Chana Rate: हरभऱ्याचा बाजारभाव यंदा कसा राहील? हरभरा आयात वाढण्याचा अंदाज

Market Update: हरभऱ्याचा भाव आता हमीभावापेक्षाही कमी झाला. पुढील दोन आठवड्यानंतर आता नवा माल मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल व्हायला सुरुवात होईल. तेव्हा हरभरा दरावरील दबावही वाढण्याचा अंदाज आहे.
Chana Market
Chana MarketAgrowon
Published on
Updated on

Pune News: हरभऱ्याचा भाव आता हमीभावापेक्षाही कमी झाला. पुढील दोन आठवड्यानंतर आता नवा माल मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल व्हायला सुरुवात होईल. तेव्हा हरभरा दरावरील दबावही वाढण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे यंदा ऑस्ट्रेलियातून आयातही वाढण्याचा अंदाज आहे. असे असले तरी आवकेचा दबाव असताना शेतकरी हमीभावाने हरभरा विकू शकतात. तसेच आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर खुल्या बाजारातही हमीभावापेक्षा अधिक दर मिळू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

हरभऱ्याच्या भावात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी तेजी दिसली होती. हरभरा भाव ७ हजार ८०० रुपयांपर्यंत वाढले होते. पण मागील दीन महिन्यापासून दरातील तेजी कमी झाली. आता बाजारभाव ५ हजार ३०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. देशातील वाढलेली हरभरा लागवड, पिवळ्या वाटाण्याची वाढलेली आयात आणि हरभरा आयातवाढीचे अंदाज याचा दरावर परिणाम दिसून आला. हरभरा लागवड यंदा अडीच टक्क्यांनी वाढून ९८ लाख हेक्टरवर पोचली आहे. तरीही लागवड क्षेत्र सरासरी क्षेत्रापेक्षा कमीच आहे.

Chana Market
Chana Market : ऑस्ट्रेलियाचा हरभरा भारतीय बाजारात जानेवारीत येणार

देशात यंदा लागवड वाढली तरी उत्पादनात फार मोठ्या उत्पादन वाढीची शक्यता कमीच आहे. हरभरा पिकाला वाढती उष्णता आणि अवकाळी पावसाचा तसेच बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. याचा परिणाम उत्पादकतेवर होण्याची शक्यता आहे. मागील तीन हंगामांचा विचार केला तर हरभरा पिकाला वाढत्या उष्णतेचा फटका बसला आहे. यंदाही उष्णता सरासरीपेक्षा अधिक राहील, असा अंदाज आहे.

पिवळा वाटाणा आयातीचा दबाव

भारताने हरभरा आणि इतर कडधान्याचे भाव कमी करण्यासाठी पिवळा वाटाणा आयात खुली केली. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात आयात वाढली. देशात यंदा विक्रमी मागील १० महिन्यांमध्ये वाटाणा आयात विक्रमी २४ लाख टनांवर पोचली. याचा दबाव हरभरा भावावर आला आहे. पिवळा वाटाणा आयात २८ फेब्रुवारीपर्यंत खुली असणार आहे. तोपर्यंत आयात ३० लाख टनांपर्यंत होण्याची शक्यता असल्याचे आयातदारांनी सांगितले.

हरभरा आयात

देशात गेले वर्षभरा हरभरा आयातही वाढली होती. २०२३-२४ च्या हंगामात एकूण १ लाख ६४ हजार टन हरभरा आयात झाली होती. मात्र यंदा पहिल्या ८ महिन्यांमध्येच १ लाख ९७ हजार टन आयात झाली होती. भारताला सर्वाधिक निर्यात ऑस्ट्रेलियातून होते. चालू हंगामात सव्वा लाख टनांची आयात ऑस्ट्रेलियातून झाली तर टंझानियातून ५९ हजार टनांची आयात झाली. ऑस्ट्रेलियात यंदा उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात जास्त आयात होईल, असाही अंदाज आहे.

Chana Market
Chana Market : विदर्भात हरभरा दरात सुधारणा

दरपातळी काय राहील?

