Dairy Industry : विदर्भाचा दुग्ध व्यवसाय बळकट होणार? नितीन गडकरींचा पुढाकार

Nitin Gadakari : विदर्भ हा एकेकाळी संपन्न असलेला भूभाग आज शेतकरी आत्महत्येच्या समस्येशी झुंजत आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीने भाग समृद्ध असल्यामुळे इथे पुरातन काळापासून पशुपालनाची मोठी परंपरा आहे.
Nitin Gadkari
Nitin Gadkari Agrowon
Published on
Updated on

Vidharbha News:विदर्भ हा एकेकाळी संपन्न असलेला भूभाग आज शेतकरी आत्महत्येच्या समस्येशी झुंजत आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीने भाग समृद्ध असल्यामुळे इथे पुरातन काळापासून पशुपालनाची मोठी परंपरा आहे. पण आजघडीला इथला दूध धंदा मोडकळीस आलेला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झालेली दिसते. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मदर डेअरीच्या माध्यमातून येथील दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासंदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद.

नागपूर येथे महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) आहे. त्याच्या कामाबद्दल आपले मत काय आहे ?

शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पूरक ठरणाऱ्या दुग्धोत्पादनासारख्या प्रकल्पात कॉन्ट्रिब्यूट नाही करणार तर तुमचा उपयोग काय? सातव्या, आठव्या वेतन आयोगाची अपेक्षा करा; मात्र त्याच वेळी महत्त्वाकांक्षी प्रकल्पात योगदानही द्या. त्यामुळेच संस्थेचे फायनान्शिअल नाही, पण परफॉर्मन्स ऑडिट झाले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातून ती मी थेट मांडली होती.

विदर्भातील शासकीय दुग्ध योजनांचे vअस्तित्व का संपले ?

तो विषय आता नकोच. त्यावर मी एवढंच सांगेन, की छोडो कलकी बाते, कलकी बात पुरानी, नये दौर मे लिखेंगे मिलकर नई कहानी हम हिंदुस्थानी...

आपल्या भागात दुग्धोत्पादनालाच चालना देण्यामागचा उद्देश काय ?

शेतकरी पिकांवरच अवलंबून असल्याने त्यात तोटा झाला की शेतकऱ्यांची अवस्था वाईट होते. त्यातून या भागात नैराश्‍य वाढलं होतं. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागचं हे एक प्रमुख कारण आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं तर शेतीपूरक व्यवसायाला प्रोत्साहन दिलं पाहिजे, असा विचार पुढे आला. त्यातूनच दुग्धोत्पादनावर लक्ष केंद्रित केलं.

सुरुवातीला अभ्यास करताना खासगी दूध कंपन्या मनमानी पध्दतीने दर देत असल्याचं लक्षात आलं. परिणामी शेतकऱ्यांचा दूध उत्पादनाचा खर्च आणि उत्पन्नाचा ताळेबंद जुळत नव्हता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दुधाचा धंदा सोडून दिला. मदर डेअरीमुळे खरेदीदारांमध्ये स्पर्धा वाढली. त्याचा थेट परिणाम दरावर झाला.

मदर डेअरी अधिक दर देत असल्याने खासगी कंपन्यांच्या व्यवस्थापनाला देखील वाढीव दर देणं भाग पडलं. त्यामुळे दूध व्यवसायाला चालना मिळाली. म्हणजे शेतीपूरक व्यवसायाला यातून प्रोत्साहन मिळाले.

त्यामुळेच येत्या काळात मदर डेअरीचा विस्तार आणखी वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. विदर्भातील सर्व ११, तसेच मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत मदर डेअरीच्या माध्यमातून दूध संकलन होईल. विशेष म्हणजे ‘विदर्भ-मराठवाडा डेअरी डेव्हल्पमेंट प्रोजेक्‍ट’च्या माध्यमातून आजवर २२०० कोटी रुपयांच्या दुधाची खरेदी करण्यात आली आहे.

Nitin Gadkari
Dairy Farming : 'लक्ष्मी'मुळे दुग्ध व्यवसायात भरारी

या प्रकल्पाची व्याप्ती किती आहे ?

विदर्भ-मराठवाड्यातील सुमारे ३३०० गावांतील उत्पादकांकडून सध्या दुधाची खरेदी केली जाते. त्यामध्ये ३५ टक्‍के दूध उत्पादक शेतकरी महिला आहेत. दुग्धोत्पादन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याकरिता शासनाने १४९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून येत्या काळात १९ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ४०० गायींचे वाटप केले जाईल.

