Organic farming
Organic farmingAgrowon

Soil Fertility : मातीच्या सुपीकतेसाठी जैविक घटकांचा योग्य वापर

Nutrient Management : गेल्या भागामध्ये आपण जैविक घटकांचा शेतीसाठी कशाप्रकारे करता येईल, याची माहिती घेतली. या भागामध्ये सेंद्रिय घटकांच्या विघटनामध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या जिवाणूंविषयी माहिती घेऊ.
Published on

डॉ. अशोक डंबाळे, नवनाथ वाढेकर, भगवान गाडेकर

Soil Health : शेतामध्ये पिकांचे अवशेष नष्ट करण्याची मोठी समस्या मानली जाते. सामान्यतः शेतकरी हे अवशेष जाळून पुढील पिकांसाठी शेत मोकळे करत असल्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते. खरेतर या सेंद्रिय पदार्थातील सेंद्रिय कर्ब आणि शिल्लक अन्नद्रव्ये मातीच्या सुपीकतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा सेंद्रिय पदार्थातून उत्तम अशी सेंद्रिय खते तयार करता येतात. त्यासाठी सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणारे जिवाणू महत्त्वाचे असतात.

सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणारे जिवाणू

हे प्रामुख्याने जैविक पदार्थांचे (उदा. वनस्पती, प्राणी यांचे अवशेष) विघटन करून त्यांना साध्या, मूलभूत घटकांमध्ये तोडतात. या जिवाणूंच्या कार्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे खनिजीकरण (mineralization) होऊन, ती पोषक द्रव्ये मातीमध्ये मिसळून उपलब्ध होतात.

उदाहरणे :

अ) बॅसिलस सबटिलिस(Bacillus subtilis) : हे जिवाणू विविध सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्यास सक्षम असतात.

ब) स्युडोमोनास स्पेसीज (Pseudomonas spp) : हे जिवाणू विविध प्रकारचे सेंद्रिय पदार्थ विघटन करतात आणि त्यातून पोषक द्रव्ये सोडतात.

क) ॲक्टिनोमाइसीज स्पेसीज (Actinomyces spp) : हे जिवाणू विशेषतः सेल्यूलोजसारख्या कठीण सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात.

ड) क्लोस्ट्रिडियम स्पेसीज (Clostridium spp) : हे जिवाणू ऑक्सिजनशून्य (anaerobic) परिस्थितीत सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात.

हे पर्यावरणपूरक जिवाणू जैविक प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे मातीची सुपीकता वाढते. पीक उत्पादनाला साह्य होते.

सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणाऱ्या जिवाणूंमुळे होणारे फायदे

मातीची सुपीकता वाढवणे : सेंद्रिय पदार्थाचे विघटन केल्याने मातीमध्ये पोषक द्रव्यांची उपलब्धता वाढते. यामुळे मातीचा पोत सुधारतो आणि पीक उत्पादनात वाढ होते.

कचऱ्याचे व्यवस्थापन : सेंद्रिय कचऱ्याचे विघटन करून हे जिवाणू पर्यावरणात जमा होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करतात. यामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन सोपे होते.

कार्बन साखळीमध्ये सहभाग : सेंद्रिय पदार्थाचे विघटन हे कार्बन साखळीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या जिवाणूंमुळे कार्बन वातावरणात परत जातो. पर्यावरणाचा समतोल राखला जातो.

हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे : विघटनाच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थांचे पूर्णपणे विघटन होत असल्याने मिथेनसारखे हरितगृह वायू कमी प्रमाणात उत्सर्जित होतात.

पाण्याची धारणा वाढवणे : विघटनानंतर तयार झालेली माती पाण्याची धारणा सुधारते, ज्यामुळे शेतीसाठी आवश्यक जलसाठा वाढतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे : मातीतील चांगले जिवाणू पिकांच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये सुधारणा करतात, ज्यामुळे पिके रोगांच्या प्रादुर्भावापासून सुरक्षित राहतात.

सेंद्रिय खतांचे उत्पादन : हे जिवाणू सेंद्रिय पदार्थांचे विघटन वेगाने करत असल्यामुळे उत्कृष्ट दर्जाचे सेंद्रिय खत लवकर तयार करतात.

Organic farming
Soil Health : कृषी उत्पादकता वाढीसाठी जमिनीच्या आरोग्याचे व्यवस्थापन

सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करणारे जिवाणू/बुरशी

पिकांना ज्या प्रमाणे मुख्य अन्नद्रव्ये आवश्यक असतात, त्याच प्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्येही आवश्यक असतात. लोह, झिंक, मॅंगेनीज, तांबे यांसारखी अन्नद्रव्ये उपलब्ध करण्याचे काम काही जिवाणू करतात. मातीमध्ये हे जिवाणू सूक्ष्म अन्नद्रव्यांचे रूपांतर उपलब्ध स्वरूपामध्ये करतात किंवा त्यांच्या वहनामध्ये मदत करतात.

