Sustainable Agriculture Conference: गुणवत्तापूर्ण उत्पादन, मार्केटिंग साखळी व्यवस्था फायदेशीर

Agrowon 20th Anniversary: देशांतर्गत व परदेशातील ग्राहकाभिमुख बाजारपेठेनुसार निर्यातक्षम गुणवत्तेच्या शेतीमालाचे उत्पादन केल्यास त्याला योग्य विक्री व्यवस्था किंवा शाश्वत बाजारपेठ मिळाल्यास शेती शाश्‍वत करणे शक्य होईल.
Sustainable Agriculture Conference
Sustainable Agriculture ConferenceAgrowon
Published on
Updated on

Pune News: देशांतर्गत व परदेशातील ग्राहकाभिमुख बाजारपेठेनुसार निर्यातक्षम गुणवत्तेच्या शेतीमालाचे उत्पादन केल्यास त्याला योग्य विक्री व्यवस्था किंवा शाश्वत बाजारपेठ मिळाल्यास शेती शाश्‍वत करणे शक्य होईल, असा सूर ‘अॅग्रोवन’च्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘बाजाराच्या दाही दिशा’ या विषयावरील चर्चासत्रात मान्यवर तज्ज्ञांनी व्यक्त केला.

प्रयोगशील युवा शेतकरी राहुल रसाळ (निघोज, जि. अहिल्यानगर), प्रयोगशील केळी बागायतदार व निर्यातदार किरण डोके (कंदर, जि. सोलापूर), ‘हेल्दी फूड बँके’च्या संस्थापिका व मुख्य समन्वयक डॉ. प्रतिभा कोलते (पुणे) आणि प्रयोगशील शेतकरी तथा डेक्कन व्हॅली फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष अजय बेल्हेकर (काळवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) हे वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ यामध्ये सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत अॅग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी केले. या परिसंवादाचे समन्वयन उपमुख्य उपसंपादक मंदार मुंडले यांनी केले.

Sustainable Agriculture Conference
Sustainable Agriculture: शाश्वत शेती आव्हाने आणि संधी

श्री. डोके म्हणाले, की आम्ही ४० एकर शेतीमध्ये केळी व उसाचे पीक घेतो. या पिकांची मार्केटिंग साखळी तयार केली असून, आजवर २००० टन क्षमतेचे स्टोअरेज उभे केले. ८०० ते ८५० कंटेनर केळीची आखाती देशात निर्यात केली. आज पिकवणे सोपे आणि विकणे कठीण असल्याचे जाणवले. त्यामुळेच मार्केटिंगची मूल्यसाखळी उभारण्याचे काम हातात घेतले. यासाठी दर्जावर भर दिला.

सुरुवातीला स्थानिक बाजारपेठांवर लक्ष केंद्रित केले. पुणे, मुंबई, हैदराबाद बाजारपेठांमध्ये जाऊन अभ्यास केला. ग्राहकाला जे हवे ते देण्याचा प्रयत्न केला. बाहेरच्या देशात शेतीचे नियोजन ५-५ वर्षांचे केले जाते. मागणी काय आहे, हे पाहून उत्पादन घेतले जाते. देशांतर्गत बाजारपेठा काबीज करतानाच त्याला विदेशात निर्यातीची जोड देणे आवश्यक आहे. यासाठी स्वतःचा ब्रॅण्ड हवाच, असे सांगत त्यांनी आजवरचा या क्षेत्रातील प्रवास मांडला.

डॉ. कोलते म्हणाल्या, की माझे किचन विषमुक्त करण्याच्या हेतूने माझी धडपड सुरू झाली. आपल्या स्वास्थाचा या प्रक्रियेत शेतीचे आणि जमिनीच्या आरोग्याचे स्थान लक्षात आले. खरेतर शेतकरी व ग्राहक यांचे एकत्रित कुटुंब आहे. तेच आम्ही पुणे शहरात विस्तारले आहे. नैसर्गिकपणे उगवलेल्या अन्नामुळे सुदृढता येते. शेतकऱ्याने स्वतःच्या शेतीमालाचे मूल्यांकन करणे खूप गरजेचे आहे. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकाइतकाच शेतीत राबणारा शेतकरी महत्त्वाचा आहे. सीझनल, लोकल आणि रिजनल याच आधारावर आज शेती चालते. बाजार ही संकल्पना बाजूला ठेवून कुटुंब संकल्पना आम्ही तयार केली, असे त्या म्हणाल्या.

Sustainable Agriculture Conference
Sustainable Agriculture Future: ‘रेसिड्यू फ्री’ उत्पादनात शाश्‍वत शेतीचे भवितव्य

श्री. रसाळ म्हणाले, की आपण २००६-२००७ पासून रेसिड्यू फ्री शेती करीत आहे. माझ्याकडे शेतात उत्पादित केलेला माल हा ९९ टक्के निर्यात होतो. सध्या यूके, नेदरलँडसह विविध देशांत माल निर्यात करतो. सध्या व्यावसायिक शेती करीत असून, १२० एकर शेतीत विविध पीकपद्धतींवर भर दिलेला आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळही अनुभवला. यातूनच व्यवस्थापनात सुधारणा करण्यावर जोर दिला. आज ग्राहकाची मागणी बदलत चालली आहे. यापुढील काळात औषधी गुणधर्म असलेले वाण पिकवावे लागतील, असे ते म्हणाले.

श्री. बेल्हेकर म्हणाले, की गावात २० वर्षांपूर्वी कृषी विज्ञान मंडळाची स्थापना करून काम सुरू केले. सुरुवातीपासून उत्पादन खर्च कमी करण्यावर काम, ‘आयटी’चा वापर करून गुणवत्तापूर्ण माल, विक्री व्यवस्था या तीन बाबींवर जोर दिला. विस्ताराचे काम सुरू केले. थेट मार्केटिंगचे काम २०१३ मध्ये पुणे बाजारात सुरू केले. २०१६ ला ‘डेक्कन व्हॅली’ नावाची शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन केली. आजवर शासनाचा एकही पैसा घेतला नाही. आता जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यात केळीचे हब तयार करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com