
Livestock Management: सर्वच चारा खाणारी जनावरे नैसर्गिक पद्धतीने मिथेन तयार करतातच. कारण त्यांच्या पोटाची रचनाच तशी आहे; ज्यामुळे भरपूर तंतुमय खाद्याचे पोटातच विघटन होते. वाढत्या उष्णतामानाचे आलेले संकट या पोटातच लपलेले आहे. म्हणूनच वाढते पशुधन, त्यांची निगा, त्यापासून मिळणारे दुग्धोत्पादन आणि त्याच्या अनेक पटीत उत्सर्जित होणारा मिथेन हा हरितगृह वायू सध्या सर्व जगासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
पशुधनाच्या पोटात तयार होणारा मिथेन वायू ही जरी नैसर्गिक प्रक्रिया असली तरी पशुधनास कसलीही हानी न पोहोचता, दुग्ध उत्पादनावर परिणाम न होता तो कसा कमी करता येईल हे आव्हान आहे. मिथेन आणि त्याचा वातावरण बदलावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करणारे जगभरातील शास्त्रज्ञ सध्या या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी विविध मार्ग आणि प्रणालींवर काम करत आहेत.
जनावराच्या पोटात तयार होणाऱ्या मिथेनचा जनावरास काहीही त्रास नसला तरी तो बाहेर पडल्यावर सभोवतालच्या जीवसृष्टीस अपायकारक ठरु शकतो. चाऱ्यामध्ये विशिष्ट खाद्य मिसळून त्याद्वारे मिथेन निर्मिती कमी करणे, गुरांकडून जास्तीत जास्त व्यायाम करून घेणे, त्यांच्यावरील ताणतणाव कमी करणे, गोठा स्वच्छ आणि हवेशीर ठेवणे, आत संगीत चालू ठेवणे, जनावरांना माया लावणे हे प्रयोग तसे अतिशय साधे-सोपे पण मिथेन उत्सर्जन दहा टक्के कमी करणारे ठरले आहेत.
देशी वृक्षांचे सैन्य
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘नेचर’ या विज्ञान पत्रिकेमधील संशोधनातून असे सिद्ध झाले आहे, की पूर्ण वाढीच्या वृक्षसालीच्या आत मोठ्या प्रमाणावर मिथेन जिवाणू वस्ती करुन असतात. यांचे मुख्य कार्य म्हणजे वातावरणामधील मिथेन शोषून त्याच्यापासून ऊर्जा प्राप्त करत अल्प प्रमाणात कर्ब वायू बाहेर टाकणे. त्यामुळे जगामधील २५ ते ४० दशलक्ष टन मिथेन वातावरणामधून सहज कमी होऊ शकतो.
पूर्वी म्हणजे सहा-सात दशकांपूर्वी गावामधील सर्व पशुधन गायरानात चरावयास जात असे आणि दुपारी एखाद्या विशाल वटवृक्षाखाली रवंथ करत विश्रांती घेत असे; तेव्हा कुठे होता मिथेनचा प्रश्न? तो वटवृक्ष पशुधनाद्वारे निर्माण झालेल्या जवळपास सर्व मिथेनचे सालीच्या साह्याने विघटन करत होता. हे संशोधन असेही अधोरेखित करते की बंदिस्त गोठयाभोवती चारही बाजूंनी आपले देशी वृक्ष सैनिकाप्रमाणे उभे हवेत. मिथेनला वातावरणातून कमी करावयाचे असेल तर पूर्ण वाढीचे वृक्ष कधीही तोडू नयेत.
तेल उद्योग, औद्योगिकीकरण, वाढती भात शेती आणि दुग्ध व्यवसाय हे चार खांब मिथेन निर्मितीचे मोठमोठे अड्डे आहेत. यातील पहिले दोन देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत, तर उर्वरित दोन मुद्दे अन्न सुरक्षेशी जोडलेले आहेत. या सर्व चार खांबांनी तसूभरही हलायची इच्छा व्यक्त केली नाही तर भारतामधील मिथेनचे उत्सर्जन २०३५ पर्यंत सध्याच्या प्रमाणापेक्षा दुप्पट होईल.
त्यामध्ये अर्थातच कृषी आणि पशुपालनाचा हिस्सा अर्ध्यापेक्षा जास्त असणार आहे. १ किलो मिथेनचे उर्त्सजन ४० किलो कर्ब वायूच्या बरोबरीचे आहे. जगाच्या एकूण मिथेन उत्सर्जनात भारताचा वाटा १२ टक्के आहे; ज्यामध्ये भात शेती आणि पशुधनाचा वाटा २७.३ टक्के आहे. भातशेतीत आता बरेच बदल होत आहेत; मात्र पशुधनामधील मिथेन उत्सर्जन कमी करण्याचे संशोधन अजून तरी प्रयोगशाळेमधून बांधापर्यंत पोहोचण्यास वेळ घेत आहे.
भारत हा जगामधील सर्वांत जास्त दूध उत्पादन करणारा देश आहे. आज आपल्या देशात ८० दशलक्ष दूध उत्पादक शेतकरी आहेत. त्यांनी मागील वर्षी २३१ दशलक्ष टन दूध उत्पादित केले आहे आणि तेवढ्याच प्रमाणात मिथेन वायू वातावरणात आला आहे. हे १:१ प्रमाण कमी होणे भारतासाठी काळाची गरज आहे. आज अमेरिका, न्यूझीलंड, फिनलँड, हॉलंड, इस्राईल या देशांनी गोपालनामधून मिथेन उत्सर्जन कमी करायची लढाई जिंकत आणली आहे.
फिनलँडमध्ये हे प्रमाण मागील ६० वर्षात ५७ टक्क्यांवर आले आहे. या देशाने चारा पद्धतीत बदल करून या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न केला. तेथे १९६५ मध्ये ३६५० दशलक्ष लिटर दुधामागे ११० दशलक्ष किलोपर्यंत मिथेन उत्सर्जन होते. त्यांनी २०२० मध्ये ते २३०० दशलक्ष लिटर दुधामागे ४८ दशलक्ष किलोपर्यंत खाली आणले. शेवटी एकच सत्य वैश्विक आहे- ‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे.''
डॉ. नागेश टेकाळे ९८६९६१२५३१
(परिचय : लेखक वनस्पतिशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक व वातावरण बदलाचे अभ्यासक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.