
The Fight Against Human Exploitation : महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनावरील ‘सत्यशोधक’ हा चित्रपट ५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. फुले दांपत्याच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक संघर्षावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
कथित राष्ट्रवाद आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या उन्मादामुळे गढूळलेल्या अस्वस्थ वर्तमानात फुले दांपत्यावर सिनेमा येणे विशेष महत्त्वपूर्ण ठरते. दिग्दर्शक नीलेश जळमकर यांनी हे शिवधनुष्य उचलले आहे.
या चित्रपटात जोतीरावांची भूमिका अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी, तर सावित्रीबाईंची भूमिका राजश्री देशपांडे यांनी साकारली आहे. सत्यशोधक हा जोतीरावांचा बायोपिक आहे. त्यामुळे त्यांची भूमिका साकारणारे संदीप कुलकर्णी पडद्यावर अधिक काळ दिसत राहतात.
पेशवाईचा पराभव नुकताच झाला होता. पुण्यातील शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकत होता. जाती आणि धर्माच्या नावाखाली बहुजन जनतेची पिळवणूक सुरूच होती.
समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती यामुळे गरीब, शोषित, शेतकरी आणि कष्टकरी बहुजन समाज पिळवटून निघाला होता. या सामाजिक-राजकीय पार्श्वभूमीवर फुलेंचे बालपण आकार घेत होते. सुरुवातीला घरातूनच शिक्षणाला विरोध, लहुजी वस्तादांच्या तालमीतील कसरती, शिक्षणात पडलेला खंड, सावित्रीबाईंशी लग्न, नंतर मिशनरी शाळेतील प्रवेश,
लहानपणीच पुण्यातील भट-ब्राह्मणांकडून जातभेदाची मिळालेली वागणूक आणि स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेलकडून त्यानंतर मिळलेलं ‘थॉमस पेन’चे ‘द राइट्स ऑफ मॅन’! एकानंतर एक पडद्यावर घडणाऱ्या घटना फुलेंच्या बालपणीचा आलेख अवघ्या काही मिनिटांत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो. आणि मग सुरू होते एका संघर्षाच्या लढ्याची कहाणी.
फुले दांपत्याने एकाच वेळी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक पातळीवरचा संघर्ष कसा केला, याचीच गोष्ट पुढे सिनेमात पाहायला मिळते. निडर आणि आक्रमक सत्यशोधक जोतीरावांचे आयुष्य खडतर होते.
परंतु त्यामध्ये सावित्रीबाई त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रस्थापित भट-ब्राह्मणांशी संघर्ष करत होत्या. या संघर्षात कुठेही सावित्रीबाई कमी पडल्या नाहीत, याचे भान ठेवूनच दिग्दर्शकाने दोघांचे सहजीवन सिनेमात दाखवले आहे. त्यामुळे बायोपिक सिनेमाच्या काही मर्यादा असल्या तरीही दिग्दर्शकाने हा फॉर्म खुबीने हाताळला आहे.
स्त्री शिक्षणाचा पाया घालण्यासाठी जोतीराव आणि सावित्रीबाईंनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली तेव्हा सावित्रीबाईंवर भट-ब्राह्मणांनी शेण-दगडफेक केली. पण समाजहितासाठी सर्वस्व पणाला लावणारे फुले दांपत्य एक पाऊलही मागे हटले नाही.
सिनेमातील या प्रसंगात फुले दांपत्याची तळमळ आणि खमकेपणा यांचे मिश्रण अत्यंत सुरेख पद्धतीने संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे यांच्या अभिनयातून दिसते. हे दोघेही सशक्त, संवेदनशील व सर्जनशील अभिनेते आहेत. त्यांनी आपापल्या भूमिका ताकदीने पेलल्या आहेत.
बहुजन समाजाच्या उद्धारासाठी तत्वनिष्ठ जोतीरावांनी शिक्षणाचे शस्त्र बहुजन समाजाच्या हाती दिले. त्यावरच जोतीराव थांबले नाही तर विचारी-विवेकी मूल्याधिष्ठित समाज घडविण्यासाठी ते शेवटपर्यंत झगडत राहिले. या संघर्षात सावित्रीबाईंसोबत लहुजी वस्ताद, कामगार नेते नारायण लोखंडे, कृष्णराव भालेकार, सदाशिव गोवंडे,
फातिमा शेख, मुक्ता साळवे, डॉ. विश्राम घोले यांची भक्कम साथ त्यांना मिळाली. समाज सुधारणेचा लढा त्यामुळेच तर अधिक आग्रहाने आणि गतीने पुढे रेटता आला. त्याचे संदर्भही सिनेमात चपखलपणे आले आहेत. त्यामुळे इतिहासातील काही नावांची नव्याने ओळख होते.
प्रस्थापित शोषणकारी व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपटल्यानंतर जोतीरावांचे अनेकांशी मतभेद झाले, परंतु त्यांनी मनात कटुता येऊ दिली नाही. पण त्याच वेळी जातीभेद-धर्मभेद करणाऱ्या प्रवृत्तीचा आक्रमकपणे विरोध केला. सिनेमात अशा प्रसंगांचे चित्रण परिणामकारक येत राहते.
