
Nashik News: नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी बुधवारी (ता. २३) मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या तिन्ही मंत्र्यांसमवेत बैठक झाली. या बैठकीत विविध सूचना करण्यात आल्या. सक्तीची कर्जवसुली नको, शेतकऱ्यांना कर्ज भरावे लागेल; मात्र सवलती देऊन सरळ व्याज लावण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. २३) झालेल्या बैठकीत राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांनी सादरीकरण केले. त्यात नफ्याचा विचार न करता थकबाकी वसुलीला प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या. या बैठकीला कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे चार मंत्री उपस्थित होते. यापूर्वी कोकाटे यांनी राज्य सहकारी बँकेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती.
जिल्हा बँक वाचविण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत आमदार दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, नितीन पवार ऑनलाइन सहभागी झाले होते. बँकेचे १२७ कर्जदार मृत झाले आहेत. या कर्जदारांच्या वारसांकडून केवळ मुद्दल वसूल करण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या.
बँकेला तातडीची गरज म्हणून ९०० कोटी रुपयांची गरज आहे. संदर्भात राज्य सहकारी बँकेने ही मदत करावी, अशी जिल्हा बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांची मागणी होती. लोकप्रतिनिधींनी यापूर्वीच बँक वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी विविध आमदार आणि खासदारांनी बँकेत ठेवी ठेवल्या. आगामी काळात राज्य सहकारी बँकेच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या वसुलीला गती देण्यात येईल. यांसह व्याजात सवलत आणि सरळ व्याज पद्धतीने आकारणीचा निर्णय झाला.
प्रशासन या संदर्भात शेतकऱ्यांकडे जाऊन वसुली करणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीवर भर देताना एक रकमी परतफेड योजनेतून त्यांना सवलत देण्याचा निर्णय झाला आहे. थकबाकीदारांनाही वसुलीसाठी सवलती दिल्या जातील त्यामुळे शेतकऱ्यांचे बँकेतील व्यवहार वाढवून रोखता वाढण्यास मदत होईल. त्यामुळे बँकेच्या आर्थिक अडचणीतून मार्ग निघेल असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.