथमिक पदार्थांमध्ये होते. सुक्रोजचे प्रमाण देखील घटते.

उसामध्ये दशी पडून ऊस पोकळ पडतो. ऊस व साखर उत्पादन घटते.

तुरा येऊ नये म्हणून उपाय योजना

तुरा येऊ नये म्हणून शास्त्रीयदृष्ट्या अशी कोणतीही उपाययोजना नाही. कारण तुरा न येणारी जात उपलब्ध नाही.

प्रायोगिकदृष्ट्या काही बाबी जसे जमिनीतील पाणी पातळी नियंत्रित ठेवणे, हंगामानुसार योग्य वेळी उसाची लागवड करणे. जुलै व ऑगस्ट महिन्यात नत्र खताचा वापर या उपाययोजना केल्यास उसाला तुरा कमी प्रमाणात येतो.

उशिरा तुरा येणाऱ्या जातींची लागवड करावी. उदा. फुले ऊस १३००७

जमिनीतील पाण्याचा निचरा करावा.

- डॉ. राजेंद्र भिलारे, ८२७५४७३१९१

(मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com