Burgess Botanic Gardens : संशोधक, पर्यटकांचे आकर्षण ः बर्गीअस बॉटनिक गार्डन

Botanical Garden :स्वीडन देशातील स्टॉकहोम शहराजवळ बर्गीअस बॉटनिक गार्डन आहे. याठिकाणी जगातील असंख्य वनस्पतींचे संवर्धन करण्यात आले आहे. येथे दुर्मीळ वनस्पतींवर संशोधन करून नवीन जाती विकसित करण्यात येतात.
Botanical Garden
Botanical GardenAgrowon

डॉ. राजेंद्र सरकाळे

City of Stockholm : स्वीडन देशातील स्टॉकहोम शहराजवळ बर्गीअस बॉटनिक गार्डन आहे. याठिकाणी जगातील असंख्य वनस्पतींचे संवर्धन करण्यात आले आहे. येथे दुर्मीळ वनस्पतींवर संशोधन करून नवीन जाती विकसित करण्यात येतात. पर्यटकांना जगातील विविध प्रकारच्या वनस्पती, तृणधान्य, फळबागा, भाजीपाला, फुलशेती एकत्रित पाहता यावीत यासाठी या बागेची स्थापना करण्यात आली होती.
संशोधन केंद्र आणि पर्यटन केंद्र या दोन्ही संकल्पना आपल्याकडे वेगवेगळ्या करून पाहिल्या जातात. परंतु माहिती मिळविणे हा पर्यटनाचा एक महत्त्वाचा हेतू असतो आणि त्याचबरोबर संशोधनही सुरू राहू शकते, ही संकल्पना आपल्याकडे फारशी प्रचलित नाही. आमच्या अभ्यास दौऱ्यामध्ये स्वीडन देशातील स्टॉकहोम शहराजवळ एक ठिकाण पाहण्याचा योग आला. विस्तीर्ण जागेत विकसित केलेले बर्गीअस बॉटनिक गार्डन हे संशोधन केंद्र जगभरातील वनस्पतींचे माहेरघर आहेच; शिवाय येथे येणाऱ्या प्रत्येकाला, मग तो पर्यटक असो वा संशोधक नवीन माहितीच्या समाधानाची अनुभूती मिळाल्याशिवाय राहत नाही.

स्टॉकहोमच्या बाहेरील फ्रेस्कॅटी परिसरातील बर्गीअस बॉटनिक गार्डन हे एक वनस्पती उद्यान आहे. प्रोफेसर बर्गिअस हे बागेचे संचालक म्हणून कार्यरत होते. पीटर जोनास आणि बेंगट बर्गिअस या दोन भावांनी बर्गीअस बॉटनिक गार्डनची सुरुवात केली. स्टॉकहोम शहरामध्ये त्यांची सात हेक्टर जमीन होती. या ठिकाणी त्यांनी उद्यानविद्या शाळा विकसित केली. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांच्या मृत्यूनंतर ही मालमत्ता रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसला दान करण्यात आली. आज ही बाग स्वीडिश सरकार आणि रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्या मालकीची आहे.

Botanical Garden
South Cost Botanic Garden : समुद्रातील प्लास्टिक कचऱ्यापासून साकारलेली समुद्री जीवांची शिल्पे

