प्रताप चिपळूणकर
Nutrient Stabilization : शेतीत उत्पादनपातळी सर्वत्र घटत चालली आहे. शेती करण्यास सुरुवात केल्यानंतर १५ ते २० वर्षानंतर माझे शेतीतही हीच अवस्था निर्माण झाली. यावर सर्वसाधारण शेतकऱ्यांनी रासायनिक खत जास्तीत जास्त वापरण्यास सुरुवात केली. मी विचार करू लागलो हीच जमीन इतक्याच रासायनिक खतात (शिफारशीत हप्ता) उत्तम पीक उत्पादन देत होती. मग आज का देत नाही. पिकाच्या रासायनिक खताच्या गरजा वाढल्या, की रासायनिक खतांचा नाश होण्याचे प्रमाण वाढले? पिकाच्या गरजा वाढण्याची शक्यता कमीच, नाशाचे प्रमाणच वाढले असावे. अशा परिस्थितीत खतांचे हप्ते वाढवून देणे हा मार्ग योग्य नाही. रासायनिक खतांच्या नाशाचे प्रमाण का वाढले? ते कमी करण्यासाठी तसेच शिफारशीत हप्त्यात वाजवी उत्पादन परत मिळविण्यासाठी काय करणे गरजेचे आहे? याचा शोध घेणे गरजेचे वाटले.
या वाटचालीत मी भू-सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास करू लागलो. काही नवीनच गोष्टींची माहिती उपलब्ध झाली. या शास्त्राने माझ्यावरील शंकांचे निरसन केले. जे सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांची (पूर्वी माझीही) अशी समजूत असते, की आपण पिकाला रासायनिक खताचा हप्ता देतो, पाणी देतो, रासायनिक खतातील अन्नांश पाण्यात विरघळतात. पुढे अशा द्रावणाचे पिकाकडून शोषण होते व पिकाचे पोषण होते. वास्तवात असे नसते.
भू-सूक्ष्मजीवशास्त्राने शिकविले, की आपण ज्या स्वरूपात रासायनिक खते देतो, त्या स्वरूपात पीक कधीही शोषण करत नाही. त्यावर जमिनीत काही प्रक्रिया होतात. पिकाचे खाण्याचे अवस्थेत रूपांतर झाल्यानंतरच पिके अशा अन्नांशाचे शोषण करू शकतात. हे समजून घेण्यासाठी घरातीलच उदाहरण पाहूयात. आपण घरात गहू, ज्वारी, तांदूळ, डाळी, तेल, तिखट वगैरे कच्चा माल आणतो तो आपण त्याच अवस्थेत खाऊ शकत नाही. त्याचे पोळी, भाकरी, भात, कालवण अशा खाण्याच्या अवस्थेत रूपांतर झाल्यानंतरचे ते पदार्थ आपण खाऊ शकतो. वरील कच्चा माल टिकाऊ आहे. या तुलनेत खाण्यायोग्य पदार्थ नाशवंत असतात. म्हणून ते फक्त गरजेइतकेच बनविले जातात. पिकाचे पोषण अगदी असेच चालते. आपण दिलेले खत पिकाला उपलब्ध अवस्थेत नसते. त्यातून त्या ठराविकवेळी पिकाला जितकी गरज आहे, तितकीच प्रक्रिया करून खाण्याच्या अवस्थेत आणले जाते. पिकाचे त्यातून पोषण होते, बाकी साठा जमिनीत उपलब्ध नसलेल्या अवस्थेत सुरक्षित साठविला जातो. आपण पिकाला २ ते ४ हप्त्यात रासायनिक खते देतो. या दोन हप्त्यात महिना दीड महिन्याचे अंतर असते. म्हणजे एकदा दिलेले खत इतका काळ पीक गरजेप्रमाणे घेत असते. जमिनीत हे नेमके कसे घडते हे समजून घेणे गरजेचे आहे.
जमिनीतील प्रक्रिया
भू-सूक्ष्मजीवशास्त्र असे सांगते की, रासायनिक खते जमिनीत दिल्यानंतर पहिल्या पायरीत त्याचे पिकाला उपलब्ध नसलेल्या अवस्थेत रूपांतर करून ते जमिनीत साठविले जाते. याला शास्त्रीय भाषेत स्थिरीकरण म्हणतात. असा स्थिर साठा जमिनीत सुरक्षित राहतो. या स्थिर साठ्यातून पिकाच्या गरजेइतकाच भाग उपलब्ध साठ्यात रूपांतर केला जातो. याला अन्नद्रव्याचे उपलब्धीकरण असे म्हणतात. अन्नद्रव्यांची वाटचाल जमिनीत स्थिरीकरण व उपलब्धीकरण या मार्गानेच होते. इथे एक महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे, की प्रथम स्थिरीकरण या पायरीचे काम योग्य अवस्थेत पार पडले तरच पुढे उपलब्धीकरणाच्या पायरीचे काम होऊ शकते. या पहिल्या पायरीचे काम योग्यप्रकारे पार पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीची कशी तयारी केली पाहिजे हेच शेतकऱ्यांना शिकविले जात नाही. स्थिरीकरण योग्य स्वरूपात झाले नाही तर पुढे उपलब्धीकरणही होऊ शकत नाही. दिलेले रासायनिक खत फुकट जाते. आज अवस्थेमुळे रासायनिक खतांचा वापर वाढवूनही उत्पादन योग्य प्रमाणात मिळत नाही. जमिनीत अन्नांशाचे स्थिरीकरण कायिक, रासायनिक आणि जैविक प्रकारे केले जाते.
