Mahatma Phule : जोतीराव फुलेंना खुले पत्र

मी एक साधी शेतकरी बाई. शेतात आल्यावर शेतातली ही सिताफळाची झाडं बघून वाटतं, तात्यासाहेबांच्या शेतातली सिताफळाची झाडंही अशीच होती का ? झेंडूची फूलं तोडताना वाटतं, ज्या फुलांचे हार करता करता तुमच्या मनात समानतेचे, परिवर्तनाचे विचार रुजले ते हेच झेंडू असतील का ?
Jotiba Phule
Jotiba PhuleAgrowon

मी एक साधी शेतकरी बाई. शेतात आल्यावर शेतातली ही सिताफळाची झाडं बघून वाटतं, तात्यासाहेबांच्या शेतातली सिताफळाची झाडंही अशीच होती का ? झेंडूची फूलं तोडताना वाटतं, ज्या फुलांचे हार करता करता तुमच्या मनात समानतेचे, परिवर्तनाचे विचार रुजले ते हेच झेंडू असतील का ? हेच असतील तर आपल्याला का नाहीत पडत तशी स्वप्नं ? घरी गेल्यावर मी तुमची पुस्तकं काढून वाचते. पुस्तकातले विचार आजच्या काळाशी जुळवून बघते. तर लख्खकन तफावत जाणवते.

मग मनातली खदखद सांगण्यासाठी समोर तुम्ही दिसता. किती काय काय सांगायचं असतं, बोलायचं असतं. मग मी लिहायचा विचार करते. पण मनातलं सगळंच्या सगळं कुठं लिहिता येतं ? तुमची क्रांतीची भाषा, स्वार्थापलीकडं पोचलेले तुम्ही, तुमचे अनंत पैलू यापुढे मी अगदीच फिकी पडेन. आणि तात्यासाहेब, अशा एखाद्या लेखात तुमच्यासारख्या महात्म्याशी मी काय काय बोलणार ? तुमचं थोरपणाचं आभाळ मला थोडंच पेलता येणार आहे ? मी बापडी माझ्या अल्पमतीला वाटलं ते लिहिणार. पण मला माहीत आहे, ते तुम्हाला नक्कीच आवडेल कारण तळागाळातील एकंदर समस्त मानव स्रीपुरूषांच्या हितार्थ तुम्ही झटलात. मग माझं लिहिणं हे तुमच्या प्रयत्नांचाच भाग नव्हे काय ?

हे लिहिण्याचं धाडस तुमच्यामुळे आणि सावित्रीमाईंमुळे माझ्यात आलेलं आहे. वाडःमयीन वगैरे मुलाम्यात सजवलेल्या लेखनापर्यंत कदाचित पोचणारही नाहीत माझे हे शब्द. पण त्याची खंत मला अजिबात वाटत नाही. ज्या शेतकऱ्याच्या घरात जन्माला आले, वाढले, तशा अनेकांपर्यंत माझं म्हणणं पोचलं तरी खूप झालं. घरातल्यांनी शेतात काबाडकष्ट केलं म्हणून मी शाळेची पायरी चढू शकले. त्यांनी शेतामाळावरची उन्हं झेलली म्हणून मी वर्गातल्या सावलीत पुस्तकांची चार पानं उलटली.

Jotiba Phule
Agriculture Department : पणन संचालकपद ठरले औट घटकेचे

त्यांनी डोक्यावर पोत्याची कुची पांघरायला दिली आणि म्हणाले, काय करतोय पाऊस ? जा बघू शाळेत. ते म्हणाले, आडवाटांवरून चालणं हे काहीच नाही, सावित्रीमाईंनी तर शेणाचे गोळे झेलले होते. जा शिक. मी लिहिलेल्या शब्दांना शाबासकी देत ते म्हणाले, वा रे पठ्ठे. त्यांनी चुलीच्या धुरात भाकरी कालवण केलं म्हणून मी दिव्यापुढं वाकून अभ्यास केला. ज्या घरी लग्न होऊन आले ते म्हणाले, एक काम कमी कर पण लेखन वाचन सोडू नको. स्वयंपाकपाणी, संसार सगळेच करतात तू संसारात साहित्याचंही वाण घे. चिखलातले पाय उचलता उचलता अक्षरांची नक्षी उमटत गेली. कुठं कागदाची चिटोरी पडलेली दिसली की उचलून वाचली. कामं करता करता बोलत राहिले भवतालाशी. कधी कशासाठी हट्ट न करणारी मी पुस्तकांसाठी मात्र हटून बसले.

