Pulses Market : तूर, हरभऱ्यात तेजी; सरकारला आयातवाढीचे डोहाळे

Pulses Import : यंदा केंद्र सरकार कडधान्यांची विक्रमी आयात करण्याच्या तयारीत आहे. सरकारने यापूर्वीच म्यानमार, मोझांबिक आणि मालावीसोबत कडधान्य आयातीचे करार केले आहेत. तसेच ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया या देशांतूनही आयातीसाठी सरकारने खटपट सुरू केली आहे.
Pulses Market
Pulses MarketAgrowon

Pulses Market Update : देशात यंदा तूर, उडीद आणि हरभरा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या पिकांच्या भावात वाढ झालेली आहे. पण केंद्र सरकार त्यांचे भाव पाडण्यासाठी आयातीवर पूर्ण जोर देत आहे. यंदा सरकार कडधान्यांची विक्रमी आयात करण्याच्या तयारीत आहे.

पण भारताला तूर आणि उडीद आयातीचे पर्याय कमी आहेत. तसेच हरभरा उत्पादनही घटण्याचा अंदाज असल्याने भाव चांगला राहण्याची शक्यता आहे. यामुळे यंदाच्या दुष्काळी वर्षात तूर आणि हरभरा ही पिके शेतकऱ्यांना चांगला आधार देतील, असे चित्र आहे.

देशातील कडधान्य बाजारात यंदा मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे. खरिपातील मुख्य कडधान्य पीक असलेल्या तुरीसह उडीद आणि मुगाचे उत्पादन घटणार आहे. केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२३-२४ मधील उत्पादनाचा जो पहिला अंदाज जाहीर केला आहे,

त्यानुसार तुरीचे उत्पादन ३४ लाख टन, तर उडीद आणि मुगाचे उत्पादन अनुक्रमे १५ व १४ लाख टन होण्याची शक्यता आहे. इतर खरीप कडधान्य पिकांचे उत्पादन ८ लाख टन गृहीत धरले, तरी यंदा खरिपातील एकूण कडधान्य उत्पादन ७१ लाख टनांपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यातही हा पहिला अंदाज आहे. पुढे त्यात आणखी कपात होऊ शकते.

२०२२-२३ च्या खरिपात देशात ७९ लाख टन कडधान्य उत्पादन झाले होते. हे उत्पादन आधीच्या वर्षातील उत्पादनाच्या तुलनेत ५ लाख टनांनी कमी होते. तर यंदाचे पहिल्या अंदाजानुसारचे उत्पादन २०२२-२३ च्या तुलनेत ७ लाख टनांनी कमी राहणार आहे.

देशात यंदाही तुरीचे उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. याची प्रामुख्याने तीन कारणे सांगता येतील. पहिले कारण म्हणजे यंदाच्या खरिपात तुरीची लागवड कमी झाली. हे प्रमाण ५ ते १० टक्क्यांपर्यंत कमी असू शकते. दुसरे म्हणजे यंदा दुष्काळी स्थिती असल्याने बहुतांशी भागात तूर पिकाला पाण्याचा ताण बसला.

परिणामी, पिकाची वाढ कमी होणे, फुले कमी लागणे अशा समस्या आहेत. तर तिसरे कारण आहे कीड-रोगांचं. महाराष्ट्र आणि कर्नाटकात अनेक तूर उत्पादक भागात तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या कारणांनी यंदाही तूर उत्पादन कमीच राहील असा अंदाज आहे.

मागच्या हंगामात (२०२२-२३) तूर उत्पादन केवळ ३३ लाख टनांवर स्थिरावले. आधीच्या वर्षाच्या तुलनेत उत्पादन तब्बल १० लाख टनांनी कमी झाले. देशात २०२१-२२ च्या हंगामात ४३ लाख टन तूर उत्पादन झाले.

