
Buldana News : सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. प्रामुख्याने घरकुल, पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य अशा विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून समाजातील आर्थिक दारिद्र्य दूर करता येते. यंत्रणांनी योजनांच्या अंमलबजावणीतून समाजातील शेवटच्या घटकाचा सर्वांगिण विकास साधावा, अशा सूचना खासदार प्रतापराव जाधव यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा (जिल्हा विकास समन्वयन व सनियंत्रण समिती) समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते व समिती सदस्य उपस्थित होते.
खासदार जाधव म्हणाले की, केंद्र शासनाच्या वतीने रस्ते बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील चिखली-मेहकर, चिखली-जालना, शेगाव-खामगाव या रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे.
काही रस्ते आणि पुलांचे कामे सदोष झाले आहेत. त्यावर योग्य ती कार्यवाही करून नागरिकांना सोयीचे व्हावे, यासाठी कामे करावीत. राष्ट्रीय महामार्गाची काही ठिकाणी उंची वाढली आहे. त्यामुळे पोचमार्गाची योग्य दुरुस्ती प्राधान्याने करावी. महामार्गाचे काम करताना जनतेच्या तक्रारींचे निरसन होईल याची दक्षता घ्यावी.
सिंचन प्रकल्पांमुळे गावांच्या पुनर्वसनाचे प्रश्न आहे. जिगाव प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन तातडीने पूर्ण करा. यावर्षी कमी पावसामुळे पाणी टंचाई निर्माण होवू शकते. त्याअनुषंगाने पाणी साठविण्याचे नियोजन करावे. शेतकऱ्यांसाठी पीकविमा आधार ठरत आहे. त्यामुळे सततचा पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसान भरपाई रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीककर्जाच्या वेळी सीबिलची अट रद्द करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळण्यासाठी बँकांना सूचना देण्यात याव्यात. महिलांसाठी बचतगटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सबल करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण द्यावे.
प्रशिक्षणात तयार केलेल्या साहित्याचे पॅकिंग, मार्केटिंगचे सविस्तर माहिती द्या. बचत गटाच्या उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी विक्रीसाठी योग्य जागा उपलब्ध करुन द्यावी. पंतप्रधान आवास योजनेतून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही श्री. जाधव यांनी दिल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.