Sugarcane Cultivation : हंगामभर पुरवठ्यासाठी ऊस लागवडीचे वेळापत्रक

Sugarcane Production : कारखान्याला गाळप हंगामासाठी किमान १६० दिवस ऊसपुरवठा होण्याकरिता वेगवेगळ्या हंगामांमध्ये व महिन्यांमध्ये हंगामनिहाय वाणांची लागवड करावी लागते. त्याच्या लागवडीचे वेळापत्रक बनविल्यास कारखान्याची गाळप कार्यक्षमता वाढते.
Sugarcane Farming
Sugarcane Farming Agrowon
Published on
Updated on

डॉ. गणेश पवार, डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. अशोक कडलग

Sugarcane Farming : टॅरिफ आयोगाच्या नियमानुसार राज्यनिहाय हवामान व साखर उताऱ्यानुसार गाळपाचे दिवस ठरविलेले असतात. उदा. जर एखाद्या राज्यातील २५०० टन गाळप प्रतिदिन गाळपक्षमता असलेला कारखाना १६० दिवस चालवायचे असेल, तर त्याला १०० टक्के कार्यक्षमतेने कारखाना चालविण्यासाठी २५०० × १६०= ४,००,००० (चार लाख टन) एवढा ऊस गाळपास यायला हवा.

यासोबतच अतिरिक्त ऊस लागवड असल्यास कारखान्याची गाळप दिवस क्षमता ही कारखान्याच्या ब्रेकसम बिंदू (योग्य साखर उताऱ्यामुळे साखर उत्पादनासाठी कारखाना कार्यरत राहण्याचा खर्च) या प्रमाणात वाढवून मिळू जाते.

ऊस वाणाची निवड कशी करावी?

ऊस वाणांची निवड करताना गाळप हंगाम नियोजनाच्या सोयीसाठी गाळप हंगामाची लवकर, मध्यम आणि उशिरा या तीन तोडणी वर्गात विभागणी करावी. गाळप हंगाम १६० दिवसांचा असताना तोडणी हंगाम नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू झाला, तर नोव्हेंबर दुसऱ्या पंधरवड्यापासून ते डिसेंबर अखेरपर्यंतची ऊस तोडणी ही लवकर तोडणी वर्गात मोडते. त्यानंतर जानेवारी ते मार्चपर्यंतची तोडणी मध्य तोडणी हंगाम वर्गात येते. मार्चनंतर म्हणजे एप्रिल, मेचा तोडणी हंगाम हा उशिरा तोडणी हंगाम वर्गात मोडतो.

सुरू हंगामातील लागवडीस (१५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी) रब्बी हंगामातील पिकामुळे उशीर होतो. तसेच समशीतोष्ण पट्ट्यामध्ये हिवाळ्यातील थंडीमुळे ऊस उगवणीस अडथळा निर्माण होत असतो, त्यामुळे लवकर पक्व होणाऱ्या व सुक्रोजचे प्रमाण जास्त असलेल्या वाणांची लागवड सुरू हंगामात करावी. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये तोडणी हंगामाच्या सुरुवातीस तोडणी केली जाईल.

मध्यम तोडणी हंगाम कालावधीमध्ये (जानेवारी-मार्च) मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या वाणांची तोडणी होते. या वाणांची पक्वता अवस्था १३ ते १४ महिन्यांनंतर येते, त्यामुळे हे वाण अधिक उत्पादन व चांगला साखर उतारा देणारे असतात. सर्वसाधारणपणे थंडीच्या/ हिवाळ्यामध्ये कांड्यांमध्ये साखर भरण्यासाठी लागणारे पोषक तापमान (१८-२० अंश सेल्सिअस) मिळते. त्यामुळे या कालावधीमध्ये पक्वतेनुसार वाणांचा तोडणी कार्यक्रम राबविल्यास साखर उतारा चांगला मिळतो. त्यानंतर मार्चअखेर (होळीनंतर) तापमान वाढत जाऊन उसातील साखरेचा ऱ्हास सुरू होतो. साखरेचा उतारा घसरू लागतो. या कालावधीमध्ये मध्यम उशिरा ते उशिरा पक्व होणाऱ्या गटातील वाणांची तोडणी नियोजनपूर्वक केल्यास साखर उतारा चांगला मिळतो व कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने चालण्यास मदत होते.

Sugarcane Farming
Sugarcane Crop Management : पूरपरिस्थितीतील ऊस पिकाचे व्यवस्थापन

कारखान्याने कार्यक्षेत्रावरील लागवडीचे नियोजन कसे करावे?

कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर गटनिहाय खंडित/ टप्प्याटप्प्याने लागवड (Staggered Planting) करून घेतल्यास तोडणी कार्यक्रमानुसार कारखान्यास योग्य पक्वतेच्या उसाची उपलब्धता होईल. त्याचबरोबर एखाद्या महिन्यामध्ये किंवा हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात एकाच वाणाची लागवड जास्त क्षेत्रावर झाल्यास तसेच परतीच्या पावसामुळे हा ऊस तुटण्यास आणखी विलंब होतो. परिणामी, त्याच्या उत्पादनात व साखर उताऱ्यात घट येते. त्यासाठी आठवड्याच्या फरकाने वाणनिहाय खंडित लागवड व त्या नोंदीनुसार टप्प्याटप्प्याने तोडणी यांचे नियोजन केल्यास कारखान्यांच्या कामामध्ये सुलभता येते. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांना आणि साखर उतारा वाढल्याने कारखान्याचा फायदा वाढेल. अतिपक्व वा कमी कालावधीच्या उसाची तोडणी टाळून शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येईल.

साखर कारखान्याच्या क्षेत्रातील आठवडानिहाय लागवडीच्या तारखा, वाणनिहाय त्यांची सरासरी उत्पादकता, साखर उतारा, खोडवा उसाचे क्षेत्र व प्रत्येक आठवड्यात गाळपास लागणारा ऊस यांची मागील वर्षाची नोंद करून घ्यावी. त्यामुळे चालू हंगामाचे काटेकोर नियोजन करता येईल. उदा. जर एखाद्या कारखाना कार्यक्षेत्रावर ५० टक्के क्षेत्र हे खोडव्याखालील असेल तर त्या क्षेत्रातून कारखान्याच्या गाळपाचे ४० टक्के गरज भागली जाईल. त्यामुळे राहिलेल्या ६० टक्के उसाची गरज ही नवीन लागवडीतून पूर्ण करावी लागेल. याचा अचूक अंदाज येईल. जर हे नियोजन आठवड्यानुसार केले तर काटेकोर पद्धतीने वेळापत्रक तयार होईल. कधी कधी कमी उत्पादनामुळे खोडवा ऊस काढला जातो. कीड व रोगांचा उद्रेक, पाण्याच्या ताणामुळे ठरलेल्या क्षेत्रामध्ये घट होऊ शकते. ही तूट भरून काढण्यासाठी ५ ते १० टक्के अतिरिक्त क्षेत्रावर उसाच्या लागवडीचे नियोजन असावे.

स्थाननिहाय विशिष्ट वाणांची लागवड

कारखान्याचे कार्यक्षेत्र हे वेगवेगळ्या गावांमध्ये विभागलेले असते. या कार्यक्षेत्राची जमिनीचा पोत, पाण्याची उपलब्धता, पीक पद्धती व शेतकऱ्यांच्या वाणांच्या निवडीनुसार वेगवेगळ्या गटामध्ये विभागणी करावी. प्रत्येक गट हा सिंचन पद्धती, जमिनीचा पोत, उतार, निचऱ्याची क्षमता व पीक पद्धतीनुसार वेगवेगळा असेल, त्यामुळे या वैशिष्ट्य़ानुसार त्या गटांमध्ये योग्य त्या वाणांची निवड करून लागवड करावी. उदा. जर त्या गटांमधील जमीन हलक्या स्वरूपातील व पाण्याचा ताण निर्माण होणाऱ्या असतील, तर तेथे दुष्काळ किंवा ताणप्रतिकारक वाणांची निवड करावी. त्यामुळे वाणांच्या वैशिष्ट्यानुसार वाणांचे लागवड वेळापत्रक करावे.

तोडणी नियोजन कार्यक्रम

तोडणी नियोजनाच्या आराखड्यानुसार लागवड नियोजन आराखडा तयार करावा. वाणनिहाय वेळापत्रक आखताना खोडव्याचे क्षेत्र, त्याचे उत्पादन, किती खोडवे (२,३) व वाणांची खोडवा येण्याची क्षमता लक्षात घ्यावी. खोडवा ऊस पीक तोडणी नियोजन कार्यक्रमांमध्ये प्राधान्याने सर्वप्रथम तोडले जायला हवे तरच खोडवा घेण्याच्या क्षमतेत वाढ होईल. ऊस पीक घेणे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल.

