Watershed Development : वनस्पती आच्छादनाच्या बदलाचा निर्देशांक

Vegetation Cover Change : पाणलोट क्षेत्र विकास आणि व्यवस्थापनामध्ये ‘माथा ते पायथा’ उपचार करताना जैविक उपचारांचा समावेश केला जातो.
Vegetation cover index values
Vegetation cover index valuesAgrowon

डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील

Watershed Development and Management : पाणलोट क्षेत्र विकास आणि व्यवस्थापनामध्ये ‘माथा ते पायथा’ उपचार करताना जैविक उपचारांचा समावेश केला जातो. जैविक उपचारांमध्ये जैविक बांधबंदिस्ती, उतारांवरील वृक्ष लागवड, सलग समतल चरीवर गवताची वाढ करणे, बांधांवर वृक्ष लागवड यांसारख्या उपचारांचा समावेश असतो. सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये ते प्रस्तावित असले तरी सर्वसामान्यपणे या उपचारांना कमी महत्त्व दिले जाते. मात्र एखादे पाणलोट क्षेत्र यशस्वी करावयाचे असल्यास हेच उपचार अतिशय महत्त्वाचे ठरतात.

... असा होतो फायदा

या उपचारांमुळे मूलस्थानी मातीची धूप कमी होते.

जैविक बांधबंदिस्तीमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो. सेंद्रिय कर्ब वाढीस लागतो. सूक्ष्म जैविक प्रक्रियांना वेग येतो.

उतारावरील आणि बांधावरील वृक्ष लागवडीमुळे नैसर्गिक समतोल साधला जातो. पशुपक्ष्यांसाठी नैसर्गिक अधिवास व पक्षिथांबे तयार होतात. किडींवरील नियंत्रण मिळविणे शेतकऱ्यांना सोपे जाते.

चरांवर किंवा बांधांवर गवतांची (उदा. पवना, कुंदा, गांजणकाडी, मारवेल, शिपरूट इ.) वाढ केल्यास जमिनीची धूप होत नाही. -चाऱ्याची उपलब्धता वाढल्यामुळे पशुपालनातील खर्च कमी होतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते.

जमिनीवर नैसर्गिक आच्छादन नैसर्गिक परिसंस्थेच्या संतुलनात मोलाचे ठरते.

Vegetation cover index values
Watershed Development : पाणलोट क्षेत्र विकासामधील सिंचन निर्देशांक

या भागामध्ये एखाद्या पाणलोट क्षेत्रामध्ये नैसर्गिक आच्छादनात झालेला बदल कसा मोजायचा, हे पाहू. त्याचा निर्देशांक Normalized Difference Vegetation Index (NVDI) पुढील सूत्राने मोजला जातो.

NIR- R

NDVI =     X १००

NIR+R

म्हणजेच NIR= नीअर इन्फ्रा रेड (निकट अवरक्त किरण) (तरंगलांबी सुमारे ७६० ते ९०० nm) आणि R= रेड ( तांबडी किरणे)- (तरंगलांबी ६३० ते ६९० nm)उपरोक्त नमूद NIR व R या दोन्ही किमती उपग्रहावरील इन्फारेड कॅमेराद्वारे त्या पाणलोट क्षेत्रांच्या घेतलेल्या प्रतिमांवरून मिळू शकतात. या साठी सुदूर संवेदन (Remote Sensing) व भौगोलिक माहिती प्रणाली (Geographical Information system) या आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला जातो. नैसर्गिक आच्छादनाच्या बदलाच्या निर्देशांकाची (NDVI) किंमत ० ते १ यादरम्यान कितीही येऊ शकते. जेवढी जास्त किंमत तेवढे जास्त त्या पाणलोट क्षेत्रामध्ये नैसर्गिक आच्छादन अधिक असा त्याचा अर्थ निघतो. नैसर्गिक उपचार केलेल्या एखाद्या पाणलोट क्षेत्रात चांगली वाढ झालेल्या नैसर्गिक आच्छादनांच्या किमती या ०.१ ते ०.५ या दरम्यान आल्यास हे प्रमाण सर्वसाधारण आहे असे निश्चित होते. मात्र ही किंमत ०.६ च्या वर आल्यास त्या ठिकाणी घनदाट जंगल तयार झाले आहे, असे दर्शविले जाते.

वनस्पती आच्छादन निर्देशांकाच्या किमतीनुसार वनस्पतीचे आच्छादन नेमके कसे आहे, हे

ठरवता येते. (तक्ता १)

तक्ता १ : वनस्पती निर्देशांक किंमत

आच्छादन NDVI

चांगले NDVI > ०.१०

मध्यम ०.०१< NDVI ०.१०

अत्यल्प ० < NDVI < ०.०१

वनस्पती विरहित NDVI < ०

या उपग्रहाद्वारे प्रतिमा घेण्याच्या तंत्रातील मर्यादा

पाणी आणि ढगांची गर्दी असल्यास या तंत्रज्ञानात काहीशी त्रुटी येते. व या निर्देशांकाची किंमत ऋण संख्या (Negative), तर शून्याच्या जवळची धनसंख्या (Positive) दर्शवली जाते.

मोठ्या पाणलोट क्षेत्रावरील आच्छादन बदलाची माहिती व्यवस्थित मिळते. मात्र गावपातळीवरील जैविक उपचारामुळे घडलेल्या बदलांची माहिती मिळवण्यात अडचणी येतात.