कायिक स्थिरीकरण
कायिक स्थिरीकरणात अन्नांश जमिनीतील सेंद्रियकणावरील विजातीय विद्युतभारामुळे त्यांना चिकटून बसतात. असे स्थिरीकरण हलके असते. एखाद्या मोठ्या पाण्याच्या धारेने असे चिकटलेले कण ओढून नेले जाऊ शकतात. तरीही असे स्थिरीकरण खूप महत्त्वाचे आहे.
जमिनीमध्ये सेंद्रिय कणांची टक्केवारी जोवर योग्य प्रमाणात होती तोवर उत्पादन चांगले मिळाले. सेंद्रिय कणांची टक्केवारी कमी झाल्यावर उत्पादन घसरले.
हरितक्रांतीच्या सुरवातीला १५ ते २० वर्षे केवळ यामुळेच पिके चांगली आली. नंतर पुढे टक्केवारी कमी होत गेली, तसे उत्पादन घटून लागले. येथे हरितक्रांतीचा कोणताही दोष नव्हता. दोष सेंद्रिय कर्बाच्या टक्केवारीचा होता. सूक्ष्मजीवशास्त्राकडे दुर्लक्षामुळे मूळ कारण अंधारात राहिले आणि हरितक्रांती बदनाम झाली.
रासायनिक स्थिरीकरण
जमिनीमध्ये सतत विविध रासायनिक क्रिया होत असतात. या क्रियेतून निर्माण होणाऱ्या उपपदार्थाबरोबर अन्नांशाची प्रक्रिया होऊन काही नवीन पदार्थ असे तयार होतात. हे पदार्थ पिकाच्या गरजेनुसार सहज स्थिर अवस्थेतून उपलब्ध अवस्थेत येऊ शकत नाहीत. असे स्थिरीकरण कडक असते.
स्फुरदाचे अनेकदा स्थिरीकरण होते. यामुळे तज्ज्ञ मंडळी असे स्थिरीकरण कसे टाळता येईल, यावर मार्गदर्शन करतात. असे स्थिरीकरण झाले म्हणजे ते अन्नांश पुढे पिकाला केव्हाच उपलब्ध होणार नाहीत असे नसते. परंतु तसे भासविले जाते. पूर्वी स्थिर झालेले अन्नांश आज उपलब्ध होतील. आज स्थिर झालेले पुढे केव्हातरी उपलब्ध होतील. स्फुरदाचे स्थिरीकरणाबाबत खूप गैरसमज पसरविले जात आहेत.
जैविक स्थिरीकरण
हे स्थिरीकरण जमिनीतील सूक्ष्म जिवाणूकडून केले जाते. असे स्थिरीकरण प्रामुख्याने सेंद्रिय पदार्थ कुजवून त्याचे सेंद्रिय खत करणाऱ्या जिवाणूकडून केले जाते. कुजण्याच्या क्रियेत काम करत असता हे जिवाणू रासायनिक खतातील अन्नांशही खातात. पुढे त्यांची मृत शरीरे म्हणजे अन्नांशाचा स्थिर साठा असतो.
जैविक स्थिरीकरण झालेला साठा वाढणाऱ्या पिकाच्या गरजेनुसार जलद स्थिरसाठ्यातून उपलब्ध साठ्यात येऊ शकतो. याचबरोबर तो सहजासहजी नाशही पावू शकत नाही. यामुळे असे स्थिरीकरण शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे आहे.
आपण नेहमी चांगले कुजलेले खत वापरत असतो, तशी शिफारसही आहे. यामुळे जैविक स्थिरीकरणाला पारंपरिक शेतीत वाव राहात नाही. शून्य मशागत शेती पद्धतीत मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष पुढील पिकाच्या कालावधीत जमिनीत कुजत असतात. यामुळे असे स्थिरीकरण सहज शक्य होते. शून्य मशागतीत जमिनीला सातत्याने सेंद्रिय खत मिळाल्याने जमिनीची सुपीकता वाढते. त्याचबरोबर रासायनिक खतांचे जैविक स्थिरीकरण झाल्याने त्यांची कार्यक्षमता वाढते. हा अनुभव गेले १८ वर्षे मी प्रत्यक्ष शेतात व तत्पूर्वी ग्रंथवाचनात घेतला आहे. म्हणूनच शून्य मशागत शेतीत पारंपरिकपेक्षा जास्त उत्पादन कमी खर्चामध्ये मिळते.
प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८ (लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.