सध्या बाजारात हरभऱ्याला ५ हजार ३०० ते ५ हजार ८०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील आवक वाढल्यानंतर सरासरी दर हमीभावाच्या खाली जाण्याची शक्यता आहे. पण आयात काळात शेतकऱ्यांना सरकारच्या खेरदीचा आधार असेल. कारण सध्या सरकारकडे हरभऱ्याचा स्टाॅक ६ लाख टनांच्या दरम्यान असल्याची माहिती आहे. गेल्या हंगामात हाच स्टाॅक २५ लाख टनांच्या दरम्यान होता. त्यामुळे यंदा सरकारी खरेदी जास्त होईल. म्हणजेच बाजाराला हमीभावाचा आधार असेल. तसेच आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दर महिनाभरात हमीभावाचा टप्पा पार करेल. तसेच पुढच्या काळात दरपातळी ६ हजार ते ६ हजार ३०० रुपयांच्या दरम्यानही जाऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

उत्पादनाचे अंदाज

गेल्या तीन वर्षांपासून हरभरा पिकाला उष्णता आणि अवकाळी पावसाचाही फटका बसत आहे. यंदाही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. याचा सहाजिकच परिणाम हरभरा उत्पादकतेवर होईल, अशी शक्यता आहे. पण यंदा पोषक हवामान असल्याने गेल्यावर्षीपेक्षा उत्पादन अधिक राहील, असे संकते सध्यातरी मिळत आहेत. मात्र रब्बी पेरण्यांच्या सुरुवातीच्या काळातील पेरण्यांचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र वाढीचे कल प्रत्यक्षात राहीले नाही. या कलांमुळेच हरभऱ्यातील तेजी कमी होण्याला मदत झाली होती. थोडक्यात तर यंदा विक्रमी उत्पादनाचाही सुरुवातीचा अंदाज चुकणार आहे.

सरकारची भुमिका

सरकार मागील काही वर्षांपासून हरभऱ्याचा मोठा स्टाॅक घेऊन चालत आहे. मागीलवर्षी जेव्हा नवा हंगाम सुरु झाला तेव्हा सरकारकडे तब्बल २५ लाख हरभरा होता. एवढे असूनही सरकारने खेरदी केली. मात्र तरीही सरकारला हरभऱ्यातील तेजी रोखता आली नाही. आता तर सरकारकडे यंदा ८ लाखांच्या दरम्यानच स्टाॅक असल्याची चर्चा आहे. काही जणांच्या मते हरभरा स्टाॅक यापेक्षाही कमी आहे. त्यामुळे सरकारला हरभऱ्याचा बफर स्टाॅक करण्यासाठी खरेदी वाढवावीच लागेल. अन्यथा देशात कडधान्य उत्पादन घटीमुळे बाजारात येणारी तेजी सरकारला रोखता येणार नाही. सरकारने आतापर्यंत तेजी रोखण्यासाठी हरभऱ्याचा हत्यार म्हणून वापर केलेला आहे. यंदाही सरकार तोच कित्ती गिरवण्याची शक्यता आहे.

बाजारातील ट्रेंड

सरकारने यंदा हरभऱ्याला ५ हजार ६५० रुपये हमीभाव जाहीर केला. सरकार खेरदीही यंदा चांगली करेल. त्यामुळे हरभरा बाजाराला हमीभावाचा आधार असेल. पण आवकेचा दबाव वाढल्यानंतर बाजारात हरभरा भाव हमीभावापेक्षा कमी होऊ शकतात. भावपातळी ५ हजार ३०० रुपयांपर्यंत येऊ शकतात. पण सरकारच्या खेरदीमुळे बाजाराला आधार राहील. तसेच मालातील ओलावा कमी झाल्यानंतर खुल्या बाजारातील दरही हमीभावाच्या दरम्यान येऊ शकतात. तसेच आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरपातळी ६ हजारांच्या दरम्यान पोहचू शकते, असा अंदाज सध्याच्या परिस्थितीवरून अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com