Sugarcane Farming
Sugarcane FRP : ‘भीमाशंकर’चा ३२०० रुपये दर जाहीर

परिस्थिती विश्‍लेषण

वाणनिहाय वेळापत्रक करण्यापूर्वी परिस्थिती विश्‍लेषण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये तेथील हवामान परिस्थिती, जमिनीचा प्रकार, सिंचन क्षमता, कीड व रोगांची समस्या, वाणांची अनुकूलता व त्यांची उपलब्धता तसेच शेतकऱ्यांची वाणाविषयीची आवड या सर्व बाबींचा विचार लागवड वेळापत्रक करताना करावा लागेल. यामध्ये हवामान हा अत्यंत परिणामकारक असणारा घटक आहे. उदा. पूर्वहंगामी ऊस लागवड करताना परतीच्या पावसाचा फायदा घेता येतो, परंतु जास्तीच्या पावसामुळे खरिपातील पिके काढण्याचे काम लांबणीवर जाते. पूर्व मशागतीस अडथळा येऊन योग्य वेळेत लागवड करता येत नाही.

ज्या भागांमध्ये काणी, गवताळ वाढ व खोडवा वाढ, खुंट रोग (आरएसडी) यासारख्या रोगांचा अधिक प्रादुर्भाव होतो. अशा ठिकाणी या रोगांविरुद्ध प्रतिकारक असलेल्या वाणांची निवड करावी. आपल्या वेळापत्रकात अशा वाणांचा समावेश करणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत वेगवेगळ्या जातींचे दर्जेदार बेणे मळे तयार करून शुद्ध व रोगमुक्त बेणे शेतकऱ्यांना कमी खर्चात पुरवठा करणे ही महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी कारखान्यामार्फत सक्षम ऊस विकास अधिकारी नेमून गटनिहाय वरील माहिती गोळा करून त्या अनुषंगाने तयारी करणे गरजेचे ठरते.

गाळप व साखर उताऱ्याचे उद्दिष्ट ठरविणे

कारखान्याने गाळपाचे व साखर उताऱ्याचे उद्दिष्ट ठरवून घ्यावे. त्याप्रमाणे वाणनिहाय आठवड्याच्या अंतराने खंडित लागवडीचे वेळापत्रक तयार करावे. आपल्या परिसरातील हवामानाचा विचार करावा. इतर भागांत अनुकूल असलेल्या वाणांचे आपल्या भागातील हवामानात येणारे उत्पादन हे कमी असू शकते. विशेषतः कारखान्याच्या विविध क्षेत्रांवर अशा अनुकूलता ऊस चाचणी (Adaptive Trials) घेऊन त्यांच्या लागवड तारखा व तोडणी तारखा नोंदवून त्यानुसार वाणांचे वेळापत्रक तयार करावे. या चाचण्यांमध्ये विविध विद्यापीठे आणि संशोधन संस्थांकडून (प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव व वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट, पुणे) प्रसारित नव्या वाणांचा समावेश करावा. त्याची अनुकूलता जाणल्यानंतर कारखान्याच्या वेळापत्रकात टप्प्याटप्प्याने त्यांचा समावेश करावा.

नवीन वाण हे टप्प्याटप्प्याने वाढवत न्यावे ते अचानकरीत्या सर्व कार्यक्षेत्रावर लागवड करू नयेत, अन्यथा तेथील वातावरणाच्या गुणदोषाप्रमाणे जर ते अनुकूल नसतील, तर शेतकऱ्यांचे व त्यातून कारखान्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. तत्काळ व मोठ्या प्रमाणावर वाणांचा बदल हा मोठ्या प्रमाणातील रोगामुळे ते क्षेत्र बाधित झाले तरच करावे, अन्यथा हा बदल टप्प्याटप्प्याने करावा.

पथदर्शी प्रक्षेत्र चाचणी

पूर्वप्रसारित किंवा प्रसारित झालेल्या नवीन वाणांचे कारखाना किंवा शेतकऱ्यांच्या शेतावर पथदर्शी प्रात्यक्षिक चाचण्या घ्याव्यात. सद्यःस्थितीतील वाणांपेक्षा हे वाण उत्पादनास व साखर उताऱ्यास चांगले आढळल्यास शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे. वाणांचा हा बदल हळूहळू घडून येईल. काही नवीन वाण हे साखर उतारा चांगला देणारे असले तरी उत्पादनाच्या बाबतीत पारंपरिक वाणाच्या तुलनेत कमी असल्यास अशा वाणांच्या प्रसारासाठी शेतकऱ्यांसाठी काही प्रोत्साहनपर योजना किंवा जास्तीचा दर द्यायला हवा. अशा विविध प्रकारे शेतकरी आणि कारखाना दोघांच्याही फायद्याचा सकारात्मक विचार झाल्यास शेतकऱ्यांशी विश्‍वासाचे नाते निर्माण होते.

ऊस वाणांच्या वेळापत्रक नियोजनातील महत्त्वाच्या बाबी

वाणनिहाय व हंगामनिहाय वेगवेगळ्या ऊस वाणांची निवड करावी.

