Turmeric Farming : हळद उत्पादकता वाढीची सूत्रे

Turmeric Production : निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी आणि अधिक उत्पादकतेसाठी पूर्वमशागतीपासून ते हळद प्रक्रियेपर्यंत हळद पिकाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे.
Turmeric Farming
Turmeric FarmingAgrowon
Published on
Updated on

Turmeric Crop Management : हळद हे देशातील मसाला पिकांतील प्रमुख नगदी पीक आहे. दैनंदिन आहारातील आवश्यक घटक तसेच औषधी गुणधर्म या पिकांत आहेत. हळदीला इतर देशांमधून चांगली मागणी असल्याने निर्यातीच्या अनेक संधी आहेत. महाराष्ट्र राज्याच्या एकूण हवामानाचा विचार केला असता, हळद पीक उत्तमरीत्या घेता येते. अक्षय तृतीयेचा मुहूर्त हळद लागवडीसाठी शुभ मानला जातो, तेथून पुढे लागवडीस प्रारंभ होतो.

हळद लागवडीखालील क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र उत्पादकता कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी आणि अधिक उत्पादकतेसाठी पूर्वमशागतीपासून ते हळद प्रक्रियेपर्यत हळद पिकाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे.

सुयोग्य जमिनीची निवड ः

- हळद पिकांत उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा जमिनीत वाढणारा कंद असतो. त्यामुळे लागवडीसाठी मध्यम प्रतीची, काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. नदीकाठच्या पोयट्याच्या जमिनीत हळदीचे उत्पादन भरपूर मिळते.

- जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा.

- जमिनीची खोली सर्वसाधारणपणे २० ते २५ सें.मी. असावी.

- जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ टक्क्यापेक्षा जास्त असावे. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव कार्यरत होऊन माती जिवंत होण्यास मदत होते. जिवाणूंची कार्यक्षमता वाढून अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

- जमिनीचा पोत चांगला राखण्याच्या दृष्टीने द्विदल किंवा हिरवळीची पिके जसे ताग, धैंचा गाडून जमिनीची पूर्वमशागत करावी.

- भारी काळ्या, चिकण व क्षारयुक्त जमीन हळद पिकास मानवत नाहीत. अशा जमिनीमध्ये पिकाच्या पाल्याची वाढ जास्त होते, कंद पोसत नाहीत.

- हळदीचे कंद जमिनीमध्ये साधारणत: एक फूट खोलीवर वाढतात, त्यामुळे लागवडीपूर्वी एक फूट खोलीवरील माती परीक्षण करावे. माती परीक्षणामुळे खतांचे नियोजन करणे सोईचे होते.

- पाण्याचा उत्तम निचरा नसल्यास हळदीस कंदकुज होण्याचा धोका वाढतो.हलक्या जमिनीत सरासरी उत्पादन मिळविण्यासाठी जमिनीची सुपीकता वाढवावी, पोत सुधारावा, जमिनीची चांगली मशागत करावी.शक्यतो चुनखडीयुक्त जमिनीत हळद पीक घेणे टाळावे. अशा जमिनीत पिकावर सतत पिवळसरपणा दिसून येतो व पिकाची वाढ समाधानकारक होत नाही. भारी काळ्या जमिनीत शेणखताचा वापर अधिक करावा.

Turmeric Farming
Turmeric Crop Management : हळद पिकाचे खत, सिंचन व्यवस्थापन

सुधारित वाणांची निवड ः

- हळदीच्या अधिक उत्पादनासाठी नव्याने विकसित केलेल्या सुधारित वाणांची निवड करावी. सुधारित वाण हे अधिक उत्पादनक्षम, अधिक उतारा देणारे तसेच रोग-किडीस प्रतिकारक असतात.

- लागवडीसाठी फुले स्वरूपा, सेलम, राजापुरी, कृष्णा, फुले हरिद्रा, टेकुरपेटा, वायगाव, सुवर्णा, प्रगती, प्रतिभा, आयआयएसआर केदारम, बीएसआर-१, बीएसआर-२, राजेंद्र सोनिया, मेघा या सुधारित वाणांची निवड करावी.

- घरचे बेणे असल्यास दर पाच वर्षांनंतर बेणे बदलावे. कंद उगवून आल्यानंतर शेवटपर्यंत एका झाडाला १२ हिरवीगार टवटवीत पाने आणि ४ ते ५ फुटवे असणे गरजेचे असते. निवडलेल्या वाणांमध्ये कुरकुमीनचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा अधिक असावे.

