Child Development : मुलांचे मूलपण जपा

Article by Shivaji Kakde : अभ्यासाचा ताणतणाव लक्षात घेता केंद्र सरकारने सोळा वर्षांखालील मुलांच्या कोचिंग क्लासला बंदी घातली. या निर्णयाचे कारण समजून घ्यायला हवे. पालकांनी आपल्या इच्छा, अपेक्षा मुलांवर न लादता त्यांच्या क्षमता पाहून आवडीला प्रोत्साहन दिले, तर मुले विविध क्षेत्रांत चांगले करिअर करू शकतात.
Child Development
Child DevelopmentAgrowon

शिवाजी काकडे

Supporting Children's Interests : ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी त्यांच्या एका पुस्तकात एक गोष्ट सांगितली आहे. ती गोष्ट अशी... एक मोठा उद्योगपती होता. त्याचा महाल एखाद्या राजवाड्यासारखा होता. त्याने अमाप संपत्ती जमवली होती. त्यामुळे सर्व प्रकारचे सुख त्याच्या पायाशी लोळण घालत होते. वैभवाच्या जोरावर सर्व काही नीट चाललेले असताना एकेदिवशी अचानक त्याच्या महालाला आग लागते.

जळणाऱ्या महालाकडे पाहून त्याला महालातील संपत्ती आठवते. त्या संपत्तीचा जेवढा भाग त्याला वाचवता येईल तेवढा वाचवावा म्हणून तो आपल्या सर्व नोकरांना भराभरा आदेश द्यायला सुरुवात करतो. कोणी नोटांचे बंडल, कोणी सोनं-नाणं-दागिने, कोणी भारी कपडे असं बरंच काही वाचवण्यात यश मिळवतात.

मालकालाही ते पाहून समाधान वाटतं. एवढ्यात एक नोकर मालकाला म्हणतो, ‘‘मालक आता मात्र सगळं महाल ज्वाळांनी वेढला आहे. आता काही वाचवणे शक्य नाही. काही महत्त्वाचं राहून तर गेलं नाही ना?’’ नोकराच्या या प्रश्नांनी मालक नखशिखांत हादरून जातो. त्याचे हातपाय गळाठून जातात. सर्व नोकरांना उद्देशून तो म्हणतो, ‘‘अरे, आमचा छोटा बाळ आतमध्ये पाळण्यात झोपलेला आहे ना!’’

आगीतून मालकाने पैसा, संपत्ती वाचवली, पण या वैभवाचा वारसदार मात्र तो मालक वाचवू शकला नाही. कारण मालकाचा वाचविण्याचा क्रम चुकला होता. त्या उद्योगपतीसारखं वर्तन सामान्यतः कुणी करणार नाही, तरी थोडंसं व्यंग्यार्थाच्या दिशेनं जाऊन पाहिलं, तर असं आत्मघातकी वर्तन स्वतः आपण एकदा नव्हे, तर वारंवार करतो.

Child Development
Hivargaon Exhibition : हिवरगावच्या प्रदर्शनाने दिली अश्‍वपालनास चालना

आपण अनेकदा संपत्ती, सत्ता, प्रतिष्ठा या गोष्टींचा मागे धावताना आपल्या मुलांना आनंद हिरावून घेतो. अभ्यासाच्या तणावातून कोटा शहरात मुलांच्या आत्महत्या होत आहेत. अनेक शाळकरी मुलेदेखील स्वतःच जीवन संपवून घेत आहेत. आज अनेक कोवळी बालके ताणतणावात आहेत. जळणाऱ्या महालात मौल्यवान वस्तू वाचविण्याचा नादात मुलाला गमावणाऱ्या उद्योगपतीत आणि आमच्यात फरक आहे कुठे?

हरवलेले बालपण

विद्यार्थी या शब्दाचा अर्थ ज्याला जाणून घेण्याची इच्छा आहे व जो जिज्ञासू आहे असा होतो. आजची शिक्षण पद्धती जिज्ञासेतून काही जाणून घेण्यापेक्षा परीक्षा केंद्र आणि गुणकेंद्री झाली आहे. आपला मुलगा डॉक्टर, इंजिनिअर आणि अधिकारी व्हावा यासाठी पालकांचा खटाटोप सुरू आहे. आई-वडिलांच्या मुलाबद्दल असलेल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली घरातील मुलांची चांगलीच दमकोंडी झाली आहे.

पालक जिंकण्यासाठी स्पर्धेतील घोड्यासारखे धावत आहेत आणि बाहेरची व्यवस्था याला मदत करते आहे. अशा वातावरणात मुलांचे ‘मूलपण’ हरवत आहे. आपल्या मुलांनी विशिष्ट परीक्षा पास व्हावी यासाठी मुलांची पहिल्या वर्गापासून तयारी सुरू होते. मग त्यासाठी क्लासेस लावले जातात. सकाळी शाळा, दुपारी क्लास आणि रात्री होमवर्क.

Child Development
Rose Farming Techniques : आव्हाने पेलून दिला आयुष्याला ‘गुलाबी अर्थ’

सुट्टीच्या दिवशी देखील मुलांचे क्लास, परीक्षा सुरू असतात. त्यामुळे सुट्टी या संकल्पनेवरच आघात होतो. बागडण्याच्या वयात किती हा अत्याचार? मुलांना खेळणे नाही, गप्पा नाही, अवांतर वाचन, हसणे -खेळणे, मनोरंजन नाही. फक्त चरख्यात ऊस पिळतात तसे पिळून चिपाड होऊन बाहेर पडायचे. घाण्याच्या बैलासारखे अभ्यासाच्या चाकाभोवती फिरत राहायचे.

