
Pune News : गेल्या दोन दिवसांपूर्वी भूसंपादन आणि नुकसान भरपाईवरून पंजाब आणि हरियाणातील १० शेतकरी संघटना नोएडा आणि गाझियाबाद रस्त्यावर उतरल्या होत्या. यामुळे नोएडा महामार्ग जाम झाला होता. पण प्रशासनाने शेतकरी संघटनांची समजूत काढल्याने शेतकरी दिल्लीच्या सीमेवरच थांबले होते. मात्र आता शुक्रवारी (ता.६) पुन्हा एकदा शेतकरी संघटनानी 'दिल्ली चलो'चा नारा दिला आहे. यामुळे पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. शेतकरी दिल्लीकडे येऊ नये, यासाठी नोएडा महामार्गावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर दिल्लीत देखील चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे येथे पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
हमीभाव कायद्यासह विविध मुद्द्यांवर १३ फेब्रुवारीपासून पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. आता भूसंपादन आणि नुकसान भरपाईसाठी १० शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. भारतीय किसान परिषद (BKP), किसान मजदूर मोर्चा (KMM) आणि संयुक्त किसान मोर्चा (SKM) सह इतर संघटनांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 'दिल्ली चलो'चा नारा दिला. शेतकऱ्यांनी नव्या कायद्यानुसार नुकसान भरपाई मिळावी, या प्रमुख मागणीसाठी मोर्चा काढला होता. ज्यामुळे चिल्ला सीमेवर महाजाम झाला होता.
दोन दिवस शेतकरी चिल्ला सीमेवर थांबून होते. पण आता जगजीत सिंह डल्लेवाल आणि सरवन सिंह पंढेर यांनी, शेतकरी दिल्लीकडे कूच करतील, अशी माहिती दिली आहे. मात्र यात किसान मजदूर मोर्चा (KMM) आणि किसान सभेचा सहभाग असणार नाही. शेतकरी संघटनांच्या घोषणेनंतर आता पुन्हा एकदा महामार्ग जाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हरियाणा आणि दिल्लीच्या सीमेवर पोलीस प्रशासनाने ४ हजार हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. यामुळे दिल्लीसह नोएडा महामार्गाला छावणीचे स्वरूप आले आहे.
भूसंपादन आणि नुकसान भरपाईच्या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा १३ फेब्रुवारीपासून आंदोलन करत आहे. फेब्रुवारीमध्ये शेतकऱ्यांनी 'दिल्ली चलो'ची घोषणा केली होती. तेव्हा त्यांना रोखण्यासाठी सरकारने दिल्लीच्या सीमा सील केल्या होत्या. रस्त्यांवर मोठंमोठे काँक्रीट आणि लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. आताही शेतकरी दिल्लीकडे निघाले असल्याने बॅरिकेड्स लावण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
किसान मोर्चा (अराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा सह अनेक शेतकरी संघटनांनी पश्चिम उत्तर प्रदेश आणि नोएडामधील शेतकऱ्यांना भूसंपादन आणि नुकसान भरपाईसाठी एकत्र केले. सोमवारी दिल्लीला जाण्यासाठी ठाम असलेले हजारो शेतकरी चिल्ला बॉर्डर, गाझीपूर बॉर्डर आणि नोएडा गेटवर पोहोचले. त्यावेळी प्रशासनाने त्यांची समजून काढली. मात्र ४८ तासांचा अल्टीमेटम देत शेतकरी तिथेच बसून विरोध करत होते. नोएडा गेटजवळील दलित प्रेरणा स्थळावर शेतकरी अद्यापही आंदोलन करत आहेत.
भूसंपादन आणि नुकसान भरपाईसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आडवल्याने बीकेयू नेते राकेश टिकैत यांनी केंद्रासह राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी आंदोलनात भाग घेतला. मात्र त्यांना आग्रा नोएडा यमुना एक्सप्रेसवेवरील टप्पल येथे यूपी पोलिसांनी अटक केली. यावरून एकच खळबळ उडाली होती. तर शेतकऱ्यांनी याबाबत निषेध व्यक्त करताना पोलीस आम्हाला दिल्लीत पोहचू देत नाहीत. अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यातच थांबवण्यात आल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला.
दरम्यान आज पंजाब पोलिसांनी शंभू सीमेवर शेतकरी नेत्यांची बैठक घेतली. पोलीस उपमहानिरीक्षक मनदीप सिंग सिद्धू (पटियाळा रेंज) आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक नानक सिंग यांनी शेतकरी नेते सर्वन सिंग पंढेर आणि सुरजीत सिंग फूल यांची भेट घेतली. यावेळी मोर्चाबाबत चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच काल याच प्रश्नावरून वॉकआऊट केला. तर याच मुद्द्यावरून राज्यसभा सभापती धनखड यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला होता. आपण सरकार म्हणून शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने का पाळत नाही? असा सवाल केला होता. यावेळी केद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान देखील उपस्थित होते.
यानंतर आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून केंद्रीय कृषी राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांनी पीटीआयला सांगितले की, शेतकरी समाज हा निष्पाप समुदाय आहे. मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. कोणताही मुद्दा असेल, समस्या असेल तर ती शांततापूर्ण चर्चेतून सोडवता येते. उपाय शोधता येतो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी सरकार काम करत असल्याचेही, केंद्रीय कृषी राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.