सिनेमात मध्यंतराच्या पूर्वीच्या एका प्रसंगात जोतीराव मीठगंज प्राथमिक पुणे शाळेतील बहुजन विद्यार्थ्यांना परशुरामाची गोष्ट सांगत असतात. पशुराम देव आहे, असे म्हणतात तर तो समोर का येत नाही, असा प्रश्न विचारतात.
आणि मग पुढे विद्यार्थ्यांना स्वत:च सांगतात, की पशुराम काही देव वगैरे नाही. हा सगळा प्रसंग शाळेत घडत असताना शाळेतल्या सहकारी ब्राह्मण शिक्षकांना पटत नाही. जोतीराव वर्गातून बाहेर आल्यावर सहकारी ब्राह्मण शिक्षक जोतीरावांच्या हिंदू धर्म चिकित्सेच्या विरोधात भूमिका घेतात.
ते जोतीरावांना म्हणतात, की आपण फक्त शूद्रांना शिक्षण देण्याचा निश्चय केला होता. जेणेकरून त्यांना व्यावहारिक समज येईल. मात्र आपण त्या पुढे जात आहात. हिंदू धर्म आणि त्यातली परंपरेवर टीका करू नका...
त्या सहकारी शिक्षकाचे ऐकून फुलेंची तळपायाची आग मस्तकाला जाते. ‘‘मी विद्यार्थ्यांना धर्म आणि धर्मातून होणारे शोषण सांगणार. तुम्हाला पटत नसेल तर मी शाळा सोडून जातो. तुम्ही तुमच्या पद्धतीने शिकवा.
पण बहुजन लेकरांना शिक्षण देण्याचं काम मात्र बंद करू नका,’’ असे जोतीराव सुनावतात. या प्रसंगात जोतीरावांच्या वैचारिक स्पष्टतेसोबतच सामाजिक हिताची भूमिका झटक्यात नजरेत भरते. अशा अनेक प्रसंगातून जोतीरावांचा परिचय नव्याने होत राहतो.
दोनशे वर्षांपूर्वी शूद्राशूद्रांचा स्पर्शाचा विटाळ तथाकथित भट-ब्राह्मण वृदांना व्हायचा, त्याच भट-ब्राह्मणांना शूद्राशूद्रांची दक्षिणा मात्र सोडवत नव्हती. हे जुलमी जोखड दूर करण्यासाठी फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
सत्यशोधक विवाह पद्धतीसाठी न्यायालयीन लढा दिला. प्रसंगी चिवट ब्राह्मणी धर्माशी दोन हात करण्याची तयारी ठेवली. शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणाचे कसब, शिवाजी महाराजांवरील पोवाडा, गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म या जोतीरावांच्या लिखाणाची प्रक्रिया कशी आकार घेत गेली, याचे प्रसंगही तितकेच ठाशीवपणे चित्रपटात आले आहेत.
जोतीरावांच्या आर्थिक विचारात स्पष्टता होती. सामाजिक सुधारणाबरोबरच बहुजन समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आर्थिक पाया भक्कम लागतो, याची जाणीव त्यांना होती. जोतीराव कंत्राटदार होते.
पुण्यातील खडकवासला तलावाच्या बांधकामासाठी दगड पुरवण्याचे कंत्राट जोतीरावांकडे होते. अनेक महत्त्वाची कामे त्यांनी पूर्ण केली. पैसा कमवावा तो प्रामाणिक मार्गाने; त्यासाठी भ्रष्टाचार करू नये, यासाठी जोतीराव कसे आग्रही होते,
याचा एक अत्यंत मार्मिक प्रसंग सिनेमात पाहायला मिळतो. त्यामुळे फुलेंच्या दुर्लक्षित राहिलेल्या विचारांचे दालन प्रेक्षकांच्या समोर खुले होते. फुले दांपत्याच्या शैक्षणिक कार्याचा जेवढा बोलबाला झालेला आहे, त्या तुलनेने त्यांच्या अन्य सामाजिक कार्याचा झालेला नाही.
परंतु या चित्रपटात विधवा केशवपनाच्या विरोधातील न्हाव्यांचा संप, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, देवदासी प्रथेचा विरोध, विधवा विवाहाला प्रोत्साहन, दुष्काळात घरातील हौद अस्पृश्यांना खुला करण्याचा प्रसंग यासारख्या घटनांचे चित्तवेधक चित्रण पाहायला मिळते.
बायोपिक सिनेमा निर्मितीच्या मर्यादा लक्षात घेता ‘सत्यशोधक’मधील अभिनय, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन एकूणच जमून आले आहे. फुले दांपत्याच्या कर्तृत्वाचा रंजक असा अनुभव मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळतो. अडीच तासांचा हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच अंतर्मुख करून सोडतो. कारण मानवी मूल्याची कास धरून ज्ञानाधिष्ठित समाज निर्मितीची कथा हा चित्रपट सांगतो.
(लेखक ॲग्रोवन डिजिटलमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर आहेत.) ९८५०९०१०७३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.