
डॉ. आदिनाथ ताकटे, शुभम ढवळे, डॉ. अनिल राजगुरू
बहुतांशी पिकांची पेरणी ठरावीक हंगामात वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असते. जेणेकरून पीक वाढीच्या काळात पिकांना आवश्यक असलेले हवामान पिकांस उपलब्ध होईल. प्रत्येक पिकाची वाढीच्या दरम्यान असलेली हवामानाची गरज ही ठरलेली असते.
यात बदल झाल्यास पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. याला अपवाद सूर्यफूल पीक आहे. सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेचा परिणाम न होणाऱ्या या पिकाची कोणत्याही हंगामात लागवड करता येते. याचा पिकाच्या उत्पादनावर कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही.
जमीन
लागवडीसाठी चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. आम्लयुक्त व पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही.
पूर्वमशागत
जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या घ्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे.
पेरणी
उन्हाळी पेरणीकरिता फेब्रुवारीचा पहिला पंधरवडा ही उत्तम वेळ आहे. बागायती लागवड सरी वरंबा वरंब्यावर टोकण पद्धतीने करावी.
पेरणीचे अंतर
मध्यम ते खोल जमीन ः ४५ बाय ३० सें.मी.
भारी जमीन ६० बाय ३० सें.मी.
संकरित वाण ६० बाय ३० सें.मी.
बियाणे
पेरणीसाठी सुधारित वाणांचे ८ ते १० किलो, तर संकरित वाणांचे ५ ते ६ किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे.
बीजप्रक्रिया
मर रोगाच्या प्रतिबंधासाठी थायरम २ ते २.५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे.
त्यानंतर ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे.
रासायनिक खत व्यवस्थापन
बागायती पिकास नत्र ६० किलो, स्फुरद ३० किलो व पालाश ३० किलो प्रति हेक्टरी प्रमाणे द्यावे. यापैकी अर्धे नत्र ३० किलो आणि स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा पेरणीवेळी द्यावी. तर नत्राची उर्वरित मात्रा ३० किलो नत्र पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावे.
गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडुळ खतातून द्यावे.
आंतरमशागत
पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी दोन रोपांत ३० सेंमी अंतर ठेवून विरळणी करावी.
पेरणीनंतर १५ दिवसांनी एक खुरपणी करावी. तसेच दोन कोळपण्या कराव्यात. पहिली कोळपणी पेरणीनंतर २० दिवसांनी व दुसरी कोळपणी ३५ ते ४० दिवसांनी करावी.
पाणी व्यवस्थापन
सूर्यफूल पिकास वाढीच्या संवेदनशील अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. जसे की रोप अवस्था, फुलकळी अवस्था, फुलोऱ्याची अवस्था, दाणे भरण्याची अवस्था या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात. परिणामी उत्पादनात घट येते.
विशेष बाबी
पीक फुलोऱ्यात असताना सकाळी ७ ते ११ या वेळेत हाताला तलम कापड गुंडाळून फुलाच्या तबकावरून हळुवारपणे हात फिरवावा. म्हणजे कृत्रिम परागीभवन होऊन दाणे भरण्याचे प्रमाण वाढते.
सूर्यफुलाच्या फूल उमलण्याच्या अवस्थेत व त्यानंतर आठ दिवसांनी २ ग्रॅम बोरॅक्स प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे दाणे भरण्याचे प्रमाण व दाण्याचे वजन वाढते.
परागीभवन होण्यासाठी प्रति हेक्टरी ४ ते ५ मधमाश्यांच्या पेट्या शेतात ठेवाव्यात.
सूर्यफूल पिकाची फेरपालट करावी. सूर्यफुलाची मुळे जमिनीत खोलवर जातात. त्यामुळे एकाच जमिनीत दरवर्षी सूर्यफूल लागवड केल्यास जमिनीचा पोत बिघडून उत्पादन क्षमता कमी होते. तसेच रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी कमीत कमी ३ वर्षे तरी त्याच जमिनीत सूर्यफुलाचे पीक घेणे टाळावे.
पीक फुलोऱ्यात असताना कीटकनाशकांची फवारणी करू नये.
- डॉ. आदिनाथ ताकटे ९४०४०३२३८९ (कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, सोलापूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.