Paddy Crisis: भात उत्पादनाला बसणार फटका

Rice Farming: वेळेत रोपे तयार न झाल्याने काही जिल्ह्यांमध्ये लागवडी उशिरा झाल्या आहेत. त्यामुळे या भात उत्पादनाला फटका बसेल, असा अंदाज शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.
Paddy Farming
Paddy FarmingAgrowon
Published on
Updated on

थोडक्यात माहिती...

  • यंदा मे-जूनमध्ये जोरदार पावसामुळे रोपवाटिकांचे वेळापत्रक कोलमडले.

  • अनेक भागांतील लावणी १५-२० दिवस उशिरा झाली, काही ठिकाणी रोपे सडली.

  • भात उत्पादनात ३०-५०% घट येण्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज.

  • कृषी विभाग म्हणतो लावणी सुरळीत सुरु असून ८.५ लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण.

  • घाटमाथ्यावरील अनेक भागांत अजूनही रोपे आणि लावणीसाठी योग्य वेळ नाही.

Pune News : राज्यात यंदा मॉन्सूनचे आगमन लवकर झाल्यामुळे भात रोपवाटिकांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. वेळेत रोपे तयार न झाल्याने काही जिल्ह्यांमध्ये लागवडी उशिरा झाल्या आहेत. त्यामुळे या भात उत्पादनाला फटका बसेल, असा अंदाज शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.

सोयाबीन व कपाशीच्या खालोखाल राज्यात भाताचे क्षेत्र आहे. गेल्या पाच वर्षांची लागवड बघता सरासरी १५ लाख हेक्टरवर भात उत्पादन होते. मात्र यंदा पावसामुळे लागवडीचे वेळापत्रक कोलमडले आहे. ‘भाताच्या रोपवाटिका तयार करण्यास शेतकरी जूनपासून सुरुवात करतात. यंदा मात्र मे महिन्यात भात उत्पादक पट्ट्यांत जोरदार पाऊस झाला. जूनमध्येही तेच चित्र होते. त्यामुळे रोपवाटिका वेळेत तयार झाल्या नाहीत.

Paddy Farming
Paddy Plantation : शिराळा तालुक्यात भात पेरणी ५० टक्के

जूनच्या अखेरीस अनेक भागांत रोपवाटिका पावसात सापडल्या. चांगली रोपे हाती येण्याआधीच सडली. त्यामुळे रोपांची टंचाई शेतकऱ्यांना जाणवली. काही भागांत पुन्हा रोपे तयार करावी लागली. मात्र या गोंधळात लावणीचा कालावधी १५ ते २० दिवसांनी पुढे गेला. त्यामुळे अनेक गावांमध्ये नियोजन करूनही शेतकऱ्यांना लावणीसाठी चांगली रोपे मिळाली नाहीत,’ अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या एका शास्त्रज्ञाने दिली.

कृषी विभागाच्या अहवालात स्थिती चांगली

लावण्यांना सरासरी दोन आठवड्यांनी उशीर झाल्याचे चित्र आहे. मात्र कृषी विभागाच्या अहवालात भात लागवड सुरळीतपणे सुरू असल्याचे नमूद केले आहे. १५ लाखांपैकी २४ जुलैपर्यंत साडेआठ लाख हेक्टरहून अधिक पेरा पूर्ण झाला आहे. तसेच येत्या दोन आठवड्यांत विदर्भासह राज्यातील सर्व लावण्या व्यवस्थित पूर्ण होतील, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. कोकणात ७३ टक्के, नाशिकमध्ये ६६ टक्के, पुणे ६३ टक्के, तर विदर्भात ४५ टक्के भात लागवड पूर्ण झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे

अपेक्षित फुटवे निघणार की नाही याबद्दल शंका

नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर अशा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील बहुतेक गावांमध्ये भाताच्या लागवडी विस्कळित झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी काही ठिकाणी एकमेकांना रोपे उसनी देत किंवा एकूण पेरा कमी करीत लागवडी केल्या असल्या तरी यंदा अपेक्षित उतारा मिळेल, याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही. भात उत्पादन तंत्राचा अभ्यास करणाऱ्या एका शास्त्रज्ञाने सांगितले, की आता उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने लागवड करायला हवी.

