Crop Loan : अद्यापही दोन बँकांकडून एक रुपयाचेही पीककर्ज नाही

Agriculture Loan : कोटक महिंद्र बँकेला एक ७६ लाख तर बंधन बँकेला एक कोटी ७९ लाख उद्दिष्ट आहे. तर काही बँकांनी मोजक्या शेतकऱ्यांना जास्तीचे कर्ज वाटप करत उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचा विषय चांगलाच गाजला. उद्दिष्टाच्या तुलनेत कमी वाटप केल्याप्रकरणी पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने दहा बँकेच्या शाखाधिकाऱ्यांविरूद्ध पोलिसांत गुन्हे दाखल केले. मात्र, या कारवाईंनंतही कोटक महिंद्रा बँक व बंधन बँकेने `झुकेगा नही`ची भूमिका घेत एक रुपयाही कर्जाचे वाटप शेतकऱ्यांना केले नाही.

कोटक महिंद्र बँकेला एक ७६ लाख तर बंधन बँकेला एक कोटी ७९ लाख उद्दिष्ट आहे. तर काही बँकांनी मोजक्या शेतकऱ्यांना जास्तीचे कर्ज वाटप करत उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. इंडसईंड बँकेने १० शेतकऱ्यांना एक कोटी २१ लाखाचे वाटप करत १५५ टक्के, आयडीएफसीने दोन शेतकऱ्यांना ८५ लाखाचे कर्ज वाटप करून १०६ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. काही बँकांनी आपल्या नियमित कर्जदारांना पीक कर्जाचे वाटप करून उद्दिष्ट तडीस नेत हातचालाखी करण्याचा प्रयत्न केला आहे.

होमट्रेड रोखे गैरव्यवहारामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. बँकेकडे नवीन कर्ज वाटपासाठी निधीच नाही. आहे त्या पीक कर्जाचे नवंजुनं करुन कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ४९ टक्के गाठल्याचे दाखवले जात आहे. दरवर्षीची बँकेची ही स्थिती असल्याने जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व अन्य बँकांवरच पीक कर्ज वाटपाची मदार आहे. या स्थितीत यंदा बँकाकडून कर्ज वाटपासाठी हात आखडता घेतला.

Crop Loan
Crop Loan : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाकडे राष्ट्रीय, खासगी बॅंकाचा काणाडोळा

सिबील स्कोअरसह विविध कारणे पुढे करुन बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार दिला. खरीप हंगामात एक हजार ५८३ कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना जुलैअखेर ५० टक्केही उद्दिष्ट पार झाले नव्हते. या विषयावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गरम चर्चा झाली. लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यात व्यवसाय करुन नफा मिळवणाऱ्या बँकांच्या शेतकरी विरोधी भूमिकेवर तीव्र टीक केली. त्यानंतर पालकमंत्री सावंत यांनी कर्ज वाटप न करणाऱ्या बँकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

काही लोकप्रतिनिधींनी बँका व शेतकऱ्यांच्या संयुक्त बैठका घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्ज वाटपाचा टक्का वाढला नाही. शेवटी जिल्हा प्रशासनाने कमी कर्ज वाटप केलेल्या दहा बँकेच्या शाखाधिकाऱ्यांविरुद्ध अदखलपात्र गुन्हे दाखल केले. यावर बँकांमध्ये खळबळ उडाली. बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी एकत्र येऊन गुन्हे मागे घेण्याची मागणी करत आंदोलनही केले. काही बँकांनी नरमाईची भूमिका तर बँकांनी ताठरपणा कायम ठेवला. या सर्व घडामोडीत कर्ज वाटपाचा टक्का म्हणावा तेवढा वाढला नसल्याचे पुढे आले आहे.

Crop Loan
Mahatma Phule Crop Loan Scheme : पीक कर्ज परतफेड केली; आम्हालाही लाभ द्या, वंचित शेतकऱ्यांची मागणी

एकाच शेतकऱ्याला चार लाखाचे कर्ज

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ३५ हजार शेतकऱ्यांना ३५७ कोटीचे वाटप करुन १२९ टक्के कर्ज वाटप करत जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. डीसीबी बँकेने तर एका कर्जदाराला चार लाखाचे वाटप करुन अडीच टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. या बँकेला एक कोटी ६७ लाख पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे.

बँक ऑफ इंडियाने ८०, युनियन बँकेने ६८, भारतीय स्टेट बँकेने ५८, आयडीबीआयने ५६ तर पंजाब नॅशनल बँकेने ६० टक्के वाटप केले आहे. बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा, एचडीएफसी, आयसीआयसीआय, सेंट्रल बँक, इंडियन बँक, युको आदी बँकांचे वाटप २० ते ३५ टक्के दरम्यान आहे. जिल्ह्यात १५ सप्टेंबरअखेर एक लाख पाच हजार ३३७ शेतकऱ्यांना एक हजार २८ कोटीचे (६५ टक्के) कर्ज वाटप झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com