लक्ष्मण खेडकर
Village Update : रविवाराची सुट्टी संपवून सकाळी सकाळी गावाकडून शाळेच्या गावाकडं निघालो होतो. वीस पंचवीस किलोमीटर आल्यावर अंतारवली नावाच्या गावाच्या फाट्याहून पुढं एक म्हातारे आजोबा एकटेच रस्त्याने चाललेले दिसले. गाडी थांबवून मी विचारलं कुठं निघालो बाबा! तसे ते म्हणाले, लेकीकडं चाललोय, मी म्हणलो बसा. बाबा गाडीवर बसल्यावर मी चौकशी सुरू केली, एवढ्या सकाळ सकाळ पायीपायीच निघाले?
इकडं आडमार्गी एसट्या नाहीत, अन पहिल्यापासून पायीच चालायची सवयं, त्यांनी मला नाव गाव विचारलं, मी सांगितलं, ते म्हणाले मुंगूसवाडात हाईत बरं का आमचे पाहुणे त्यांनी चार दोन जनाचे नावं सांगितली. त्यातलं एक ही माझ्या लक्षात येईना, तरी मी नुसताच हो हो म्हणत होतो. ते बोलायचे थांबल्यावर मी विचारलं? कोणत्या गावात राहाते लेक. ते म्हणाले गदेवाडीच्या शिवारात, मला विचारलं तुम्ही कुठं निघलो, मी म्हणालो पैठणला चाललोय, ते म्हणाले मग मला चापडगावापोस्तर येऊद्या तिथं सोडा तिथून जाईन चालत ,मी ठिकय म्हणालो.
मला वाटलं तिथलेच आसपासच्या गावचे असतील पण अधिक चौकशी केली तेव्हा कळलं की ते मंगरूळचे आहेत. इकडं पाहुण्याकडं आले होते. इथून लेकीकडं निघाले होते. मी म्हणालो तेवढ्या लांब एकटेच पायी पायी निघालेत. ते मला मला पायी पायी चालायची सवय हे पहिल्यापासून ते त्यांचे त्यांच्या तरूनपणाचे अनुभव सांगू लागले.
"एकदा असंच भल्यापहाट उठून मी खांद्यावर धोतार टाकून पैठणला वारीला गेलो होतो. पैठणला गेलो. नाथाचं दर्शन घेतलं. लेकराबाळाला खाऊ घेतला अन निघलो माघारी तर चांगटपुरीच्या जवळ झाकड पडता पडता दोघातिघाने अडवून माझ्या तंबाखूच्या बट्ट्यातले पैसे काढून घेतले. धोतराच्या कोपऱ्यात बांधून चाललेला खाऊ सोडून घेतला अन मला रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळीच्या काटात ढकलून दिलं. मी आरडाओरडा केला तव्हा मागून येणाऱ्या माणसांने मला काट्यातून बाहेर काढलं त्याच्या सोबत मग मी गावाकड परतलो. आमच्या वेळस आताच्या सारखी वहान नसती, बाजाराला पण आम्ही पायी पायीच जायचो, घरुन नेहलेली चटणी भाकरी खायचो, तवा कशाचा वडापाव अन कशाचा फळ भत्ता, चाराण्याचे चिपटभर फुटाणे यायचे ते घ्यायचोत अन कोपरीच्या खिशात टाकून सा-या वाटाने खात खात यायचोत रस्त्यात कुठं वढ्या वघळीला पाणी असलं तेच प्यायचो." आजोबा सांगत होते मी ऐकत होतो. अधूनमधून मी ही एखादा प्रश्न विचारायचो.
बोलता बोलता मी म्हणालो "पण खायप्यायची मज्जा होती तुमची." "गाई म्हशींचं दूध अन सकस गावरान अन्न ते खरयं पण ते तरी कुठं पोटभर मिळत होतं. बाजरीच्याच भाकरी अन बाजरीच्या च् पिठाचा खळगूट ,चटणी हाईत तॅल नही, दुष्काळाच्या साली तर आम्ही बरबाड्याच्या भाकरी करून खाल्ल्या, राहायचे तर इचारूच नका, चार चार खणाचे माळादाचे घर त्याच्यातचं सगळे, पाऊस आला की गळाचे, बुड ठेकायला जागा मिळायची, एवढ्या एवढ्या घरात सगळे राहायचे म्हतारा म्हातारी, लेक सुना सगळे त्याच्यातचं तवा आम्ही भाकरी तुकडा खायच्या आधी देवळात गोधाडे आथरून जागा धरायचो अन घरी भाकर तुकडा खायाला जायचो, मागं येईस्तोवर कुणीतरी आमचे गोधाडे फेकून देवून त्या जागेवर झोपलेलं असायचं, असे हाल होतं तव्हा आमचे रहाया खायाचे अन् ल्यायाच्या कपड्याचं तर इचारुच नका आमच्या दोघा भावात एक सदरा होतं तो आम्ही कुठं गावाशिवाला जायचं असलं तर घालीत."
आमच्या गप्पा सुरुचं होत्या तेवढ्यात चापडगाव आलं. मी विचारलं "उतरायचयं का बाबा इथं. मी मधून जाणार नाहीय." तसे बाबा म्हणाले, "मला तिकडं शिवाला उतरवा मी जाईन तिथून चालत." थोडासा पुढं गेल्यावर बाबा म्हणाले "थांबा थांबा मला इथं उतरू द्या मी जातो इथून चालत, इथून जवळयं."
म्हाता-याला एवढ्या लांबून आणलयं, अर्ध्यात कशाला सोडायचं म्हणत मी त्याची लेक राहातं असलेल्या कच्च्या रस्त्याच्या मार्गाने गाडी घेतली. चांगल्या रस्त्याने जाऊस्तोर जाऊ मधून कच्च्या रस्त्याने दोन अडीच किलोमीटर. बाबाला मी थेट त्याच्या लेकीच्या दारात नेहून सोडलं बाबाने चहाचा आग्रह केला पण मला पुढं जायला उशिर होत होता म्हणून मी थांबली नाही. दहा बारा किलोमीटरचं अंतर पार करूसतोर बाबांकडून खूप काही गोष्टी ऐकायला मिळाल्या. खरचं, चालता बोलता दस्तावेज असतात ही माणसं पण यांची नोंद घेतली जात नाही कुठचं. ही माणसं गेली की आठवणी ही जातात त्यांच्या सोबत. गरिबी हालअपेष्टा सोसत संकटाचा सामना करत आयुष्य जगलेली ही माणसं दीपस्तंभासारखी असतात पण आम्ही फारसं लक्ष देत नाहीत त्याच्याकडं. त्यांच्या संघर्षमय जीवनानुभवाकडं.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.