कारण, भातरोपांची मुळे खालून घट्ट होत आहेत. ४० दिवसांच्या आत रोपांची पुनर्लागण न झाल्यास पुढे उत्पादनाला ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत फटका बसू शकतो. लावणी लांबल्यास ऑगस्टनंतर भात उत्पादक पट्ट्यात ऊन पडू लागते. त्यामुळे पीक पोटऱ्यात येते आणि अपेक्षित फुटवे निघत नाहीत. परिणामी उत्पादनात घट येते. यंदा ही स्थिती राज्याच्या काही भागांत दिसू शकते.

Paddy Farming
Paddy Crop Pest Control: भात पिकावरील किडींचे व्यवस्थापन

लागवडीची अवस्था राज्यभर वेगवेगळी

राज्यात इंद्रायणी वाणाच्या भात उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या वडगाव मावळ भागातील श्रीगणेश राईस मिलचे संचालक व शेतकरी प्रकाश देशमुख म्हणाले, ‘‘आमच्या मते काही गावांमधून उत्पादनात यंदा ३० ते ५० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता आहे. कारण, रोपे तयार झालेली नाहीत. लावण्याही लांबल्या असून पुढील स्थितीदेखील अनुकूल दिसत नाही.’’ राज्याच्या भात संशोधन केंद्राचे (कर्जत) संशोधन संचालक व भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे यांनीही यंदा रोपवाटिकांचे वेळापत्रक कोलमडल्याचे स्पष्ट केले. मात्र, राज्यभर लागवडीची अवस्था वेगवेगळी आहे. तेथील नेमकी स्थिती काय व या स्थितीचा लागवडीवर किती परिणाम होईल, याचा अंदाज सध्या लावता येणार नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.

अतिपावसामुळे नाशिकच्या इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर भागातील भात उत्पादक पट्ट्यात राब (भातरोपे) वाहून गेला तर काही ठिकाणी सड आली. त्यामुळे भात लागवड यंदा १०-१५ टक्के घटण्याची शक्यता आहे.
डॉ. हेमंत पाटील, विभागीय संशोधन संचालक, कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी
हरिश्‍चंद्रगड ते कळसूबाई पर्वतरांगेतील भात उत्पादक पट्ट्यांत लावणीसाठी योग्य रोपे तयार झालेली नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. मी यंदा सहाऐवजी केवळ तीन एकर भात लागवड करू शकलो.
काशिनाथ खोले, भात उत्पादक शेतकरी, मु.पो. पेंडशेंत, ता. अकोले, जि. अहिल्यानगर
पावसामुळे यंदा रोपवाटिका वेळेत तयार झालेल्या नाहीत. त्यामुळे लावण्यादेखील लांबल्या आहेत. उशिरा झालेल्या लावण्यांना पुढे योग्य पाऊस न मिळाल्यास भातसाळीत दाणे चांगले तयार नाहीत. त्यामुळे एकूण उत्पादनावर परिणाम होईल, असे वाटते.
अविनाश शिंदे, मु.पो. वडगाव मावळ, जि. पुणे
राज्याच्या पावसामुळे काही भागांत भात लागवडीचे नियोजन मागेपुढे झाले हे बरोबर आहे. परंतु, लागवड झालीच नाही, असे कुठेही झालेले नाही. उर्वरित लावण्यादेखील पूर्ण होण्यास पोषक स्थिती आहे. विदर्भात सध्या पुनर्लागण कमी दिसत असली तरी तेथेही लावणीची कामे प्रगतिपथावर आहेत.
रफिक नाईकवाडी, कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण विभाग

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):

१. पावसामुळे भाताच्या रोपवाटिकांवर काय परिणाम झाला आहे?
मे-जून महिन्यातील अतिपावसामुळे रोपे सडली आणि उशिरा तयार झाली.

२. यंदा भात लागवड किती उशिरा झाली आहे?
सरासरी १५ ते २० दिवसांची उशीराने लावणी झाली आहे.

३. या परिस्थितीचा भात उत्पादनावर काय परिणाम होऊ शकतो?
शास्त्रज्ञांच्या मते, ३० ते ५० टक्के उत्पादन घटू शकते.

४. राज्याच्या कोणत्या भागांमध्ये सर्वाधिक फटका बसला आहे?
नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, वडगाव मावळ आणि कळसूबाई पट्टा.

५. कृषी विभागाच्या मते स्थिती कशी आहे?
कृषी विभाग म्हणतो की लावणी प्रगतीपथावर असून अजूनही वेळेत पूर्ण होऊ शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com