बर्गीअस बॉटनिक गार्डनची ओळख ः
वनस्पतींच्या विविधतेबद्दल शिक्षण आणि संशोधनास बळकटी देण्यासाठी बर्गीअस बॉटनिक गार्डनची स्थापना करण्यात आली. हे उद्यान मनोरंजनाच्या बरोबरीने पर्यटकांसाठी वनस्पतीविषयक ज्ञानाचा स्रोत आहे. अठराव्या शतकापर्यंतच्या इतिहासासह हे उद्यान रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस आणि स्टॉकहोम विद्यापीठ यांच्या मालकीची आहे. विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र, पद्धतशीर विभाग, व्हिक्टोरिया हाऊस, व्हिक्टोरिया तलाव आणि डोंगराच्या आकाराची रॉकरी यामुळे उद्यानामध्ये जगातील अनेक दुर्मीळ वनस्पतींचे वैज्ञानिक तत्त्वांनुसार संवर्धन केले जाते. वर्षभर खुल्या असणाऱ्या या उद्यानात कायम हिरवळ असते.
उद्यानामध्ये फळबागा, भाजीपाला लागवड, फुलशेती आणि लॅण्डस्केप गार्डनिंग यासह जगातील दुर्मीळ वनस्पतींचे संवर्धन आणि त्याबाबतचे प्रयोग पाहावयास मिळतात. फुलांमध्ये परागकणांद्वारे फलधारणा कशी होते याचे प्रात्यक्षिक येथे पाहायला मिळते. वारा, कीटक, प्राणी यांच्या माध्यमातून होणारे स्वपरागीकरण, परपरागीकरण तसेच स्ट्रॉबेरीसारख्या वनस्पतींमध्ये फुटव्याद्वारे होणारे प्रजनन याबाबत येथे प्रात्यक्षिकाद्वारे शिकविले जाते. संकरीकरण आणि उत्परिवर्तनाद्वारे नवीन प्रजाती निर्माण करण्याचे संशोधन येथील प्रयोगशाळेत केले जाते.

Botanical Garden
Cactus Garden : निवडुंगाच्या विविध प्रजातींचं गार्डन पाहिलंय का?

जपानी तलाव ः
उद्यानामध्ये १९९१ मध्ये जपानी तलावाची रचना करण्यात आली. एका विभागात छोटा तलाव तयार करून त्याच्या सभोवतालच्या जंगल तयार करण्यात आले आहे. हा जपानी तलाव चिंतन आणि विश्रांतीसाठी एक नैसर्गिक ठिकाण आहे. विविध छटांची विपुल हिरवाई, अधूनमधून उमलणारी आकर्षक फुले आणि पाण्यातील प्रतिबिंबात विविध झाडांचे सौंदर्य दिसते. यातील बऱ्याच वनस्पती जपानमधील होक्काइडोच्या उत्तरेकडील बेट आणि समान हवामान असलेल्या आशियायी प्रदेशांतून आणण्यात आल्या आहेत.

पर्वताच्या आकाराची रॉकरी ः
बागेमध्ये तीन भव्य कृत्रिम पर्वत तयार केले असून, सर्वांत मोठ्या
पर्वतावर आशियायी वनस्पती आहेत. इतर दोन पर्वतांवर उत्तर अमेरिकेतील वनस्पती आणि आइसलँडमधील वनस्पतींसह स्कॅन्डिनेव्हियन पर्वत साखळीतील वनस्पती पाहायला मिळतात.

फळबागांचे क्षेत्र ः
स्वीडनच्या मध्यवर्ती भागात आढळणारी फळे आणि बेरी लागवड या उद्यानात पाहायला मिळते. येथे बेरी फळांच्या पारंपरिक तसेच नवीन जाती पाहायला मिळतात. सामान्यतः लागवड न केल्या जाणाऱ्या समुद्री बकथॉर्न, चोकबेरी आणि काउबेरी सारख्या वनस्पतींचे संवर्धन करण्यात आले आहे.

वनस्पतींचा संबंध दर्शविणारी बाग ः
उद्यानातील एका विभागात सुमारे १४०० वनस्पतींची लागवड केली आहे. झाडे एकमेकांशी कशी संबंधित आहेत हे दाखवण्याच्या उद्देशाने मैदानात मोठ्या संख्येने विविध झाडांची लागवड करण्यात आली आहे. पर्यटकांना समजण्यासाठी एकाच कुळातील वनस्पतींचे वाफे शेजारी-शेजारी लावण्यात आले आहेत.

ऑलँड आणि गॉटलँड ः
या विभागात बाल्टिक समुद्राच्या दक्षिणेकडील ऑलँड आणि गॉटलँड बेटांमधील वन्य प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. कोरडे हवामान, चुनखडीची अधिक मात्रा आणि दीर्घ कृषी इतिहासामुळे या बेटांवर विशेष वनस्पती आहेत. येथे एक लहान चुनखडीचे मैदान, समुद्रकिनारा आणि काही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींचे कोरडे कुरण तयार करण्यात आले आहे.

