
डाॅ. विजय माळी
Agricultural Tips: महाराष्ट्र राज्यातील एकूण हवामानाचा विचार करता, हळद पीक उत्तमरीत्या घेता येते. हळद पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. मध्यम पाऊस व स्वच्छ सूर्यप्रकाशात पिकाची वाढ उत्तम होते. सरासरी २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान वाढीसाठी आवश्यक असते. उगवणीसाठी ३० ते ३५ अंश सेल्सिअस, फुटवे फुटण्यासाठी २५ ते ३० अंश सेल्सिअस, कंद वाढीसाठी २० ते २५ अंश सेल्सिअस, तर कंद पोसण्यासाठी १८ ते २० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते.
सुयोग्य जमिनीची निवड
हळद पिकांत उत्पन्नाचा मुख्य स्रोत जमिनीत वाढणारा कंद असतो. त्यामुळे मध्यम प्रतीची, काळी, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. पाण्याचा निचरा न झाल्यास कंदकुज होण्याची शक्यता असते.
जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ टक्क्यापेक्षा जास्त असावे.
कंद जमिनीमध्ये एक फूट खोलीवर वाढतात, त्यामुळे लागवडीपूर्वी एक फूट खोलीवरील माती परीक्षण करावे.
पूर्वमशागत
हळद लागवडीपूर्वी पूर्वमशागत अत्यंत महत्त्वाची आहे. प्रामुख्याने नांगरट, ढेकळे फोडणे, शेताच्या कडा कुदळीने किंवा टिकावाने खणणे ही सर्व कामे पूर्वनियोजन करून घ्यावीत. जमीन जितकी भुसभुशीत तितके उत्पादन चांगले मिळते. पूर्वमशागत झाल्यानंतर हेक्टरी ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून घ्यावे.
सुधारित वाणांची निवड
फुले हरिद्रा
सरळ उंच वाढ, गर्द हिरवी पाने, एकूण पाने ११ ते १२.
पक्वतेचा काळ २५५ दिवस.
फुटव्यांची संख्या प्रति झाड ३ असते.
मातृकंद मध्यम आकाराचे, ९० ते १०४ ग्रॅम वजनाचे.
हळकुंड वजन ४० ते ४२ ग्रॅम.
कुरकुमीनचे प्रमाण ५.३५ टक्के.
हेक्टरी उत्पादन ः ओली हळद ४०० ते ४०६ क्विंटल, वाळलेली हळद ९० ते ९३ क्विंटल. उतारा २३ टक्के.
सेलम
सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांसाठी शिफारस.
पाने रुंद, हिरवी असून झाडास १२ ते १५ पाने येतात. जास्त आर्द्रता व रिमझिम पाऊस असल्यास फुले येतात.
कसदार जमिनीत झाडाची उंची ५ फुटांपर्यंत वाढते. ३ ते ४ फुटवे येतात.
कुरकमीनचे प्रमाण ४ ते ४.५ टक्के.
हेक्टरी उत्पादन ः ओली हळद ३५० ते ४०० क्विंटल, तर वाळलेली हळद ७० ते ८० क्विंटल.
पक्वतेचा कालावधी ः ८.५ ते ९ महिने.
करपा रोगास बळी पडते.
फुले स्वरूपा
मध्यम उंच वाढ, पानांची संख्या ११ ते १३.
पक्वतेचा काळ २५५ दिवस.
फुटव्यांची संख्या २ ते ३ प्रति झाड.
गड्डे आकाराने लहान, वजनाने ५० ते ५५ ग्रॅमपर्यंत.
हळकुंड वजन ३५ ते ४० ग्रॅम.
कुरकुमीनचे प्रमाण ५.१९ टक्के.
हेक्टरी उत्पादन ः ओली हळद ३५८.३० क्विंटल, तर वाळलेली हळद ७८.८२ क्विंटल.
उतारा २२ टक्के.
पानांवरील करपा रोग, कंदमाशीस प्रतिकारक.
राजापुरी
एका झाडास १० ते १५ पाने येतात. पाने रुंद, फिक्कट हिरवी, सपाट असतात. झाडास फुले क्वचित येतात.
कुरकुमीनचे प्रमाण ६.३० टक्के.
वाळलेल्या हळदीचा उतारा १८ ते २० टक्के मिळतो.
हेक्टरी उत्पादन : ओली हळद २५० ते ३०० क्विंटल, तर वाळलेली हळद ५० ते ६० क्विंटल.
पक्वतेचा कालावधी : ८ ते ९ महिने.
करपा रोगास बळी पडते.
स्थानिक बाजारपेठेसह गुजरात, राजस्थानमधून मागणी.
कृष्णा
पाने आकाराने रुंद, सपाट असतात. एका झाडास १० ते १२ पाने येतात.
कुरकुमीनचे प्रमाण २.८० टक्के.
हेक्टरी उत्पादन : वाळलेली हळद ७५ ते ८० क्विंटल.
पानांवरील ठिपके रोगास अल्प प्रमाणात बळी पडते.