नियोजनबद्ध ऊस लागवड कार्यक्रमाची आखणी करावी.

गाळपक्षमतेनुसार कारखाना कार्यक्षेत्रावर उसाची लागवड असावी तसेच पुढील वर्षीच्या नवीन लागवडीसाठी ऊस बेणेमळ्याचे नियोजन करावे.

साखर कारखाना कार्यक्षेत्रात गटनिहाय व जमिनीच्या पोताप्रमाणे उपयुक्त अशा ऊस वाणांची वेगवेगळ्या महिन्यांमध्ये लागवड करावी.

लागवड हंगाम नियोजनाप्रमाणे ऊस तोडणीचे नियोजन वाणानुसार व ऊस लागवड हंगामानुसार करावी.

खोडवा उसाच्या कार्यक्षेत्राचे नियोजन करून त्याचा ऊस तोडणी कार्यक्रमात समावेश करून अतिरिक्त फायदा करून घ्यावा.

उसाचे पक्वतेनुसार पडणारे गट

उसाच्या पक्वतेसाठी लागणाऱ्या वेळेनुसार व वाणांच्या गुणधर्मानुसार तीन प्रकार पडतात

लवकर पक्व होणारा गट

या वाणामध्ये १० महिन्यांमध्ये साधारणतः १६ टक्के सुक्रोज, ८५ टक्के शुद्धता मिळते. हे वाण ११ ते १२ महिन्यांत गाळपास तयार होतात. लवकर पक्व होणारे वाण हे सुरू हंगामात (१५ डिसेंबर - १५ फेब्रुवारी) लागवड करायला हवेत. उदा. कोसी ६७१, व्हीएसआय ४३४, एमएस १०००१ (क्षारपड जमिनीसाठी योग्य) व को ९४०१२.

मध्यम उशिरा पक्वता गट

या वाणांमध्ये १२ महिन्यामध्ये १८ टक्के सुक्रोज आणि ८५ टक्के शुद्धता मिळते. हे वाण १३ ते १४ महिन्यांत तोडणीस तयार होतात. मध्यम उशिरा पक्व होणारे वाण हे लागवड हंगामाच्या मध्यंतरी म्हणजे पूर्वहंगामी (१५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर) या कालावधीत लागवड करायला हवेत. उदा. कोएम ०२६५ (क्षारपड जमिनीसाठी योग्य), को ८६०३२, को ९२००५ (गुळासाठी योग्य), व्हीएसआय ०८००५, को व्हीएसआय ०३१०२ (अतिपर्जन्य विभागासाठी), को व्हीएसआय १८१२१ व पीडीएन १५०१२.

उशिरा पक्व होणारा गट

या वाणांमध्ये १४ महिन्यांमध्ये १६ टक्के सुक्रोज व ८५ टक्के शुद्धता मिळते. हे वाण १४ ते १६ महिन्यांत तोडणीस तयार होतात. या वाणांची लागवड आडसाली (१५ जुलै ते १५ ऑगस्ट) हंगामामध्ये केली जाते. त्यामुळे कारखाना हंगाम संपताना या वाणांची तोडणी करता येते. यामुळे ऊस उत्पादनाबरोबर साखर उतारा शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यास मदत होते. उदा. कोएम ०२६५

या तीन गटांव्यतिरिक्त अतिलवकर पक्व होणारा एक गट असून, हे वाण ८ ते १० महिन्यांच्या कालावधीमध्ये पक्व होतात. बहुविध पीक पद्धतीमध्ये उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी या गटाचा उपयोग होऊ शकतो. या गटामुळे नेहमीच्या १ लागवड व १ खोडवा पिकाच्या कालावधीमध्ये १ लागवड व २ खोडवा पिकाचे उत्पन्न मिळू शकते. या वाणांची लागवड नैर्ऋत्य मोसमी मॉन्सूनच्या आगमनानंतर (जून -जुलै) करतात व तोडणी ८-१० महिन्यांनंतर फेब्रुवारी- मार्चमध्ये (उन्हाळा ऋतू सुरू होण्याच्या अगोदर) होते. त्यामुळे मोसमी पावसाचा योग्य वापर करून कमी खर्चात अतिलवकर पक्व गटातील उसाचे उत्पादन घेता येऊ शकते. उदा. को ११०१५. या वाणाची उभार वाढ अवस्था कमी दिवसांची असल्यामुळे उत्पादन कमी राहते. पर्यायाने हा गट शेतकऱ्यांमध्ये तितका लोकप्रिय झालेला नाही.

डॉ. गणेश पवार ९६६५९६२६१७

डॉ. अभिनंदन पाटील ९७३७२७५८२१

(वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट, मांजरी, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com