
Pune News: हरभरा बाजारात मागील काही आठवड्यांपासून काहीसे चढ उतार सुरु आहेत. दोन आठवड्यांमध्ये बाजारभावात काहीशी वाढ झाली. सध्या भाव हमीभावाच्या आसपास आहेत. पण नव्या मालाची आवक वाढल्यानंतर दर कमी होऊ शकतात. त्यामुळे जे शेतकरी मार्चपर्यंत हरभरा विकण्याचा विचार करत आहेत त्यांनी हमीभावाने विक्रीचा निर्णय घेतल्यास फायदेशीर ठरू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
देशात यंदा गेल्यावर्षीपेक्षा हरभरा उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. मात्र उत्पादनात खूप मोठी वाढ होण्याची शक्यता धुसरच आहे. असे असले तरी यंदा हरभऱ्याला चांगला मागणी असणार आहे. त्यामुळे दराला आधार मिळेल. मात्र आवकेचा दबाव वाढल्यानंतर दर हमीभावाच्या खाली जाऊ शकतात.
त्यावेळी शेतकऱ्यांनी नोंदणी करून सरकारला हमीभावाने विक्री करावी. तसेच मार्चनंतर जे शेतकरी विक्रीसाठी थांबू शकतात. त्यांना खुल्या बाजारातही ५ हजार ५०० ते ५ हजार ८०० रुपयांपर्यंत दर मिळू शकतो. तर एप्रिलनंतर बाजारात ६ हजारांचाही भाव दिसू शकतो. पण त्यासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागेल. त्यामुळे ही सर्व शक्यता गृहीत धरूनच शेतकऱ्यांनी विक्रीचे नियोजन करावे, असे आवाहन बाजारातील अभ्यासकांनी केले आहेत.
हरभरा लागवडीच्या काळात असलेली भावातील तेजी आता कमी झाली. हरभरा बाजारात हमीभावाच्या आसपास विकला जात आहे. सरकारने यंदा हरभऱ्यासाठी ५ हजार ६५० रुपये हमीभाव जाहीर केला.
तर बाजारात सध्या ५ हजार ३०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशातील काही बाजारात नव्या हरभऱ्याची एन्ट्री झाली. मात्र नवा माल खूपच कमी प्रमाणात बाजारात येत आहे. आणखी दोन आठवड्यानंतर बाजारात मालाची आवक वाढायला सुरुवात होईल. त्यानंतर १५ दिवसांमध्ये आवकेचा दबाव वाढेल, असे व्यापारी सांगत आहेत.
हरभऱ्याला चांगला भाव मिळाल्याने यंदा देशात हरभरा लागवड गेल्यावर्षीपेक्षा काहीशी वाढली आहे. २० जानेवारीपर्यंत देशात ९८ लाख हेक्टरवर हरभऱ्याची लागवड झाली होती. यंदा लागवड वाढली खरी. पण यंदा अनेक भागात परतीचा पाऊस कमी पडला. तसेच बदलत्या वातावरणाच फटका पिकाला बसत आहे.
गेल्या तीन आठवड्यांपासून थंडी कमी आणि उष्णता सरासरीपेक्षा जास्त असे वातावरण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या महत्वाच्या राज्यांमध्ये दिसत आहे. याचाही परिणाम हरभरा उत्पादनावर होऊ शकतो, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला. याचाही आधार यंदा हरभरा बाजाराला मिळणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.