अभ्यासाच्या या तणावातून शाळकरी मुलेदेखील आत्महत्या करीत आहेत. अभ्यासाच्या तणावामुळे अनेक मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य ढासळत आहे. विशिष्ट क्षेत्रातील करिअर आणि मग पैसा आणि प्रतिष्ठा यामागे पालक धावत आहेत. आपली मुले तणावात आहेत याची कल्पनादेखील अनेक पालकांना नाही. मुलांना प्रेम, आपुलकी, विश्वास, आदर, कौतुक आणि भावनिक आधाराची गरज असते. केवळ मार्कांचा पाठलाग करताना या गोष्टी मुलांना मिळाल्या नाहीत, तर मुले ‘घडण्या’ऐवजी बिघडतात. सततची स्पर्धा मुलांचे बालपण संपवत आहे.

प्रत्येक मूल वेगळ असतं

पाठ्यपुस्तकांची घोकंपट्टी करून परीक्षेत गुण मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे. शिक्षण म्हणजे मुलांचा शारीरिक मानसिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक आणि आध्यात्मिक विकास होय. सतत पुस्तकी अभ्यासामुळे मुलांचा सर्वांगीण विकास खुंटतो. पालकांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मुलांचा आहार, व्यायाम, खेळ, कला, अवांतर वाचन याकडे देखील लक्ष द्यावे.

जसे प्रत्येकाचे बाह्यरूप वेगळे असते, तसे प्रत्येकाची बुद्धी क्षमता अभिरुची देखील वेगवेगळे असते. आपला मुलगा डॉक्टर इंजिनिअरच व्हावा, हा पालकांचा अट्टहास चुकीचा आहे. कला, विज्ञान, वाणिज्य, समाजशास्त्र, कायदा या क्षेत्रांतही करिअरच्या संधी आहेत. पालकांनी आपल्या इच्छा, अपेक्षा मुलांवर न लादता त्यांच्या क्षमता पाहून आवडीला प्रोत्साहन दिले तर मुले विविध क्षेत्रांत चांगले करिअर करू शकतात.

मुलांना समजून घेऊया

शिक्षक म्हणून मी मुलांचं भावविश्व समजून घेण्यासाठी मुलांसोबत मनसोक्त गप्पा मारतो. यातून मुलांचे विचार, कल्पना लक्षात येतात. सहज गप्पांच्या ओघात मी मुलांना विचारले, ‘‘तुमच्या आई - वडिलांना तुम्ही आवडता का?’’ एका मुलीने पटकन ‘नाही’ असे उत्तर दिले. मी प्रतिप्रश्न करून कारण विचारले तर तिचे उत्तर असे होते, ‘‘सर कितीही अभ्यास करा, आमच्या माय - बापाचं पोट भरत नाही आणि मला कधी चांगलं पण म्हणत नाहीत.

सारखं अभ्यास कर, अभ्यास कर एवढंच सुरू असतं.’’ बाकी मुलांचीही अशीच व्यथा समोर आली. आपली मुलं अजून थोडी हुशार असावी, असे पालकांना वाटणे यात काही वावगे नाही. परंतु मुलांनी जे काही केले त्याचंही ‘तू हे छान केलंस हं!’ असं कौतुक पालकांनी जरूर करावं. मुलांचं कौतुक केले की ती खुलतात, फुलतात आणि अजून चांगलं काम करतात. मी चांगला माणूस आहे. माझ्यात अनेक क्षमता आहेत.

माझ्या भोवतालच जग खूप चांगलं आहे. मला काहीतरी चांगलं करायचं आहे, असं मुलांना वाटलं पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नये. कधी कधी मुलं परीक्षेतील अपयशाने कोसळतात, तेव्हा त्यांना आधार देण्याचे काम पालकांनी करावे. प्रत्येक प्रसंगात ‘मी तुझ्यासोबत आहे’ हा विश्वास पालकांनी मुलांना द्यावा. आई - वडिलांशिवाय मुलांनी जगात विश्वास शोधायचा कुठे?

विकासाच्या प्रक्रियेत हे महत्त्वाचा असतं. पालकांनी मुलांना विश्वास दिला की मुलांचे आत्मबळ वाढते. आई - वडील आणि शिक्षकांच्या प्रेम, विश्वास, कौतुक आणि संवादामुळे मुलांचं आत्मबळ वाढते. आपली मुले केवळ पुस्तकी आणि परीक्षार्थी होऊ नये, यासाठी पालकांनी, शिक्षकांनी मुलांना वाचन, मनन आणि चिंतन करण्याची आवड लावावी. शिक्षणातून मुलांचे बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक जीवन समृद्ध व्हावे. आपली मुले मनातून समाधानी, शांत, समृद्ध व मूल्य जपणारी असावीत यासाठी पालक, शिक्षक आणि व्यवस्थेने जबाबदारी घेऊन मुलांचे ‘मूलपण’ जपावे.

(लेखक सहायक शिक्षक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com