देशाची वार्षिक गरज साधारण ४५ लाख टन आहे. म्हणजेच वापरापेक्षा उत्पादन केवळ २ लाख टनांनी कमी होते. पण तरीही केंद्र सरकारने तब्बल ९ लाख टन तुरीची आयात केली. त्यामुळे देशात तुरीचा पुरवठा वाढून भाव पडले होते.

Pulses Market
Chana Market : हरभऱ्याचे दर ऐन दिवाळीत स्थिरावले

रब्बी कडधान्य उत्पादनाची चिंता

२०२२-२३ मध्ये देशात हरभरा उत्पादन घटले होते. मागील हंगामात १२३ लाख टन हरभरा उत्पादन झाले. तर २०२१-२२ मध्ये हरभरा उत्पादन १३७ लाख टनांवर पोहोचले होते. देशातील एकूण उत्पादनापैकी तब्बल १५० लाख टनांपेक्षा अधिक उत्पादन रब्बी हंगामात होत असते. देशाची कडधान्य पुरवठ्याची भिस्त रब्बीवरच आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पण यंदा दुष्काळी स्थिती असल्याने रब्बी हंगामातही उत्पादन वाढण्याची शक्यता नाही.

रब्बीत मुख्य कडधान्य पीक असते हरभरा. बहुतांशी भागांमध्ये हरभऱ्याला सिंचनासाठी पाण्याचा तुटवडा भासू शकतो. हरभरा लागवड आतापर्यंत पाच टक्क्यांनी पिछाडीवर आहे. देशात जवळपास १०१ लाख हेक्टरवर हरभरा लागवड झाली. यापुढील काळात ही पिछाडी भरून निघण्याची शक्यता कमीच आहे.

कारण रब्बी पेरणीसाठी अनेक भागात ओलावा नाही. परिणामी, यंदा हरभरा लागवड घटण्याची शक्यता आहे. त्यासोबतच पिकाला कमी सिंचन आणि बदलत्या वातावरणाचा, उष्णतेचा फटकाही बसू शकतो. इतर पिकांचीही हीच स्थिती आहे. त्यामुळे रब्बी हंगामातही कडधान्य उत्पादन घटण्याची दाट शक्यता आहे.

तेजीचा फायदा शेतकऱ्यांना नाहीच

दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०२१-२२ मध्ये देशात चांगले उत्पादन असतनाही सरकारने मोठी आयात केली. परिणामी, शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला नाही. मागच्या हंगामातही शेतकऱ्यांना फटका बसला. उत्पादन कमी राहूनही शेतकऱ्यांना बाजारात हमीभावापेक्षाही कमी दर मिळाला.

शेतकऱ्यांनी जून महिन्यापर्यंत तूर विकली होती आणि तुरीचे भाव वाढायला सुरुवात झाली जुलै महिन्यापासून. कारण यंदा कमी पाऊस पडणार आणि लागवड तसेच उत्पादन कमी होणार हे स्पष्ट झाले होते. त्यातच उत्पादन घटल्यामुळे स्टाॅक कमी होता. हे सगळे चित्र स्पष्ट झाल्यानंतर बाजारात तुरीच्या भावात तेजी आली. तुरीचे भाव मागील चार महिन्यांपासून १० हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.

हरभऱ्याचंही तेच झालं. हरभरा भावात वाढ झाली; पण तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपला माल विकला होता. आधीच्या वर्षात वर्षभर हरभऱ्याचे भाव कमीच राहिले. त्यातच सुरुवातीला उत्पादनवाढीचे अंदाज होते. यामुळे भाव वाढण्याची शक्यात नसल्याचे गृहीत धरून शेतकऱ्यांनी माल विकला. पण तूर, उडीद आणि मुगाचे भाव तेजीत राहिल्याने हरभराही वाढला. पण याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही.