मदर डेअरीची विस्तार योजना काय आहे ?

मदर डेअरीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या दुधावर याच भागात प्रक्रिया करता यावी याकरिता बुटीबोरी (नागपूर) येथील औद्योगिक परिक्षेत्रात प्रकल्प उभारला जाणार आहे. त्याकरिता केंद्र सरकारने ४५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दही, ताकच नाही तर श्रीखंड, पनीर, आइस्क्रीमचे उत्पादन या ठिकाणी होईल.

ही उत्पादने जागतिक स्तरावर उपलब्ध व्हावी याकरिता निर्यातीसाठी देखील प्रयत्न होणार आहेत. नागपूर हे ‘झीरो माइल’ (भारताचा मध्यबिंदू) असल्याने या ठिकाणावरून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रक्रियाजन्य पदार्थ पाठविणे शक्‍य होणार आहे. दुधावर प्रक्रिया झाल्याने पशुपालकांच्या दुधाला देखील सातत्याने वाढीव दर मिळत राहील.

चाऱ्याची टंचाई ही दुग्धोत्पादनातील अडचण आहे का ?

दुग्धोत्पादनात चाऱ्याची अडचण असली, तरी कापूस उत्पादक भागात सरकी ढेप, काही भागांत मका, तर काही ठिकाणी धानाचे तणस मुबलक आहे. प्रोटीनयुक्‍त फॉर्म्यूला वापरत त्या त्या भागातील अशा घटकांवर प्रक्रिया करून त्यापासून दर्जेदार चारा उत्पादनावर भर देण्याची योजना आहे. शेतकरी गट, कंपन्यांमार्फत हे काम होईल आणि हा चारा मदर डेअरी विकत घेईल.

त्यामुळे चाऱ्यावरील खर्च बऱ्याच प्रमाणात कमी होईल. नेपियर गवताची लागवड करून त्यापासून सायलोज तयार करावे. त्यातून वर्षभर हिरवा चारा मिळेल. त्यासाठीही योजना आहे. वर्धा जिल्ह्यात सुधीर दिवे यांनी त्यासाठी पहिली ‘सुचारा’ ही शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून काम सुरू केले आहे. मौदा (नागपूर) येथील निमकर यांनी देखील चारा क्षेत्रात मोठं काम केलं आहे.

Nitin Gadkari
Dairy Farming : एका गाईपासून ३३ गायींपर्यंतचा प्रवास ; कल्पनाताईंच्या दुग्ध व्यवसायाची यशोगाथा

जनावरांचे आरोग्य हा देखील कळीचा मुद्दा आहे. त्याविषयी काय सांगाल ?

पशुपालन वाढल्याने जनावरांच्या आरोग्याशी निगडित प्रश्‍नही निर्माण होतील. त्याची दखल घेत पशुवैद्यकांचे एक नेटवर्क उभे करण्याचा मानस आहे. जनावर माजावर येताच संबंधित पशुचिकित्सक अर्ध्या तासाच्या आत तेथे पोहोचेल आणि त्यांना रेत मात्रा देतील. ब्राझीलमधील गीर गाय ६० लिटर दूध देते. तिच्या वळूच्या वीर्याचा वापर करीत १५ ते २० लिटर दूध देणारी गाय विकसित करण्यावरही भर दिला जाणार आहे.

त्याकरिता ‘एम्ब्रिओ ट्रान्स्फर’ तंत्रज्ञान वापरले जाईल. आता आपल्या गाय हवी की वळू हे निश्‍चित करणारे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे केवळ दुधाळ गाईच मिळण्याची खात्री राहील. याच तंत्रज्ञानाचा वापर करीत २० लिटरपेक्षा अधिक दूध देणाऱ्या एक लाख गाई पाच वर्षांत तयार करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे.

याहीपुढे जे पशुपालक ५० लिटरपेक्षा अधिक दुधाचा रतीब घालतात, त्यांच्यासाठी पोल्ट्री, गोट फार्मच्या धर्तीवर काऊ फार्म योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. मदर डेअरीच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी होईल. काऊ फार्मधारकांनी जास्त दूध देणाऱ्या गाई तयार करून त्याचा पुरवठा इतर पशुपालकांना करावा, असे यात अपेक्षित आहे.