पूर्वी उसासारख्या घनदाट वाढणाऱ्या पिकांमुळे या किमती कमी अधिक होत असत. मात्र अलीकडे या तंत्रज्ञानात सुधारणा झाल्या असल्याने ही त्रुटी कमी करणे शक्य झाले आहे.

Vegetation cover index values
Watershed Management : नियमित रोजगार निर्मिती गुणोत्तर

वनस्पती आच्छादन बदलाच्या विविध प्रतिमा व त्याचे अर्थ

उपग्रहांवरील इन्फ्रारेड कॅमेऱ्याने पाणलोट प्रदेशाच्या टिपलेल्या प्रतिमांचे संगणकाच्या साहाय्याने विश्लेषण केले जाते. त्यातून भूपृष्ठावरील विविध घटकांचे क्षेत्र आणि भूमी उपयोग दिसून येतात. या उपग्रह प्रतिमा साधारणतः मूळ रंगाच्या (True Colors) किंवा कृत्रिमरीत्या रंगाची भरणी (False Colour Composite -FCC) केलेल्या असू शकतात. जमिनीवरील विविध घटकांवर पडणाऱ्या सूर्य किरणांचे परावर्तन अथवा उपग्रहाद्वारे सोडलेल्या किरणांचे परावर्तन यांचे संकलन अंकात्मक (डिजिटल) प्रतिमेमध्ये केले जाते.

परावर्तनानुसार विविध रंगच्छटांमध्ये वर्गीकरण केले जाते. त्यातून प्रतिमा बनवली जाते. या आपल्या साध्या प्रतिमांमध्ये लाल, हिरवा, निळा (RGB) या दृश्य रंगच्छटांचे एकत्रीकरण केलेले असते. तर नॉर्मलाइज्ड डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स (NDVI) मध्ये निकट अवरक्त प्रकाश (जो वनस्पती जोरदारपणे परावर्तित करते) आणि लाल प्रकाश (जो वनस्पती शोषून घेते) मधील फरक मोजला जातो.

त्यावरून त्या भागामध्ये वनस्पतींचे प्रमाण ठरवले जाते. याचा अर्थ प्रतिमेमध्ये असलेला लाल रंग जमिनीवरील वनस्पती, पिके अथवा घनदाट अरण्य दर्शवितो. प्रतिमांकन तंत्रामध्ये क्रांतिकारी बदल झाले असून, आता बहू रंगच्छटा प्रतिमा (Multispectral Band) उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आता वनस्पती किंवा पिकामधील थोडा फरकही समजू शकतो. त्याला ‘स्पेक्ट्रल सिग्नेचर’ म्हणतात. अशी माहिती नाशिक येथील सुदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणाली तज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्‍वर पवार यांनी दिली आहे.

या निर्देशांकाचे महत्त्व

या आधी पर्यावरणीय निर्देशांक काढताना आपण कडवंची आणि हिवरे बाजार या गावांची माहिती घेतली होती. त्यानुसार कडवंचीमध्ये १८८८ हेक्टर क्षेत्रापैकी ७९३ हेक्टर क्षेत्र हे वर्षभर आच्छादनाखाली राहते. येथील पर्यावरणीय निर्देशांक ०.४२ इतका येतो. तर हिवरेबाजार गावातील ९७७ हेक्टर क्षेत्रापैकी ७३३ हेक्टर क्षेत्र सदाहरित असून, येथील पर्यावरणीय निर्देशांक ०.७५ इतका येतो. खरेतर या दोन्ही गावातील पावसाची सरासरी ६०० मिलिमीटरपेक्षा जास्त नाही.

तरीही पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापनाची जोड दिल्यामुळे ही गावे सदाहरित झाली आहेत. मात्र या निर्देशांकामध्ये वनस्पतींबरोबर पीक लागवडीचे क्षेत्रही मोजले जाते. आपण आज अभ्यासत असलेल्या वनस्पती आच्छादन बदल निर्देशांक काढण्यासाठी इन्फ्रारेड इमेजिंग तंत्रज्ञानाद्वारे गावाच्या पातळीवरील माहिती फारच खर्चिक ठरते.

त्यामुळे सामाईक मार्गदर्शक सूचना, २००८ मध्ये सविस्तर प्रकल्प अहवाल बनविताना सुदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर करण्याविषयी निर्देश असले तरी त्याकडे सर्वच शासकीय, निमशासकीय व बिगर शासकीय संस्थांनी दुर्लक्ष केले आहे. पिके वगळता खऱ्या घनदाट वनराई किंवा जंगलाखालील क्षेत्र मोजण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयोगी आहे. कारण मध्य भारतातील अनेक गावांमध्ये कमाल तापमानाने उच्चांकावर उच्चांक गाठले आहेत. अनेक ठिकाणी ४५ ते ५२ अंश सेल्सिअस तापमान पोचल्याने पर्यावरण, वनराई आणि जंगले यांच्या वाढ, संवर्धन आणि संरक्षण यासाठी प्रत्येक गावाने प्रयत्न केले पाहिजेत. नैसर्गिक आच्छादन वाढविण्यात आपला वाटा उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (इंदिरा महाविद्यालय, ताथवडे, पुणे) - डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com