उदाहरणे :

अ) रायझोबिअम स्पेसीज (Rhizobium spp) : या जिवाणूंचे मुख्य कार्य नायट्रोजन स्थिरीकरण असले तरी ते सूक्ष्म अन्नद्रव्ये (उदा. मॉलिब्डेनम) वनस्पतींना उपलब्ध करून देण्यात मदत करतात.

ब) ॲझोटोबॅक्टर स्पेसीज (Azotobacter spp) : हे जिवाणू वातावरणातील नायट्रोजनच्या स्थिरीकरण करून वनस्पतींना नायट्रोजनसह अन्य सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करून देतात.

क) स्यूडोमोनास स्पेसीज (Pseudomonas spp) : हे जिवाणू फॉस्फरस, लोह, झिंक यांसारख्या अन्नद्रव्यांच्या वहनामध्ये (मोबिलायझेशन) महत्त्वाचे असून, त्यांची वनस्पतींसाठी उपलब्धता वाढवतात.

ड) बॅसिलस स्पेसीज (Bacillus spp) : हे जिवाणू लोहाचे चिलेटिंग करण्यात आणि फॉस्फरसाचे विघटन करून वनस्पतींसाठी उपलब्ध करण्यात महत्त्वाचे असतात.

इ) मायकोरायझल बुरशी (Mycorrhizal Fungi) : हे सूक्ष्म जीव वनस्पतींच्या मुळांच्या संपर्कात राहून फॉस्फरस, जस्त, तांबे आणि अन्य सूक्ष्म अन्नद्रव्ये वनस्पतींना उपलब्ध करून देतात.

ई) फ्रँकिया स्पेसीज (Frankia spp) : हे जिवाणू नायट्रोजन स्थिरीकरणासह वनस्पतींसाठी आवश्यक असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवतात.

Organic farming
Soil Fertility : जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय

फायदे :

वनस्पतींच्या पोषणात सुधारणा : हे जिवाणू सूक्ष्म अन्नद्रव्ये सहज उपलब्ध करून देत असल्याने वनस्पतींना आवश्यक पोषण मिळते.

पीक उत्पादन वाढवणे : सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध झाल्यामुळे वनस्पतींची वाढ सुधारते.

रासायनिक खतांचा वापर कमी करणे : या जिवाणूंच्या मदतीने सूक्ष्म अन्नद्रव्यांची नैसर्गिक उपलब्धता वाढत असल्याने रासायनिक सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा वापर टळतो किंवा कमी करावा लागतो.

मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत : हे जिवाणू मातीचा पोत व जैविक क्रियाशीलता वाढवतात. त्यामुळे मातीचे आरोग्य सुधारते.

जिवाणू खते वापरताना घ्यावयाची काळजी

पीक कोणत्या गटातील आहे, यानुसार त्यासाठी गटासाठी शिफारशीत जिवाणू घटकांचा वापर करावा.

बीजप्रक्रिया करतेवेळी प्रथम बुरशीनाशक, कीटकनाशक व शेवटी जिवाणू खताची प्रक्रिया करावी. या घटकांचा क्रम असाच ठेवावा. प्रक्रियेनंतर बियाणे सावलीत सुकवून त्वरित पेरणी करावी.

जिवाणू खते ही पाकिटावरील नमूद अंतिम तारखेपूर्वीच वापरावीत.

जिवाणू खताचे फायदे

बियाण्याच्या उगवणीचे प्रमाण वाढते.

बीजप्रक्रियेसाठी जिवाणू खते अगदी थोड्या प्रमाणात लागतात. त्यामुळे अत्यल्प खर्च येतो.

पिकांना नत्र, स्फुरद किंवा पालाश यापैकी योग्य त्या अन्नद्रव्याचा पुरवठा होण्याची खात्री मिळते. पिकाची वाढ जोमदार होते.

जिवाणू खतामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते. परिणामी, त्यांच्या वापराच्या प्रमाणामध्ये बचत शक्य होते.

पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य वेळेवर होत असल्याने उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते.

जिवाणू खते पर्यावरण पूरक आहेत.

डॉ. अशोक डंबाळे, ८७८८०२७४७४

सहायक प्राध्यापक - कृषिविद्या विभाग, डॉ. गंगाधरराव पाथ्रीकर कृषी महाविद्यालय, पाथ्री, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com