बघा आता तात्यासाहेब, मी माझ्याबद्दलच बोलत बसले. तुम्हीच सांगा, माणूस अगोदर बोलेल कशाबद्दल ? तर स्वतःबद्दल आणि भवतालाबद्दलच ना ! तर यंदाचं बघा ना, अगोदरचा दुष्काळ पावसाळ्याच्या आशेवर काढला. पाऊस आला. आनंद झाला. क्षणभराचा आनंद आम्ही अजून एकमेकांना सांगत होतो. तोवर आनंदावर पाणी फिरलं. अती झालं. हातातोंडाशी आलेले घास मातीमोल झाले. कणसातले दाणे कणसातच उगवून आल्यावर काय करायचं जोतीरावतात्या ? पोशिंदा डोक्याला हात लावून बसला. ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस आली.

शेतमजूरांच्या हाताला कामं नाहीत. हातावर पोटं असणा-यांची बिकट अवस्था. कोलमडलेल्या पोशिंद्याला आधार देऊन जिनं उभं करायला पाहिजे ती राज्यव्यवस्था सत्तेच्या गुंगीत आहे. तुटपुंज्या का होईना मिळणा-या मदतीकडं डोळे लावून बसलेल्या लोकांना काही काळानं गप्प बसावं लागतं, हे काही नवीन नाही. हे सांगायचं कुणाला ? कोण दखल घेणार ? समाजाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणारे तुम्ही. तुम्ही इतिहास नीट समजून घ्यायला सांगितला, तपासायला सांगितला. बळीराजाची स्थिती तुमच्या काळातही फार वेगळी नव्हती. आजची परिस्थितीही फार बदललेली नाही. हा संघर्षाचा इतिहास आहे. यातून शिकून सवरून पुढची पावलं टाकायला पाहिजेत ना ?

तुमची ओळख पहिल्यांदा कधी झाली ते सांगते. शाळेच्या पुस्तकात एक धडा होता. त्यातील मुलगा दिवसभर शेतात राबून रात्री मिणमिणत्या समईपुढं वाकून अभ्यास करत होता. अभ्यास करणा-या एका चुणचुणीत मुलाचं चित्रं होतं ते. शिकून शहाणं होऊ पाहणाऱ्या, परंपरांना आडवं येणाऱ्या त्या मुलाचं शिक्षण बंद करा, असं लोक गोविंदरावांना सांगत होते. लोकांचं ऐकून तेही मुलाला शाळेत जाऊ देत नव्हते. पण शिक्षणात खंड पडला तरी त्या मुलाचा वाचनाचा नाद सुटला नव्हता. ते बघून वडिलांनी पुन्हा त्याची शाळा सुरू केली होती.

Jotiba Phule
Department of Agriculture : ... तरच ऑनलाइन मार्केटिंग हितकारक

त्या गोष्टीत तो मुलगा मानवाचे हक्क(राईटस् ऑफ मॅन) वाचत होता. तो मुलगा म्हणजे तुम्ही होतात तात्यासाहेब ! तेव्हा मला प्रश्न पडला होता की समईच्या मिणमिणत्या उजेडात तुम्ही कसला उजेड शोधत होतात ? कोणत्या उजेडाच्या शोधात तो किर् अंधार चिरत होतात ? गोरगरिबांविषयी, शोषितांविषयी मानवमुक्तीचा तुमचा कळवळा तेव्हा माहीत झाला. त्या वाचनाने तुम्हाला विचारांची दिशा दिली. त्यासाठी तुम्ही अविरत त्याग केला, संकटं झेलली. गोरगरीबांना त्यांचे हक्क माहीत नाहीत हेच त्यांच्या दुःखाचे कारण तुम्हाला सापडले. तुम्ही सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी झटत होतात. पण विरोधक तुम्हाला त्रास देण्यात जराही कसूर ठेवत नव्हते. त्या गोष्टीत पुढे तुम्हाला जीवे मारण्याची सुपारी घेऊन आलेले रोड्या रामोशी आणि धोंडीराम कुंभार यांना तुम्ही म्हणालात,