टेकुरपेटा
हळकुंडे लांब, जाड व प्रमाणबद्ध असतात. हळकुंडाचा गाभा आणि पानांचा रंग फिकट पिवळा.
कुरकुमीनचे प्रमाण १.८० टक्के.
हेक्टर उत्पादन ः कच्च्या हळद ३८० ते ४०० क्विंटल व वाळलेली हळद ६५ ते ७० क्विंटल.
वायगाव
७ ते ७.५ महिन्यांत पक्व होते.
सुमारे ९० टक्के झाडांना फुले येतात.
पानांना तीव्र सुवास असून हळद पावडरची चवही वेगळी येते.
कुरकुमीन प्रमाण : ६.० ते ७.० टक्के.
उतारा २० ते २२ टक्के.
हळकुंडे लांब व प्रमाणबद्ध असतात. गाभा गर्द पिवळा.
हेक्टरी उत्पादन : कच्च्या हळदीचे १७५ ते २०० क्विंटल व वाळलेल्या हळकुंडांचे ३८ ते ४५ क्विंटल.
हा वाण करपा रोगास बळी पडतोे.
आंबे हळद
कच्च्या आंब्यासारखा सुवास येत असल्यामुळे या हळदीचा वापर मुख्यतः लोणच्यामध्ये केला जातो. ही हळद दिसायला इतर वाणांप्रमाणेच असते, परंतु आतील रंग फिकट पिवळा पांढरट असतो.
७ ते ७.५ महिन्यांत काढणीस तयार येते.
लागवड हंगाम व बेणे
लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. लागवडीस उशीर झाल्यास उत्पादनावर परिणाम होतो.
एक हेक्टर लागवडीसाठी २५ क्विंटल जेठे गड्डे (मातृकंद आकाराने त्रिकोणाकृती) बेणे पुरेसे होते. जास्त उत्पादन मिळविण्यासाठी जेठे गड्डे वापरावेत.
बेणे वजनाने ५० ग्रॅमपेक्षा अधिक, सशक्त, रसरशीत, नुकतीच सुप्तावस्था संपवून कोंब आलेले असावे.
निवडलेले गड्ड्यावरील मुळ्या काढून स्वच्छ करावे.
जेठे गड्डे उपलब्ध होत नसतील, तर बगल गड्डे (४० ते ५० ग्रॅम वजनाचे) किंवा हळकुंडे (वजनाने ३० ग्रॅमपेक्षा मोठे) बेणे म्हणून वापरावे.
निवडलेली हळकुंडे ठळक, लांब, जाड, ठसठशीत वाढलेली, निरोगी आणि एकसमान (भेसळमुक्त) असावीत. दोन ओळींत शिफारशीप्रमाणे पुरेसे अंतर ठेवावे.
बेणेप्रक्रिया
कंदमाशी आणि बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी
रासायनिक बीजप्रक्रिया ः
क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २० मिलि आणि कार्बेन्डाझिम (५० टक्के पाण्यात मिसळणारे) २० ग्रॅम हे दोन्ही एकत्रितरीत्या प्रति १० लिटर पाण्यात बुडवून द्रावण करावे. या द्रावणात बेणे १५ ते २० मिनिटे बुडवावे. १० लिटरचे द्रावण १०० ते १२० किलो बेण्यासाठी वापरावे.
जैविक बीजप्रक्रिया :
लागवड करतेवेळी ॲझोस्पिरिलम १० ग्रॅम अधिक स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक (पीएसबी) १० ग्रॅम अधिक व्हॅम (VAM) २५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बेणे १० ते १५ मिनिटे बुडवून सावलीत सुकवून १ तासाच्या आत लागवड करावी.
रासायनिक बीजप्रक्रिया केल्यानंतर जैविक बीजप्रक्रिया करावी. रासायनिक बेणे प्रक्रिया करून बियाणे सावलीमध्ये दोन ते तीन दिवस सुकवून नंतर जैविक बीजप्रक्रिया करावी. (ॲग्रेस्कोे शिफारस आहे.)
लागवड पद्धती
पाणी देण्याच्या पद्धतीनुसार हळद लागवडीच्या सरी वरंबा आणि रुंद वरंबा या पद्धती आहेत. ठिबक सिंचनाची सोय असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड करावी.
रुंद वरंबा तयार करताना १२० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून नंतर सऱ्या उजवून ६० ते ७५ सें. मी. माथा असलेले २० ते ३० सें.मी. उंचीचे व उताराचे प्रमाण लक्षात घेऊन योग्य लांबी रुंदीचे वरंबे (गादीवाफे) तयार करावेत. वरंब्याचा माथा सपाट करून त्यानंतर ३० बाय ३० सें.मी. अंतरावर बेणे लागवड करावी. लागवडीवेळी गड्डे पूर्ण झाकले जातील याची दक्षता घ्यावी. एका गादीवाफ्यावर दोन ओळी या प्रमाणे लागवड करावी.
डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४
(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज जि. सांगली येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.