Mahatma Jyotirao Phule : आधुनिक शेतीचे जनक

Mahatma Phule Death Anniversary : सामाजिक सुधारणांच्या बाबतीत अनेक लोक बोलतात, परंतु जे बोललेले आहे ते कृतीत उतरविणारे फारच कमी आहेत. महात्मा जोतिबा फुले त्यापैकीच एक!
Jotiba Phule
Jotiba PhuleAgrowon
Published on
Updated on

डॉ. आदिनाथ ताकटे

Father of Modern Agriculture : सामाजिक सुधारणांच्या बाबतीत अनेक लोक बोलतात, परंतु जे बोललेले आहे ते कृतीत उतरविणारे फारच कमी आहेत. महात्मा जोतिबा फुले त्यापैकीच एक! समाजकार्यात शेतकऱ्यांना फार महत्त्वाचे स्थान होते. `शेतकऱ्यांचा आसूड’ हा जोतिबांचा ग्रंथ अनेक दृष्टीने अद्वितीय आहे. या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांच्या स्थितीचे विदारक चित्र रेखाटले आहे.

शेतकऱ्यांची पिळवणूक कशी होते? याचे विवेचन त्यांनी या ग्रंथात अत्यंत पोटतिडकीने मांडले आहे. एवढ्यावरच जोतिबा फुले थांबले नाहीत तर शेतकऱ्यांचे प्रश्न ब्रिटिश शासन दरबारी मांडले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सभेसमोर देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेची मागणी केली. शेतकऱ्यांची चळवळ सुरू करणारे महात्मा फुले हे पहिले नेते होते. शेतकऱ्यांच्या दैन्य स्थितीचे वर्णन करताना ते लिहितात,

Jotiba Phule
Crop Advisory : मॉन्सूनोत्तर पाऊस, गारपिटीमुळे पीकनिहाय घ्यावयाची दक्षता

उघडी नागडी रानोमाळ, पोरे फिरती सदासर्वकाळ महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी अनेक उपाययोजना सुद्धा सरकारला सुचविल्या होत्या. यावरून शेतीसंबंधी त्यांच्या द्रष्टेपणा स्पष्ट होतो. शेती संबंधीची आधुनिक व क्रांतिकारी तत्त्वप्रणाली त्यांच्या विचारातून स्पष्ट होते.

जोतिबा फुले शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उकल करताना लिहितात, आमच्या दयाळू सरकारने एकंदर सर्व शेतकऱ्यास युरोपियन शेतकऱ्यासारखे विद्यादान देऊन त्यास यंत्रांद्वारे शेती कामे करण्यापुरती समज येईतो पशुहत्या बंद करावी. म्हणजे येथील शेतकऱ्यांना बैलांचा पुरवठा होऊन त्यांना आपल्या शेतांची भरपूर मशागत करता येईल.

पोलीस खात्यातील काळ्या गोऱ्या शिपायांकडून जागोजाग तालवजा बंधारे अशा रीतीने बांधावे की, वळवाचे पाणी शेतातून मुरून नंतर नदीनाल्यात मिळावे. असे केल्याने शेते सुपीक होतील. सर्व डोंगर टेकड्यांमधील दऱ्याखोऱ्यांत तलाव तळी जितकी होतील तितकी बांधून काढावीत. सर्व शेते धुऊन त्यामध्ये खोंगळया पडू नयेत म्हणून सरकारने शेतकऱ्यांकडून पाणलोटाच्या बाजूने शेताच्या बांधणीवरच्या ताली दुरुस्त ठेवाव्यात.

यावरून असे दिसून येते की, पाणी आडवा-पाणी जिरवा, पाणलोट क्षेत्र विकास, मृद व जलसंधारण या कामांचे महत्त्व त्यांनी त्या काळात जाणले होते. इतर देशातील उत्तम गायी, शेळ्या मेंढरांची खरेदी करून आपल्या देशात आणून त्यांची येथे उत्पत्ती केल्यास दुधाबरोबर सर्व शेतास त्यांच्या मलमूत्रांपासून शेणखत मिळाल्याने जमिनी सुपीक होतील. त्यांच्या लोकरीपासूनही फायदा होईल.