‘मारा बाबांनो. मला मारुन तुमच्या पोराबाळांना चार सुखाचे दिवस येणार असतील तर खुशाल मारा. तुमच्यासारख्या गरीबांना सुख मिळावं म्हणून तर आम्ही झटतोय. तुम्ही पैशासाठी मला मारताय. पण या पैशातून तुमच्या पोराबाळांना शिकवा, शहाणं करा. म्हणजे पैसे घेऊन दुसऱ्याचा मुडदा पाडण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. चला चालवा तुमची हत्यारं.’ तुमच्या शब्दांनी मारेकऱ्यांना त्यांची चूक लक्षात आली. तुम्ही त्यांना समजावताना म्हणालात, ‘दुसऱ्याला मारुन आपलं जीवन बदलत नसतं. मारायचंच असेल तर तुमच्यातलं अज्ञान मारा.’ हा प्रसंग वाचल्यापासून तुम्ही मला खूप जवळचे वाटत आलात तात्यासाहेब.

Jotiba Phule
Agriculture Officer : कृषी अधिकाऱ्याचे शेतकऱ्यांकडून स्वागत

नुकतीच मी पुण्यातल्या महात्मा फुले वाडयात गेले होते. तुमच्या विचारांनी भारावलेला हा वाडा. पायरीवर जरा टेकले होते. पुन्हा पुन्हा मन भरून येत होतं. खरं सांगू तात्यासाहेब, तुम्ही ज्या तळागाळातल्या माणसांचा विचार केला, त्यांना ख-या अर्थानं माणसांत आणलं ती माणसं माझ्याभोवती गोळा झाली होती. ती हात जोडून तुम्हाला मायबाप म्हणत होती आणि तुम्ही त्यांना घरातली पाण्याची विहीर खुली करून देत होतात, विधवांना आधार देत होतात, भटांना न घाबरता शुद्रांच्या बाजूनं उभं रहात होतात.

ती फाटकी माणसं लांबून लांबून त्यांची गा-हाणी सांगायला तुमच्याकडे येत होती. तुमचा आधार वाटायचा त्यांना. त्यातला एकजण सांगत होता ‘त्यांची घरे भरिता भरिता माझी घरे गेली, दारे गेली, शेते गेली, पोती गेली आणि माझ्या घरातील चिजबस्ता जाऊन बायकोच्या अंगावर फुटका मणीसुद्धा राहिला नाही. शेवटी आम्ही तडाडा उपाशी मरु लागलो.’ फाटलेली बंडी वर ओढत तो डोळे पुसत होता. तेव्हा त्याचे खपाटीला गेलेले पोट बघून तुम्ही त्याला घरात नेले. सावित्रीमाईंना भाकरी करायला लावून पोटभर जेवायला घातले आणि त्याला मदतीचं आश्वासन दिलं.

Jotiba Phule
Agriculture And OPEC : ओपेकचा अन्‌ शेतीचा काय संबंध?

जोतीरावतात्या, आम्ही स्रिया आम्हाला माणूस म्हणून जगता यावं म्हणून आजही धडपडतो. स्रियांना किमान काही मानवी हक्क आहेत हेही या समाजाला मान्य नव्हतं. स्रीचे जीवन म्हणजे गुलामी होती. स्रियांना शिक्षण देणे म्हणजे माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखं होईल म्हणून त्यांना गुलामीच योग्य आहे असं मानना-या समाजात तुम्ही थेट स्रियांसाठी शाळाच काढली. स्रियांचं माणूसपण नाकारणा-या काळात शिक्षणाचं महत्त्व जाणणारे तुम्ही क्रांतीबा आहात.

