Sericulture Farming : रेशीम शेतीने दिला युवकांना रोजगार

Economic Transformation : देवगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर या गावात राज्य रोजगार हमी योजना, राज्य रेशीम विभाग, ग्रामपंचायत देवगाव तसेच तेथील शेतकरी यांच्या सकारात्मक प्रयत्नांतून आज अर्थकारण बदलले आहे.
Sericulture Farming
Sericulture FarmingAgrowon
Published on
Updated on

Sericulture Cultivation : देवगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर या गावात राज्य रोजगार हमी योजना, राज्य रेशीम विभाग, ग्रामपंचायत देवगाव तसेच तेथील शेतकरी यांच्या सकारात्मक प्रयत्नांतून आज अर्थकारण बदलले आहे. सन २०१८ मध्ये तत्कालीन रेशीम विभागाचे अधिकारी दिलीप हाके, अतुल मोहिते तसेच संभाजीनगर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मौजे. देवगाव येथील प्रगतिशील शेतकरी शहादेवजी ढाकणे यांच्या शेतात रोपवाटिकेसाठी तुतीच्या काड्या रोवून रेशीम उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.

प्रशासनाच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावपातळीवर बैठका घेऊन शेतकरी मित्रांशी संवाद साधला. याचा परिणाम गाव पातळीवर कागदावर चाळीस शेतकरी तयार झाले. परंतु प्रत्यक्ष रोपवाटिका तयार करण्यासाठी रेशीम विभागाचे दिलीप हाके आणि अतुल मोहिते हे देवगाव येथे हजर झाले असता फक्त एक शेतकरी रोपवाटिका तयार करण्यासाठी इच्छुक होते.

परंतु असा अनुभव येऊन सुद्धा रेशीम विभागाच्या अधिकाऱ्यांनी माघार घेतली नाही आणि शहादेवजी ढाकणे यांच्या शेतात रोपवाटिका तयार केली. ढाकणे परिवार सकारात्मक असल्यामुळे कोणत्याही अनुदानाची अपेक्षा न ठेवता रेशीम शेडची उभारणी केली.

Sericulture Farming
Sericulture Farming : रेशीम शेती हे महिन्याला शाश्वत उत्पन्न देणारे पीक : बोराडे

त्यांची रेशीम शेती चांगले उत्पन्न देऊ लागल्यानंतर गावातील युवा शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देऊन रेशीम शेतीचे अर्थकारण समजून घेऊ लागले. याचा परिणाम २०२१ मध्ये अजून चार-पाच शेतकऱ्यांनी रेशीम शेती सुरू केली. या काळात राज्य रोजगार हमी योजना, राज्य रेशीम विभाग यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मौजे देवगाव येथील शेतकऱ्यांशी कायम संवाद चालू ठेवला.

शहादेव ढाकणे यांच्या रेशीम कोष विक्रीच्या पावत्या बघून आणि रोजगार हमी योजनेचे अनुदान खात्यावर जमा झाले हे शेतकऱ्यांना दिसले. याचा परिणाम २०२३ मध्ये जवळपास तीस शेतकऱ्यांनी तुतीच्या रोपवाटिका तयार केल्या. हळूहळू ग्रामपंचायत देवगाव, गावातील रेशीम शेतकरी आणि राज्य रेशीम विभाग आणि राज्य रोजगार हमी योजना यांच्यात मोठ्या प्रमाणात संवाद वाढला.

याच काळात महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना विभागाचे महाराष्ट्राचे सचिव नंदकुमार वर्मा यांनी तत्कालीन महाराष्ट्र रोजगार हमी योजना फलोत्पादनमंत्री संदीपानजी पाटील भुमरे यांच्या संवादातून मौजे देवगाव येथे रेशीम शेतीला भेट देऊन रेशीम शेतीचे अर्थकारण समजून घेतले. शहादेवजी ढाकणे यांचे वार्षिक उत्पन्न हेक्टरी १२ लाख रुपये बघून २०२४ मध्ये जवळपास १२० शेतकरी रेशीम शेती करण्यास प्रवृत्त झाले.

Sericulture Farming
Sericulture Farming : काळानुसार रेशीम शेतीत केले आवश्यक बदल

आता सध्या जवळपास पन्नास शेतकरी रेशीम शेतीत उत्पन्न घेत आहे. या शेतीतून महिन्याला जवळपास पाच लाख रुपये गावात येत आहेत. गावाचा उंबरा जवळपास दोनशेच्या आसपास आहे. दोनशे उंबऱ्यांच्या गावात १२० शेतकरी रेशीम शेती करू लागले आहेत. उरलेल्या ८० घरांतील शेतकरी मित्रांना रेशीम शेतीत रोजगार उपलब्ध झाला. यामुळे आज ग्रामीण भागातील युवकांबद्दल जो समज झाला आहे की युवक काम करीत नाहीत, तो समज आमच्या गावात रेशीम शेतीने चुकीचा ठरविला आहे.

मौजे देवगाव येथील चाळिशीतील एकही युवक बेकार राहिलेला नाही. काही युवक एमआयडीसीत काम करून रेशीम शेती करीत आहेत. आमच्या गावात एक नवीन उपक्रम राबवला जात आहे, गावातील सर्व रेशीम शेतकरी शेतातील काम संपल्यानंतर रोज संध्याकाळी रजापूरला एका ठिकाणी एकत्र बसून रेशीम शेतीवर चर्चा करतात. त्याचे नामकरण आम्ही ‘ॲग्रोवन रेशीम कट्टा’ असे केले आहे. याचा परिणाम मौजे देवगाव येथील एकही शेतकरी रेशीम कोष निर्मितीत अपयशी ठरला नाही.

प्रशासन ग्रामपंचायत आणि शेतकरी यांच्या सुसंवादामुळे मौजे देवगाव हे गाव देशपातळीवर नावारूपाला आलेले आहे. यामुळे माझी मराठवाड्यातील सर्व शेतकरी मित्रांना एवढीच विनंती आहे, की आपल्या फायद्यासाठी सकारात्मक व्हा. राज्य शासनाच्या शेतीविषयक योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्या व आपण समृद्ध व्हा. उगीचच लोकाच्या सांगण्यावर विश्‍वास न ठेवता प्रशासनाशी सकारात्मक संवाद करून जास्तीत जास्त आर्थिक फायदा करून घ्या. शेतकरी समृद्ध तर राज्य समृद्ध आणि देश समृद्ध!

दीपक जोशी, जय जवान जय किसान शेतकरी मंडळ, देवगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com