जोतिबांच्या विचारांना कृतीत उतरविण्यासाठी इंग्रज सरकारकडे दरवर्षी श्रावण महिन्यात कृषी प्रदर्शन भरविण्याचे तसेच आश्विन महिन्यात शेतपिकांचे व औत हाकणाऱ्यांच्या परीक्षा घेऊन उत्तम शेतकऱ्यास बक्षिसे देण्याची वहिवाट घातली. शेतकऱ्यांच्या मुलांच्या सरकारी खर्चाने परदेशात सहली आयोजित करण्याविषयी सुचविले.

या सूचनांमधील सखोल व गर्भित अर्थ ध्यानात घेतला तर महात्मा फुले यांच्या पारदर्शक दृष्टीचा पुरेपूर प्रत्यय येतो. जोतिबांनी पुरस्कार केलेल्या व अंगीकारलेल्या विविध शेती सुधारणा आज देशभरातील शेती संशोधनात कृषी शास्त्रज्ञांनी शंभर वर्षानंतर स्वीकारल्याचे आढळून येते.

Jotiba Phule
Sangli Sugarcane Rate : सांगली जिल्ह्यात ऊस दराचा प्रश्न चिघळणार, राजू शेट्टींचा जयंत पाटलांवर गंभीर आरोप

शेतीला प्राधान्य मिळाले पाहिजे, शेती ही आधुनिक पद्धतीने केली पाहिजे आणि शेतकऱ्यांची उन्नती होऊन देश भरभराटीस गेला पाहिजे, असे त्यांचे विचार होते. परंतु आज आपण पाहतोय येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. सावकारांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. शेतीवर गैरवाजवी कर आहेत. ही परिस्थिती बदलली पाहिजे, असे महात्मा फुले यांना सतत वाटत होते.

परिणामी त्यांनी उत्तम शेती करण्यासाठी नवीन अवजारे, सुधारीत बियाणे, विहीर खोदण्यासाठी कर्ज, पाणी अडवून ओलिताची सोय, शेतकऱ्यांसाठी ठिकठिकाणी प्रदर्शने, अभ्यासदौरे, सेंद्रिय पदार्थ, पालापाचोळा आदींचा शेतात वापर, चांगल्या दुभत्या गायी, वैरणीची व्यवस्था, जमिनीची उत्पादनक्षमता कमी होऊ नये म्हणून जमिनीस विश्रांतीची गरज असते, असे त्या काळात त्यांनी सुचविले होते. शेती संदर्भातील पुस्तके शेतकऱ्यांना दिले पाहिजे, जेणेकरून तो शास्त्रोक्त पद्धतीने शेती करेल, असेही त्यांना वाटत होते.

‘सत्यमेव जयते’ हे त्यांचे ब्रीद होते. तेच आपल्या राष्ट्रीय बोधचिन्हामध्ये आहे. यावरून महात्मा फुले यांची समाज आणि देशाबद्दलची तळमळ किती तीव्र होती हे दिसून येते. जोतिबांनी ‘दीनबंधू’ हे पत्रक चालविले. ‘गुलामगिरी’, ‘ब्राम्हणांचे कसब’, ‘शेतकऱ्याचा आसूड’ ही पुस्तके लिहिली. सार्वजनिक सत्य धर्म हा त्यांचा ग्रंथ मरणोत्तर प्रकाशित झाला.

सामाजिक क्रांतीचे उद्गाते आधुनिक शेतीचे जनक म्हणून त्यांचे नाव चिरस्मरणीय झाले. आज आपण २१ व्या शतकात महात्मा फुले यांना अभिप्रेत आदर्श शेती व शोषणमुक्त शेतकरी यासाठी त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कृतीची साथ दिली तरच त्यांनी पाहिलेलं स्वप्न साकार होईल. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

- डॉ. आदिनाथ ताकटे, मृद शास्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com