Turmeric Farming
Turmeric Crop Management : सद्य:स्थितीतील हळद पीक व्यवस्थापन

माती परीक्षण ः

अन्नाशांचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीची सुपीकता अधिक असल्याने पिकाची केवळ शाकीय वाढ जोमाने होते. परंतु अशा जमिनीत वाढणारे कंद कमी पोसतात. त्यांचा आकार अतिशय लहान राहतो. म्हणून हळद लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीचे माती परीक्षण अवश्य करून घ्यावे. माती परीक्षण अहवालानुसार योग्य त्या प्रमाणात खते देणे सोयीचे होते.

पूर्वमशागत ः

- पूर्वमशागतीमध्ये प्रामुख्याने नांगरणी, ढेकळे फोडणे, शेताच्या कडा कुदळीने किंवा टिकावाने खणून काढणे ही सर्व कामे करून घ्यावीत. हळद हे जमिनीत वाढणारे खोड आहे. त्यामुळे जमीन जितकी भुसभुशीत तितके हळदीचे उत्पादन चांगले मिळते.

- लागवडीसाठी निवडलेल्या शेतातील पहिले पीक काढल्यानंतर जमिनीची ट्रॅक्टरच्या साह्याने २५ ते ३० सें.मी. (एक फूट) खोलीपर्यंत खोल नांगरट करावी. शेतातील कुंदा, हराळी, लव्हाळ्याच्या गाठी यासारख्या बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळासह काढून नष्ट करावेत.

- पहिल्या नांगरटीनंतर कमीत कमी १ ते २ महिन्यांनी दुसरी नांगरट आडवी करावी. दुसऱ्या नांगरटीपूर्वी शेतात मोठी ढेकळे दिसत असल्यास तव्याचा कुळव मारून नंतर नांगरट करावी.

- त्यानंतर हेक्टरी ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून घ्यावे. शेणखत उपलब्ध नसल्यास घन जिवामृत, कंपोस्ट खत, गांडूळ खत वापरावे.

रुंद वरंबा पद्धतीने लागवड ः

ठिबक सिंचन सारख्या आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड फायदेशीर ठरते. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसतात.

रुंद वरंबा तयार करताना १२० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. त्या सऱ्या उजवून ६० ते ७५ सेंमी माथा असलेले २० ते ३० सें.मी. उंचीचे व उताराचे प्रमाण लक्षात घेऊन योग्य त्या लांबी रुंदीचे वरंबे (गादीवाफे) तयार करावेत. वरंब्याचा माथा सपाट करून त्यानंतर ३० सें.मी. बाय ३० सें.मी. अंतरावर लागवड करावी. लागवडीच्या वेळी गड्डे पूर्ण झाकले जातील याची दक्षता घ्यावी. एका गादीवाफ्यावर दोन ओळी बसवाव्यात. या पद्धतीसाठी जमीन समपातळीत असणे गरजेचे असते.

लागवड हंगाम व बेणे ः

हळदीची लागवड साधारणपणे एप्रिल महिन्याच्या मध्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. लागवडीस उशीर झाल्यास त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. बेणे लागवड जमिनीच्या समांतर करावी. त्यामुळे भरणी करताना मातीचे आच्छादन मिळणे सोपे होते. चांगली वाढ होते. फुटवे फुटण्याची प्रक्रिया ही एकाच कंदापासून होते. लागवडीपासून २१ ते २६ दिवसांत संपूर्ण उगवण होते.

बेणे निवड ः

- हळदीच्या लागवडीच्या दृष्टीने बेणे निवड अत्यंत महत्त्वाची असते. एक हेक्टर हळद लागवडीसाठी २५ क्विंटल जेठे गड्डे (त्रिकोणाकृती मातृकंद) बेणे पुरेसे होतात.

- बेणे ५० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे, सशक्त, निरोगी, रसरशीत, नुकतीच सुप्तावस्था संपवून थोडेसे कोंब आलेले असावेत.

- गड्डे स्वच्छ करून त्यावरील मुळ्या काढून घ्याव्यात. कुजलेले, अर्धवट सडलेले बियाणे लागवडीसाठी वापरू नयेत.

- जेठे गड्डे उपलब्ध होत नसतील तर बगल गड्डे (४० ते ५० ग्रॅम वजनाचे) किंवा हळकुंडे (३० ग्रॅमपेक्षा वजनाने मोठे) बेणे म्हणून वापरावे. निवडलेली हळकुंडे ठळक, लांब, जाड, ठसठशीत वाढलेली, निरोगी आणि एकसमान आकाराची (भेसळमुक्त) असावीत. हळकुंडे जमिनीमध्ये समांतर वाढतात अशावेळी दोन ओळींत शिफारस केल्याप्रमाणे पुरेसे अंतर ठेवावे.

डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४

(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com