World Pulses Day : अन्नसुरक्षा, शाश्‍वत शेतीसाठी कडधान्ये महत्त्वाची...

Pulses : जगभरात दरवर्षी १० फेब्रुवारी हा दिवस जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी साजऱ्या होणाऱ्या जागतिक कडधान्य दिनाचे घोषवाक्य “जमीन व मानवाच्या पोषणासाठी कडधान्य” हे आहे.
Pulses
PulsesAgrowon

डॉ. सूदर्शन लटके, डॉ. नंदकुमार कुटे, डॉ. अरविंद तोत्रे

बदलत्या हवामान परिस्थितीत तग धरून कमी पाण्यावर येणारी पिके अशी कडधान्य पिकाची ओळख आहे. जमिनीचा पोत संवर्धन करणाऱ्या तसेच अतिशय कमी पाण्यावर येणाऱ्या कडधान्य पिकांचे शेती व मानवी आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

संयुक्त राष्ट्र महासभेने मान्यता दिल्यानुसार अन्नसुरक्षा पोषण आणि शाश्वत शेतीसाठी कडधान्य पिकांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी २०१९ पासून दरवर्षी १० फेब्रुवारी हा दिवस जागतिक कडधान्य दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. २०२४ या वर्षी साजरा होणाऱ्या जागतिक कडधान्य दिनाचे घोषवाक्य “जमीन व मानवाच्या पोषणासाठी कडधान्य” हे आहे.

खरीप हंगामात तूर, मूग, उडीद, कुळथी, मटकी, राजमा व चवळी ही पिके आणि रब्बी हंगामात हरभरा हे प्रमुख कडधान्य पीक आहे. कडधान्य पिके ही मानवी पोषण तसेच शाश्वत शेतीसाठी अतिशय महत्त्वाची आहेत.

कडधान्य लागवडीचे फायदे

पोषणमूल्य

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संशोधनानुसार प्रति वर्षी प्रती माणशी कमीत कमी १७ ते २५ किलो कडधान्य आहारात वापरणे आवश्यक आहे. म्हणजेच ७० ते ८० ग्रॅम कडधान्य प्रती दिन प्रति माणशी वापरणे आवश्यक आहे.

मोड आलेली कडधान्य पचायला सोपी असतात. त्यामध्ये जीवनसत्वांचे प्रमाण देखील वाढते. ‘क’ जीवनसत्त्व मोड आल्यावर

तयार होते. कडधान्याचा वातूळपणा कमी

होतो. लोह व कॅल्शिअमचे शोषण चांगले होते.

मानवी आहारामध्ये कडधान्य हे वनस्पती आधारित प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहेत. यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. विशेषतः ज्या प्रदेशात मांस किंवा दुग्धजन्य पदार्थ सहज उपलब्ध होत नाहीत किंवा लोकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, अशा ठिकाणी कडधान्य हे प्रथिनांचा मुख्य स्रोत म्हणून कार्य करतात.

डाळींमध्ये तंतुमय घटकांचे प्रमाण जास्त असते, जे पचनास मदत करते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

ही पिके जीवनसत्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत आहेत. लोह, जस्त, फोलेट आणि मॅग्नेशिअम कडधान्य पिकातून आपणास मिळतात.

अन्नसुरक्षेमध्ये देखील कडधान्य पिके हे महत्त्वाचा घटक म्हणून काम करतात. प्रथिने आणि इतर अन्नघटकांचा सर्व आर्थिक स्तरातील लोकांना परवडणारा व सहज उपलब्ध होणारा घटक असल्या कारणाने अन्नसुरक्षा सुधारणा आणि लोकांची अन्नाची गरज भागविण्यास कडधान्य पिकांचा मुख्य वाटा आहे.

Pulses
Pulses Market : कडधान्याची आयात का वाढली?

शाश्वत शेती

कडधान्य पिके ही त्यांच्या मुळावर असलेल्या गाठींद्धारे वातावरणातील मुक्त नत्राचे स्थिरीकरण करतात आणि पिकास उपलब्ध करून देतात. यामुळे पिकांची नत्राची गरज मोठ्या प्रमाणात भागविली जाते. रासायनिक खतांची गरज कमी होऊन पर्यावरण संरक्षण होते.