इतक्या वर्षांचा काळ लोटला. तेव्हा तुम्ही समाजाविषयी जे खणखणीत विचार मांडले ते वाचताना, ऐकताना किती अभिमान वाटतो तुमचा. जे बोलले ते करुन दाखवणारे तुम्ही प्रचंड पहाडासारखे वाटता आम्हाला. म्हणूनच आम्ही तुम्हाला सेंद्रीय विचारवंत म्हणतो. मानसिक गुलामगिरीची जाणीव तुम्ही तेव्हा करून दिलीत. ती आजही आचरणात आणताना अचंबा वाटतो. निर्मिक आणि माणूस यातली स्वार्थी मध्यस्थी तुम्ही नकारली, पण आम्ही अजूनही त्याच गर्तेत आहोत. लोकांच्या डोळ्यावर येऊ नये म्हणून मुलीला पोत्यात घालून शाळेत आणलेला प्रसंग डोळ्यासमोरून जात नाही. आशिया खंडात मुलींसाठी पहिली शाळा काढणारे तुम्ही. पण आज भिडे वाड्यातल्या त्या पहिल्या शाळेची दुरावस्था बघवत नाही.

Jotiba Phule
Agriculture OPEC : ‘ओपेक’ समजून घेण्यात शेतकऱ्यांचे हित

आज आमच्या घराघरांत लाईटचा लखलखाट आहे. रात्रीचा अंधार आम्हाला इकडे तिकडे शोधावा लागतो. तर तिथेही उजेडाचे ठिपके असतातच. उजेडाबद्दल माझी तक्रारच नाही. पण सांगायचं इतकंच आहे की तुम्ही तळमळीने समाजाला अंधारातून बाहेर काढण्यासाठी समईपुढे उजेड शोधत होतात. आम्हाला उजेडातही आमच्या आतला उजेड सापडत नाही. ज्ञानाचे धुकधुकते दिवे बघून तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही अनेकांच्या निबंधातून, धड्यातून, भाषणातून, नाटकातून, एक पात्री प्रयोगातून, पोवाड्यातून भेटत राहिलात. म्हणून तुमच्याशी जुळलेला धागा निसटत नाही.

देव्हाऱ्यातल्या चांदीच्या मुलामा दिलेल्या देवांपुढे सकाळ-संध्याकाळ सुगंधी उदबत्त्या, फूलं, रांगोळ्या असतात. पण ख-या विचारवंतांच्या फोटोवरची धूळ जयंती, पुण्यतिथीला झटकायची आणि पुन्हा फोटो कोप-यात सरकवला की झाले आपले काम या भ्रमात रहायचे हे पटत नाही मनाला. तात्यासाहेब, कुणाच्या घरात आपला फोटो असावा कसं कधी तुमच्या मनातही आलं नसेल.

Jotiba Phule
Heroes of Agriculture : दिव्यांगात्त्वार मात करून लढताहेत शेतीतले वीर

पण तुमच्या विचारांची, आचारांची समाजाला गरज असताना तुम्हाला फोटोत अडकवल्याची खंत वाटते. तुमच्या विचारांचे महत्त्व काहींना कळाले, काहींनी दुर्लक्ष केले. तुम्ही शेतकऱ्यांच्या हातात असूड दिला. हा असूड विद्येचा, सदविचारांचा, बदलांचा होता. पण आम्ही तो कायम मुक्या जितराबांना वठणीवर आणण्यासाठी वापरला. आम्ही असूड आणि जितराबांची जोडी जुळवून ठेवली. तुम्ही लोकांना ज्ञानी करण्याचं काम केलं आणि लोकांनी सरळसरळ तुम्हाला बाजूला सारलं, याचं वाईट वाटतं. तुम्ही तेव्हा निर्मिक म्हणालात आणि आम्ही अजूनही देवदेव करत फिरतोय.

