
थोडक्यात माहिती :
कपाशी उत्पादनवाढीसाठी आकस्मिक मर नियंत्रण, जलसंवर्धन, आणि संरक्षित ओलीत नियोजन अत्यंत आवश्यक आहे.
गुलाबी बोंड अळी व रसशोषक किडींवर वेळेवर निरीक्षण आणि शिफारशीनुसार कीटकनाशकांचा वापर केल्यास नुकसान टाळता येते.
कायिक वाढ नियंत्रित करून शेंडे खुडणे किंवा वाढरोधक फवारणी केल्यास प्रति झाड बोंडांची संख्या व वजन वाढते.
आकस्मिक मर व्यवस्थापन
कपाशीमध्ये दिसणारी आकस्मिक मर हा रोग नाही. त्यासाठी कोणतीही बुरशी, जिवाणू किंवा विषाणू जबाबदार नाही. पावसाच्या दीर्घ खंडानंतर पडलेला भरपूर पाऊस आणि जमिनीत अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे मर दिसून येते.
लक्षणे ः कपाशीच्या रोगग्रस्त झाडांवरील पाने क्षीण व मलूल होतात. खालच्या बाजूने वाकतात व झाड मेल्यासारखे वाटते. झाडांमधील ताठरपणा कमी होऊन झाड सुकू लागते.
उपाययोजना ः कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम + १५० ग्रॅम युरिया प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे प्रती झाड १०० मिलि द्रावणाची झाडाच्या बुंध्याशी बांगडी पद्धतीने आळवणी करावी. झाडाचे खोड व्यवस्थित दाबून घ्यावे. आकस्मिक मर रोखण्यासाठी कपाशीच्या शेतात भेगा पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. यासाठी वेळोवेळी कोळपण्या उपयोगी ठरतात. (विद्यापीठ शिफारस)
मूलस्थानी जल संवर्धन
पिकाच्या वाढीच्या अवस्थेत किंवा शेवटच्या डवरणीच्या वेळी डवऱ्याच्या दात्याला दोरी बांधून सरी काढावी. त्यामुळे पाण्याचे मूलस्थानी संधारण होऊन ओलावा साठून राहतो. पावसात खंड पडल्यास हा ओलावा उपयोगी ठरतो.
कपाशी पिकामध्ये पेरणीनंतर ४० ते ६० दिवसांनी सऱ्या काढाव्यात. अतिवृष्टी झाल्यास जास्तीचे पाणी चर काढून बाहेर काढावे. कापूस पिकात मोठ्या अंतरात (दोन ओळींत) डवरा चालविताना दर ५० ते ६० फुटावर डवरा उचलावा. त्यामुळे पावसाचे पाणी मुरण्यास मदत होते. अशा प्रकारे मशागत केल्यास पावसाचे पाणी जागीच मुरण्यास मदत होते.
संरक्षित ओलीत व्यवस्थापन
पावसात खंड पडल्यास आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पावसाळ्यात पाण्याचा ताण जास्त पडल्यास पाण्याची गरज भासते अन्यथा नाही. कपाशीचे पिकास फुले लागल्यापासून बोंडे परिपक्व होईपर्यंत पाण्याची जास्त आवश्यकता असते.
एकदा बोंडे फुटून वेचणी सुरू झाली की पाणी देऊ नये. कपाशीचे पीक फुलावर असताना ताण पडल्यास व पाणी देण्याची सोय असल्यास १० ते १२ दिवसाच्या अंतराने २ ते ३ संरक्षित ओलीत एकसरी आड द्यावे.
ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन : ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचनाची सोय आहे, त्यांनी पीक वाढीच्या अवस्थेनुसार व गरजेनुसार पाणी देता येते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याची गरज, ड्रीपरची प्रवाह क्षमता, भारनियमन यांचा अंदाज घेत पाणी द्यावे. यामुळे पाण्याची ५० टक्क्यांपर्यंत, तर रासायनिक खतांची २५ टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते.
कीड सर्वेक्षण व व्यवस्थापन
आपल्या देशात कपाशीची उत्पादकता कमी असण्यामध्ये किडींचा प्रादुर्भाव हे प्रमुख कारण आहे. बीटी कपाशी वाण आल्यानंतर ठिपक्यांची, हिरवी अशा बोंड अळ्यांचे प्रमाण काहीसे कमी झाले असले तरी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. मागील वर्षी काही भागांत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या काळातच बीटी कपाशीमध्ये आढळला होता. या वर्षीही पूर्वहंगामी कपाशी पिकांमध्ये काही प्रमाणात त्यांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे.
अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या बोंडात शिरतात व तिथेच ८ ते २८ दिवसांची अळी अवस्था पूर्ण करतात. त्यानंतर बोंडाला गोल छिद्र करून बाहेर पडतात. जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्यात किंवा ढेकळांखाली किंवा उमललेल्या बोंडातील कापसावर कोषामध्ये जाते. कोषावस्था ६ ते २० दिवसांची असते. गुलाबी बोंड अळीची वाढ साधारणत: उष्ण व ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्या सरीची जोड असल्यास झपाट्याने होते.
बोंड अळीमुळे होणारे नुकसान
प्रादुर्भाव झालेली फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. यालाच ‘डोम कळी’ म्हणतात. या बोंड अळीचा प्रादुर्भाव हिरव्या बोंडामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. अळी एकदा बोंडामध्ये शिरली की बोंडावरील छिद्र बंद होत असल्याने बाहेरून अळीचा प्रादुर्भाव सहजासहजी दिसून येत नाही.
परंतु हिरवी बोंडे फोडून पाहिल्यानंतर आतमध्ये गुलाबी रंगाच्या अळ्या दिसतात. अशी प्रादुर्भावग्रस्त बोंडे परिपक्व न होताच उमलतात. त्यामुळे कपाशीची प्रत बिघडते. बोंडातील अळ्या रुईमधून छिद्र करून सरकी खातात. एका बोंडामध्ये एक अथवा अनेक अळ्या आपला जीवनक्रम पूर्ण करू शकतात. त्यामुळे रुईची प्रत खालावते. सरकीतील तेलाचे प्रमाण घटते. बियाण्याची उगवण शक्ती कमी होते.
गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन
आठवड्यातून एकवेळा कपाशीच्या शेतातील १२ ते १४ झाडांचे निरीक्षण करावे. ही झाडे शेताचे प्रतिनिधित्व करतील अशी निवडावीत. या झाडावरील एकंदर पात्या, कळ्या, फुले आणि हिरवी बोंडे मोजावीत. यापैकी गुलाबी बोंड अळीने प्रादुर्भावग्रस्त असलेल्या बोंडांची संख्या मोजावी. विशेषतः डोमकळ्या दिसतात का, ते पाहावे. नुकसानीचे प्रमाण ५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास गुलाबी बोंड अळ्यांच्या व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात.
पीक ४५ ते ५० दिवसांचे झाल्यावर कपाशीच्या शेतामध्ये बोंड अळ्यांच्या सर्वेक्षणासाठी २ कामगंध सापळे प्रति एकर शेतात उभारावेत. मोठ्या प्रमाणामध्ये नर पतंग जेरबंद करण्यासाठी हेक्टरी २० कामगंध सापळ्यांचा वापर करावा. बोंड अळ्यांच्या प्रकाराप्रमाणे योग्य ल्युअर वापरावे. दर महिन्याला ते बदलावे.
गुलाबी बोंड अळी सर्वेक्षणासाठी गॉसील्युअरयुक्त गंधसापळे पिकापेक्षा एक ते दीड फूट उंचीवर हेक्टरी ५ लावावेत. त्यात २ ते ३ दिवस सतत ८ ते १० पतंग आढळल्यास त्वरित व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.
बीटी कपाशीच्या शेतात हिरवी बोंडे फोडून नियमित सर्व्हेक्षण करणे. गुलाबी बोंड अळ्यांचा प्रादुर्भाव १० टक्के असल्यास व्यवस्थापनाचे उपाय अंमलात आणावेत.
नुकसानीचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास डोमकळ्या जमा करून नष्ट कराव्यात.
ट्रायकोग्रामा स्पे. या परोपजीवी कीटकांची अंडी असलेली ट्रायको कार्ड लावावीत (१.५ लाख अंडी प्रति हेक्टर)
पिकावर मित्र कीटक (लेडी बर्ड बीटल, क्रायसोपा) व किडी (मावा, तुडतुडे, फुलकिडे, अळ्या व बोंड अळ्या) याचे प्रमाण १:५ आढळल्यास रासायनिक कीटकनाशकाऐवजी निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टिन (३०० पीपीएम) ५ मिलि प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.
हिरव्या बोंड अळीचे नुकसान ५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास, *एचएएनपीव्ही (२५० एल.ई.) प्रति हेक्टरी किंवा १०० मिलि प्रति १०० लिटर पाणी प्रती एकरासाठी.) (*विद्यापीठाची शिफारस)
मॉन्सूनपूर्व कपाशीची अर्धवट उमटलेली फुले (डोम कळ्या) तोडून जाळाव्यात.