डाळवर्गीय पीक असल्यामुळे या पिकांच्या मुळांवरील ग्रंथीतील रायझोबियममार्फत हवेतील १२० ते १३० किलो नत्र / हेक्टरी शोषून त्याचे मुळांवरील ग्रंथीमध्ये स्थिरीकरण केले जाते. यामुळे जमिनीचा पोत टिकून राहण्यास मदत होते. जमिनीची सुपीकता वाढते.

पीक पक्व होत असताना त्याचा पालापाचोळा पिकापरत्वे १.५ ते ४ टन प्रति हेक्टर एवढा शेतात गाडला जाऊन जमिनीत सेंद्रिय कर्ब आणि नत्राचे प्रमाण वाढवून जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. परिणामतः जमिनीची सुपीकता व पुढील पिकांचे उत्पादन वाढीसाठी मोठा फायदा होतो.

कडधान्य पिकांची पाण्याची गरज ही इतर पिकांपेक्षा अतिशय कमी असते. कमी पाण्यात ही पिके चांगले उत्पादन देतात. त्यामुळे अवर्षण प्रवण क्षेत्रात लागवडीसाठी ही पिके अतिशय उपयुक्त आहेत.

कडधान्य पिके ही विविध प्रकारच्या हवामान परिस्थितीत तग धरण्यास सक्षम असतात. इतर पिकांमध्ये आंतरपीक म्हणून कडधान्य पीक घेण्यात येतात. यामुळे जैवविविधता आणि जमिनीचे आरोग्य सुधारते.

Pulses
Pulses Market : तूर, हरभऱ्यात तेजी; सरकारला आयातवाढीचे डोहाळे

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या जाती

हरभरा : विजय,दिग्विजय,विशाल फुले विक्रम, फुले विक्रांत, फुले विश्वराज, विराट, कृपा

तूर : फुले राजेश्वरी, विपुला, फुले दमयंती, फुले तृप्ती, फुले कावेरी

मूग : वैभव, फुले चेतक, फुले सुवर्ण

उडीद : फुले वसू, फुले राजन

राजमा : वरुण, फुले राजमा, फुले विराज

चवळी : फुले विठाई, फुले रुक्मिणी, फुले सोनाली

कुळीथ : सीना, माण, फुले सकस

मटकी : एमबीएस २७, फुले सरिता

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या जाती

हरभरा : पीडीकेव्ही कांचन, पीडीकेव्ही कनक, जाकी-९२१८, पीकेव्ही.-२, पीकेव्ही-४

तूर : एकेटी-८८११, पीकेव्ही तारा, पीडीकेव्ही आश्लेषा

मूग : पीकेव्ही ग्रीन गोल्ड

उडीद : पीडीकेव्ही ब्लॅक गोल्ड, टीअेयु-१

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या जाती

हरभरा : बीडीएनजी-७९७, परभणी चना

तूर : बीएसएमआर ७३६, बीडीएन ७११, बीडीएन ७१६, बीडीएन २०१३-४१ (गोदावरी), बीडीएन २०१३-२ (रेणुका)

मूग : बीएम२००३-२, बीपीएमआर-१४५

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या जाती

चवळी : कोकण सदाबहार (व्हीसीएम-८), कोकण सफेद

कडधान्य उत्पादनाची स्थिती

आपला देश कडधान्य उत्पादनाबाबत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. आजमितीस कडधान्य पिकाखालील क्षेत्र व उत्पादनात भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. २०२२-२३ या वर्षी भारतात कडधान्यांचे एकूण उत्पादन २७८ लाख टन इतके झाले.

महाराष्ट्र हे कडधान्य पिकविणारे देशातील प्रमुख राज्य असून सन २०२२-२३ मध्ये कडधान्य पिकाखाली ५० लाख हेक्‍टर क्षेत्र होते. त्यापासून ४४ लाख टन उत्पादन मिळाले. हरभरा,तूर,मूग आणि उडीद ही महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पिके आहेत. राज्याच्या कडधान्य उत्पन्नात हरभरा व तूर पिकांचा मोठा वाटा आहे.

राज्यातील क्षेत्र व उत्पादन वाढीमध्ये कृषी विद्यापीठांनी केलेल्या संशोधनाचा मोलाचा वाटा आहे.

डॉ.सुदर्शन लटके, ७७०९७५४२३३, (कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,जि.नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com