इटालियन टेरेस ः
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी स्थापन झालेल्या या उद्यानातील एक महत्त्वाचा भाग म्हणून इटालियन टेरेस लोकप्रिय आहे. येथे पर्यटक विश्रांती घेऊन बृन्सविकेन सरोवराचा आनंद घेऊ शकतात. भूमध्य सागरी वनस्पती आणि विविधरंगी फुले येथे पाहावयास मिळतात. इटालियन टेरेसच्या जवळ ट्यूलिप्स फुलांची बाग विकसित करण्यात आली आहे.
बर्गीअस बॉटनिक गार्डनमध्ये जगातील असंख्य वनस्पतींचे संवर्धन करण्यात आले आहे. काही दुर्मीळ वनस्पतींवर संशोधन करून नवीन जाती विकसित केल्या जातात. पर्यटकांना जगातील विविध प्रकारच्या बहुतांश वनस्पती, तृणधान्य, फळबागा, भाजीपाला, फुलशेती एकत्रित पाहता यावी यासाठी या उद्यानाची रचना करण्यात आली आहे. आपल्याकडील कृषी विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात वाढणाऱ्या पिकांवर संशोधन करण्याकडे अधिक कल असतो. राज्यातील विविध भौगोलिक क्षेत्रात वाढणाऱ्या सर्व वनस्पतींचे एकाच ठिकाणी संवर्धन करण्यासाठी आपल्याकडे असे बॉटनिक गार्डन उभारणे गरजेचे आहे.



व्हिक्टोरिया तलाव ः
उद्यानाच्या परिसरात १८९०च्या सुमारास घोड्याच्या नालेच्या आकाराचा व्हिक्टोरिया तलाव बांधण्यात आला. तलावाच्या मध्यभागी असलेल्या गोलाकार भागात व्हिक्टोरिया हाउस बांधण्याची कल्पना होती. परंतु ही जमीन बांधकामासाठी योग्य नसल्यामुळे व्हिक्टोरिया हाउस येथून काही अंतरावर बांधण्यात आले. तलावामध्ये थंड हवामानातील जल वनस्पती वाढवल्या आहेत. तलावाचा एक भाग दलदलीच्या वनस्पतींनी व्यापलेला आहे. पांढऱ्या, लाल आणि पिवळ्या रंगाच्या वॉटर लिली येथे पाहावयास मिळतात. तलावाच्या दुसऱ्या अर्ध्या भागात उत्तर अमेरिकेतील जल-वनस्पती पाहायला मिळतात. अतिशय आकर्षक वॉटर लिलीच्या विविध जातीदेखील आपल्याला येथे पाहावयास मिळतात.

व्हिक्टोरिया हाउस ः
व्हिक्टोरिया हाउस ही ऐतिहासिक इमारत आहे. या ठिकाणी विशाल वॉटर लिलीची लागवड पाहावयास मिळते. वॉटर लिलीसाठी पुरेसा प्रकाश, उष्णता आणि वाढीसाठी जागेची गरज पूर्ण करण्यासाठी हा विभाग अभियांत्रिकी कौशल्य वापरून तयार करण्यात आला आहे. तलावामधील वॉटर लिलीची पाने ८ ते ९ फूट व्यासाची आहेत. जेव्हा अंधार पडतो, तेव्हा मोठी, भव्य फुले उमलतात. उष्ण कटिबंधीय वॉटर लिली सतत बहरतात. तलावाच्यावर पसरलेल्या फांद्या एपिफाइट्सने झाकलेल्या आहेत. येथे भात, ऊस, पपायरस आणि उष्ण कटिबंधीय काकडी यांसारख्या उपयुक्त वनस्पतीदेखील पाहायला मिळतात.

डॉ. राजेंद्र सरकाळे ९८५०५८६२२०
(लेखक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com