रासायनिक नियंत्रण -
(फवारणी प्रमाण प्रति १० लिटर पाणी)
हिरव्या बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक असल्यास, स्पिनोसॅड (४५ एस.सी.) २.२२ मिलि. अधिक बीटा- सायफ्लुथ्रीन (२.५ टक्के प्रवाही) १० मिलि (टॅंक मिक्स) (लेबल क्लेम) गुलाबी बोंड अळीने १० टक्के फुलांचे किंवा हिरव्या बोंडाचे नुकसान केल्यास किंवा ८-१० पतंग सतत तीन दिवस प्रति कामगंध सापळा या प्रमाणात आढळल्यास १० टक्के नुकसानासह हिरव्या बोंडामध्ये जिवंत गुलाबी बोंड अळ्या असल्यास सुरुवातीच्या काळात क्लोरपायरिफॉस (५० टक्के ईसी) २० मिलि किंवा प्रोफेनोफॉस (५० टक्के ईसी) ३० मिलि किंवा थायोडीकार्ब (७५ टक्के डब्ल्यूपी) २० ग्रॅम.
गरज भासल्यास, इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के एजी) ४ ग्रॅम. (लेबल क्लेम)
रस शोषक किडींचे व्यवस्थापन
कपाशीमध्ये प्रामुख्याने मावा, तुडतुडे, पांढरी माशी तसेच फुलकिडे या किडींचा प्रादुर्भाव होतो. रस शोषक किडींच्या व्यवस्थापनाकरिता पिवळ्या चिकट सापळे वापरावेत.
रस शोषक किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास, फवारणी प्रति १० लिटर पाणी ॲसिटामिप्रीड (२० एसपी) १५ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के एस.एल.) २ मिलि किंवा प्रोफेनोफॉस (५० टक्के ई.सी.) २० मिलि. (लेबल क्लेम)
कापूस पीक संरचना व्यवस्थापन (कायिक वाढ थांबवणे)
सुपीक जमीन, रासायनिक खतांचा वापर आणि त्याला संरक्षित ओलिताची जोड मिळाल्याने कापूस पिकाची कायिक वाढ जास्त होते. परिणामी फुले, पात्या व बोंडगळचे प्रमाण वाढते. उत्पादन घटते. हे टाळण्यासाठी वेळीच कायिक वाढ रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असते.
कापूस पिकाच्या संरचना व्यवस्थापन करताना ५०-६० दिवसांनी गळ फांद्या (म्हणजेच कायिक फांद्या) कापणे, त्यानंतर ७५-८० दिवसांनी (१०० सेंमी उंचीवर) वाढणारे शेंडे खुडणे याकडे लक्ष दिले पाहिजे. हे तंत्रज्ञान योग्यपणे वापरल्यास कापसाच्या बोंडाचे वजन तसेच प्रति झाड बोंडाची संख्या वाढते. तसेच कापूस उत्पादनात २० ते २२ टक्क्यांपर्यंत वाढ मिळत असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन प्रक्षेत्रावर केलेल्या प्रयोगामध्ये दिसून आले आहे.
या तंत्रज्ञानामध्ये कापूस पिकाच्या गळ फांद्या कापणे व शेंडे खुडण्याला पर्याय म्हणून वाढ रोधक संजीवकाच्या दोन फवारण्याही फायदेशीर ठरत असल्याचे तीन वर्षाच्या प्रयोगाचे निष्कर्ष आहेत. त्यामध्ये *मेपीक्वॉट क्लोराइड या वाढरोधकाच्या दोन फवारण्या करता येतील. त्यातील पहिली फवारणी ४५ ते ५० दिवसांनी १० मिलि प्रति १० लिटरप्रमाणे व दुसरी फवारणी ६० ते ६५ दिवसांनी १२ मिलि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात करावी. (*लेबल क्लेम) त्यामुळे सुरुवातीची बोंडे लवकर पक्व होऊन उत्पादनात वाढ होते.
- डॉ. संजय काकडे, ९८२२२३८७८०,
कृषी विद्यावेत्ता, कापूस संशोधन विभाग,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
कपाशी पिकात आकस्मिक मर का होते?
👉 ती बुरशीजन्य नसून जमिनीत जास्त ओलावा आणि पावसाच्या लहरीमुळे होते.
गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कधी वाढतो?
👉 उष्ण, ढगाळ वातावरण आणि हलक्या सरीसह अळी झपाट्याने वाढते.
रसशोषक किडी नियंत्रणासाठी कोणते सापळे वापरावेत?
👉 पिवळे चिकट सापळे रसशोषक किडींसाठी उपयुक्त ठरतात.
कायिक वाढ थांबवण्यासाठी कोणती फवारणी करावी?
👉 मेपीक्वॉट क्लोराइडची २ वेळा शिफारसीप्रमाणे फवारणी फायदेशीर ठरते.
कपाशीतील जलसंवर्धनासाठी काय करावे?
👉 डवऱ्याला दोरी बांधून सरी काढाव्यात व वेळेवर कोळपणी करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.