तात्यासाहेब, तुम्ही म्हणाला होतात की, शेतकीचे शिक्षण शाळांमधून दिले जावे. पण सध्या शाळेच्या अभ्यासक्रमातून शेती हा विषय गायब झालेला आहे. शिवाय शेती करणारा माणूस गरीब, दरिद्री दाखवला गेला तर कुणाला शेतीची ओढ वाटेल ? एकीकडं शेतकरी, कष्टकरी यांच्याविषयी कळवळ्याचा दिखावा करायचा आणि दुसरीकडे हे लोक गरीब कसे राहतील यासाठी प्रयत्न करायचे, ही आजची मानसिकता आहे. एकीकडे मोठ्या मोठ्या शिक्षणसंस्था काढायच्या आणि दुसरीकडे आर्थिक स्थिती नसेल तर शिकू नका, घरी बसा म्हणायचं याला काय म्हणायचं ? शिक्षणाच्या दर्जाबाबत तोंडावर बोट ठेवावे लागते.

पदवीधरांची संख्या वाढते पण पात्रता नसते. शिक्षणाचा बाजार मांडलेला हा काळ तुम्ही पहाल तर फार अस्वस्थ व्हाल. ग्रामीण आणि शहरी भागात शैक्षणिक संधीची विषमता आहे. शाळा महाविद्यालयांची भरमसाठ फी भरता येत नसल्याने विद्यार्थ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते. जो जातीयवाद नष्ट करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले तो डोकं वर काढतच असतो. तुम्हाला वाटेल, की ही बाई एवढी गा-हाणी मलाच का सांगत आहे ? तात्यासाहेब, आपलं मन मोकळं करण्यासाठी समोरचा माणूस योग्य असायला हवा ना. नाहीतर पालथ्या घड्यावर पाणी ! शिवाय तुम्ही या सगळ्यांचा इतका बारकाईने अभ्यास केला होता की, हे सांगण्यासाठी तुमच्याशिवाय दुसरं कुणीच समोर दिसत नाही.

‘शेतक-याचा असूड’ या पुस्तकात तुम्ही तेव्हाच्या शेतीची दयनीय परिस्थिती सांगितली. तेव्हा इंग्रजांचे राज्य होते, शेतकरी ठार अडाणी होते, करांचे ओझे, भटांचे वर्चस्व होते आणि या सगळ्यात पिळून निघालेले गोरगरीब शेतकरी होते. पण आता स्वातंत्र्याच्या काळात, समाज ब-यापैकी सुशिक्षित असूनही शेतीची अवस्था बिकटच आहे. शेती सुधारण्यासाठी शेतीसंबंधीचे ज्ञान शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे, पाणी पुरवठ्यासाठी बंधारे बांधले पाहिजेत, शेतीचा विकास झाला पाहिजे, कष्टक-याला योग्य श्रममूल्य मिळाले पाहिजे असे किती बारिकसारिक चौफेर विचार तुम्ही मांडले होते. ज्याची साधी जाणीवही तुमच्या आधी आणि नंतरही अनेकांना नव्हती. तळागाळातला समाज ही सुद्धा माणसेच असतात. त्यांनाही स्वातंत्र्य, समता, बंधुता हवी असते. हे समजून कृती करून दाखवणं ही नुसती तोंडानं बोलण्याची गोष्ट नव्हती.

आता स्वातंत्र्य मिळून सत्तरिक वर्षे उलटली. तरीही परिस्थिती पूर्ण बदलली असं म्हणता येत नाही. चहूबाजूंनी शेतकरी गोत्यात आहे. बी-बियाणं, खतं, औषधं, फवारण्या, मजूर, हवामान या सगळ्यांची जुळवाजुळव करून आणलेल्या पिकाला भाव मिळाला तर मिळतो नाहीतर गेला शेतकरी गाळात. आम्ही प्रत्येक पिकाबरोबर मनातल्या मनात सुखाच्या याद्या करतो, नाही पूर्ण झाल्या तर मनातल्या मनातच फाडून टाकतो. कुणी कुणाला सांगतसुद्धा नाही. नुस्तं एकमेकांकडं बघीतलं तरी कळतं. सालोसाल असं पिळून निघाल्यावर वैतागून शेतकरी आत्महत्या करतात. त्यावर आपले राजकारणी म्हणतात, प्रेमप्रकरणातून शेतकरी आत्महत्या करतात. तेव्हा त्यांना ओरडून सांगावसं वाटतं, होय, ही प्रेमप्रकरणंच आहेत मातीवर प्रेम करणाऱ्यांची.

