
Latur / Dharashiv News : हमीभावाने सोयाबीन खरेदीची मुदत शुक्रवारी (ता. ३१) संपणार होती. मात्र दोन्ही जिल्ह्यांत अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी राहिल्याने औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सरकारने सहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती बुधवारी (ता. २९) आमदार पवार यांनी ‘सकाळ अॅग्रोवनला’ दिली.
खरेदीच्या उद्दिष्ट वाढविण्यासाठीही त्यांनी व पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजेभोसले यांनी पाठपुरावा केला होता. सरकारने मंगळवारी (ता. २८) रात्री दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी दोन लाख क्विंटलचे वाढीव उद्दिष्ट मंजूर केल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्याला हमीभावाने सोयाबीन खरेदीचे १२ लाख ८४ हजार १७० क्विंटलचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. हे उद्दिष्ट सोमवारी (ता. २७) रात्री पूर्ण झाले. यामुळे नोंदणी करूनही अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी शिल्लक होती.
यामुळे दोन्ही जिल्ह्यांना आणखी २ लाख क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात १ लाख १५ हजार ३९७ शेतकऱ्यांनी हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी १ लाख ४९३ शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येण्याचे मेसेज पाठविण्यात आले. सोमवारी रात्री ९ वाजेपर्यंत जिल्ह्यात १२ लाख ८४ हजार १७२ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली.
हमीभावाने सोयाबीन खरेदीचे जिल्ह्याला मिळालेले उद्दिष्ट पूर्ण झाल्याने सोयाबीन खरेदीचे पोर्टल बंद झाले होते. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन शिल्लक असल्याने जिल्ह्याचे उद्दिष्ट वाढवून सोयाबीन खरेदी पुन्हा सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोकोसह विविध आंदोलने केली.
त्याची दखल घेऊन सरकारने उद्दिष्ट वाढवून देत खरेदीचे पोर्टल पूर्ववत सुरू केले आहे. दरम्यान खरेदीच्या मुदतवाढीसाठीही आमदार पवार यांनी पाठपुरावा सुरू केला होता. त्यासही सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, सहा फेब्रुवारीपर्यंत खरेदीला मुदतवाढ दिल्याची माहिती आमदार पवार यांनी दिली. दरम्यान, उद्दिष्ट वाढवून पुन्हा खरेदीची मागणी पालकमंत्री भोसले यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडली.
तोपर्यंत केंद्र बंद करू नका
सरकारने नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी होत नाही तोपर्यंत केंद्र बंद करू नयेत, अशी मागणी माजी आमदार धीरज देशमुख यांनी केली आहे़.
धाराशिव जिल्ह्यात मंद गतीने खरेदी
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चार लाख २५ हजार ४७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली होती. हंगामात एक हजार ७०८ किलो प्रतिहेक्टरनुसार ७२ हजार ५९८ मेट्रिक टन सोयाबीन उत्पादन झाले आहे. यात सरकारने जिल्ह्यासाठी १४ लाख ४१ हजार ९८८ क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट दिले होते.
मात्र जिल्ह्यात मंद गतीने खरेदी सुरु असून, आतापर्यंत केवळ आठ हजार ८३७ शेतकऱ्यांच्या दोन लाख ३० हजार ५४२ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली असून, अजून बारा लाख ११ हजार ४४६ क्विंटलचे उद्दिष्ट बाकी आहे. त्यात सरकारने पुन्हा दोन लाख क्विंटलचे वाढीव उद्दिष्ट दिले तरी आठ दिवसांत २६ हजार ५६६ शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीचे आव्हान प्रशासन कसे पेलणार, असा प्रश्न आहे. यामुळेच सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.