विदर्भात १०० ते १५० काऊ फार्म तयार करण्याचे प्रस्तावित असून, काही गोरक्षण संस्थादेखील याला जोडल्या जातील. बारामती, सांगली तसेच माफसू, नागपूर येथे एम्ब्रिओ ट्रान्स्फर प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळांचा उपयोग करत दूध उत्पादन वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी काय आखणी करण्यात आली आहे ?

दुधाळ जनावरांच्या शेणापासून गॅस तयार करता येईल; तो शेतकऱ्यांना घरी वापरता येणार असल्याने त्यांची गॅस सिलिंडरवरची अवलंबिता कमी होणार आहे. त्यासाठीही एक योजना प्रस्तावित आहे. धानाच्या तणसापासून सीएनजी तयार केला जाणार आहे. त्याचा वापर बस, ट्रक व इतर वाहनांमध्ये होईल. इतकेच नाही तर सीएनजीवर चालणारी स्कूटर बजाजने तयार केली आहे. त्यातही याचा वापर होईल. इथेनॉलही इंधनाचा स्वस्त पर्याय आहे, त्यालाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.

अनेक प्रयत्नांनंतरही दूध संकलनात वाढ का होत नाही ?

दुध घ्या- दूध घ्या म्हणून उपयोग होणार नाही. खरेदी केलेल्या दुधावर प्रक्रिया होऊन त्याला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाली तरच हा प्रकल्प यशस्वी होईल. दूध आणि प्रक्रियाजन्य पदार्थांना बाजारपेठ वाढली तर त्याकरिता अधिक दुधाची गरज भासणार आहे. ही सारी साखळी आहे; मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्रीय नियम या ठिकाणी लागू होतो. मदर डेअरी सध्या सहा लाख लिटर दुधाचे संकलन करीत आहे. येत्या तीन वर्षांत हे संकलन ५० लाख लिटरवर नेण्याचा मानस आहे. म्हणजे दूध संकलनात सुमारे आठ पट वाढ करण्याचा उद्देश आहे.

या भागातील संत्र्याच्या मूल्यवर्धनाची काही नियोजन आहे का ?

संत्रा हे विदर्भाचे मुख्य फळपीक आहे. त्याचे मूल्यवर्धन करण्याच्या उद्देशाने मदर डेअरीमार्फत संत्रा बर्फी तयार करण्यात आली. यात सद्यःस्थितीत ज्यूसचा वापर केला जातो. मात्र संत्रा ज्यूस असलेली बर्फी चार ते पाच दिवसांपेक्षा अधिक काळ टिकत नाही. त्यामुळे संत्रा बर्फीचा टिकवण कालावधी वाढावा याकरिता काय करता येईल, यावर संशोधन सुरू होते. प्रयोगाअंती यात संत्रा पावडर मिसळल्यास टिकवण कालावधी दोन महिन्यांपर्यंत वाढणार असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. त्यामुळेच संत्रा पावडरपासून संत्रा बर्फी तयार करण्याचे काम मदर डेअरीच्या माध्यमातून बुटीबोरीत होईल. येथूनच ती देशांतर्गत बाजारपेठांमध्ये आणि परदेशातही पाठविण्यात येणार आहे.

एकूणच शेतीमालाचे मूल्यवर्धन झाल्याशिवाय शेतकऱ्यांना चार पैसे जादा मिळणार नाहीत. यासंदर्भात काय सांगाल ?

महानंद डेअरीची जागा मदर डेअरीला देण्यात आली आहे. या जागेवर प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी होईल. ‘धारा ब्रॅण्ड’ने राइस ब्रॅन, सोयाबीन तेलाचे येथे उत्पादन घेतले जाईल. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, धानाला दर मिळेल. मक्‍यापासून इथेनॉल तयार करण्यात आले. त्यामुळे मक्याची मागणी वाढून त्याचे दर २८०० रुपयांपर्यंत गेले. दर चांगला मिळाल्याने मक्याचा पेराही वाढला. तो थोडाथोडका नव्हे, तर दीड पटीने वाढला आहे. मक्‍यापासून एकरी एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न शेतकरी मिळवत आहेत. त्याचा उपयोग इथेनॉलसोबतच चाऱ्यासाठीही होतो. अशा प्रकारे शेतीमालाचे मूल्यवर्धन साधले आहे. त्यातून या भागातील पिकांना चांगला आणि वाढीव दर मिळावा, अशी अपेक्षा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com