भाव पाडण्यासाठी सरकारी खरेदी

दरवर्षी सरकार हरभरा हाताशी धरून बाजारावर नियंत्रण मिळवू पाहते. शेतकऱ्यांचा माल बाजारात आला, की किमती हमीभावाच्या खाली जातात. त्यामुळे सहाजिकच नाफेडला हरभरा मिळतो. मागील काही वर्षांपासून सरकार फक्त हरभरा खरेदीवर भर देत आहे. २०२२ च्या हंगामात सरकारने जवळपास २६ लाख टन हरभरा खरेदी केला.

आधीचा स्टाॅक पकडून नाफेडकडे ३८ लाख टनांचा स्टाॅक झाला होता. पण तुरीची खरेदी सरकारने केली नाही. २०२१ च्या हंगामात तूर खरेदी केली, पण फक्त ३६ हजार टन. त्याआधीच्या वर्षात ११ हजार टन तूर खरेदी केली होती. म्हणजेच सरकार सर्व कडधान्यांचे हमीभाव जाहीर करते; परंतु त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी खरेदी मात्र करत नाही.

Pulses Market
Mozambique Tur : तूर पाठवा नाहीतर करार रद्द करू; भारताचा मोझांबिकला इशारा

आयातवाढीसाठी ब्राझीलकडे डोळे

देशात तूर, उडीद आणि हरभऱ्याचे भाव वाढल्यानंतर सरकारने आयातीवर जोर दिला. चालू वित्तीय वर्षात आतापर्यंत जवळपास २१ लाख टन कडधान्य आयात झाली. मसूरची सर्वाधिक ११ लाख टनांच्या आसपास आयात झाली. तूर आणि उडदाची अनुक्रमे साडेसहा आणि साडेचार लाख टन आयात केली गेली. ही आयात ऑस्ट्रेलिया, कॅनडा, म्यानमार, मोझांबिक, टंझानिया आणि मालावी या देशांमधून झाली. यंदा दुष्काळामुळे देशातील कडधान्य उत्पादन घटणार आहे. त्यामुळे आयातीला आणखीनच उधाण येणार आहे.

सरकारने यापूर्वीच म्यानमार, मोझांबिक आणि मालावीसोबत तूर आणि उडीद आयातीचे करार केले आहेत. पण आयात आणखी वाढावी यासाठी सरकार ब्राझीलसोबत तूर आणि उडीद आयातीचे करार करण्याच्या प्रयत्नात आहे. भारतात तुम्हाला हक्काची बाजारपेठ मिळेल, याची शाश्‍वती देऊन ब्राझीलमधील शेतकऱ्यांनी तूर आणि उडदाचे उत्पादन घ्यावे, यासाठी केंद्र सरकार त्यांना प्रोत्साहन देत आहे. ऑस्ट्रेलियातून आयात वाढवता येईल का, याचीही सरकार चाचपणी करत आहे. भारत सरकारने खरेदीची शाश्‍वती दिली आणि चांगला भाव मिळत असेल तर या दोन्ही देशांमधील शेतकरी तूर आणि उडदाचे उत्पादन वाढवू शकतात.

तूर, हरभरा भाव खाणार का?

तुरीचे देशातील उत्पादन आणि आयातीचे पर्याय पाहता यंदा नवा माल बाजारात आला तरी तुरीच्या किमती सध्याच्या भावपातळीपेक्षा जास्त कमी होण्याची शक्यता दिसत नाही. कारण देशात तुरीचा साठा (स्टाॅक) खूपच कमी आहे.

सरकारही खरेदीत उतरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुरीचा बाजार नव्या हंगामातही ८ हजार रुपयांपेक्षा जास्त राहू शकतो. तर बाजारात आवक कमी झाल्यानंतर दराला आणखी आधार मिळेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.

हरभऱ्याचे दरही नवा माल सुरू झाल्यानंतर हमीभावापेक्षा अधिक राहू शकतात. पण सरकारच्या धोरणांचा हरभरा बाजारावर मोठा परिणाम होऊ शकतो. मात्र भाव गेल्या वर्षीप्रमाणे पडण्याची शक्यता कमीच असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com