आत्मसन्मान संपल्याच्या आत्महत्या आहेत या. तात्यासाहेब, इतकी असंवेदनशील सरकारं येतात आणि जातात. रस्त्यावरच्या अपघातात डोक्याला मार लागू नये म्हणून हेल्मेट सक्ती करतात. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काही भरीव प्रयत्न झाल्याचं दिसत नाही. शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर आर्थिक मदत मिळाली तर मिळते पण जिवंत असताना मिळत नाही. उलट शेतकरी आत्महत्यांचे गांभीर्य लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून दिशाभूल केली जाते.

मधेच गोहत्येचा किंवा अन्य काही विषय काढून विषयांवर केले जाते. शेतकऱ्यांच्या मुलांनी शिक्षण घेतलं. पण पुढे काय ? नोकरीधंदा जमेना. शिक्षण घेऊन पुन्हा शेती करायला लाज वाटते. मग कुठंतरी छाटछूट कामं शोधावी लागतात. विद्या असूनही मती गेलेली पिढी बघून दुःख होते. सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न आ वासून उभा असताना इतके लाख रोजगार वाढल्याच्या बातम्या वाचाव्या लागतात. गरीब श्रीमंत ही दरी वाढतच जात आहे. तुम्ही इंग्रजांना इंग्रजीत उत्तर देणारे उद्योजक होतात, हे ठळक आठवतं मला.

आज शेतीत नवनवे प्रयोग करणारे लोकही कमी नाहीत. तुम्ही त्यांना नक्कीच शाबासकी दिली असती, प्रोत्साहन दिलं असतं हे माहीत आहे आम्हाला. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देता देताच तुम्ही इतरांना कौतुकानं सांगितलं असतं, बघा पठ्ठेहो, शिका, शहाणे व्हा. तुम्ही त्यांच्या नफ्याचे आकडे नक्कीच तपासून पाहिले असते. फसव्या प्रसिद्धीसाठी त्यात खोट आढळली असती तर विषण्णही झाले असतात.

एकाने सांगायचे एवढ्याशा रानात, एका पिकात इतके लाख रूपये मिळाले. एका पिकात नफा मिळाला की वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हायचे. अगोदर कित्येकवेळा मातीमोल झालेले विसरून जायचे. आपलेच भाऊबंद आत्महत्या करतात आणि आपण शेतीच्या फायद्याचे गणित जगजाहीर करायचे, असे सर्रास चालू आहे. अजून एक असे की, तुमच्या विचारांनी भारावलेले कार्यकर्ते वाढत आहेत. चळवळीत येत आहेत, हिरीरीने तुमचे सत्यशोधक विचार मांडत आहेत, ते बघून आनंद होतो, तात्यासाहेब.

भवतालाकडं बघता बघता मी माझ्या विचारांची मुळं खणत खणत मागं गेले, तर तिथं तुम्ही भक्कम आधारस्तंभ असता. माझ्यावर पडलेला प्रकाशाचा किरण कुठून आलाय ते शोधत होते, तर तो थेट तुमच्यापर्यंत घेऊन गेला. म्हणून, म्हणूनच जोतीरावतात्या तुमच्याशी बोलण्याचं बळ आलंय माझ्यात. असं तळागाळातल्या माणसानं माणूस म्हणून व्यक्त होण्याचं, माणूस म्हणून उभं राहण्याचं स्वप्न पाहिलं होतं ना तुम्ही. ते स्वप्न मी जगत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com