
श्रद्धा चमके
Rose Crop Management : हर्षदा सोनार यांचे माहेर मुंबईचे. लग्नानंतर त्या पुण्यात आल्या. पती सणसवाडी येथे एका ‘स्टील’ उद्योगातील कंपनीत नोकरी करतात. हर्षदा यांनी संगणकीय शाखेतून पदविका प्राप्त केली. त्यानंतर त्या एका कंपनीत मनुष्यबळ प्रशासन विभागात नोकरीस रुजू झाल्या. नोकरी चांगल्या पगाराची होती.
सुव्यवस्थित जीवन सुरू असताना स्वतःची वेगळी ओळख तयार करायची अशी इच्छा मनात होती. नोकरीवरून ये-जा करताना फुले, बुके विक्री केंद्रे दृष्टीस पडायची. खरेदीही व्हायची. त्यातून मोहक गुलाबी फुलांविषयी आवड व त्याच्या शेतीविषयी कुतूहल निर्माण झाले. आपणही या शेतीत उतरावे असे वाटू लागले. अखेर मनाशी खूणगाठ बांधून नोकरी सोडून पूर्णवेळ गुलाब शेतीचे आव्हान पेलण्यासाठी हर्षदा सिद्ध झाल्या.
जिद्दीन गुलाब शेतीत पदार्पण
माहेर मुंबईचं असल्याने शेतीचा अनुभव काहीच नव्हता. पुण्यात सासरी देखील शेती नव्हती. पण जिद्द व धडाडी असलेल्या हर्षदा यांनी तळेगाव येथील पॉलिहाउस प्रशिक्षण संस्था गाठली. तेथे माहिती घेऊन आठ दिवसांचा ‘बेसिक’ अभ्यासक्रमही पूर्ण केला. पतीच्या कंपनीत काही जण पॉलिहाउसमध्ये गुलाब शेती करायचे. त्यांच्याकडूनही मार्गदर्शन घेतले. इंटरनेट,
यू-ट्यूबवरून काही माहिती घेतली. एवढ्या ज्ञानाच्या तसेच आत्मविश्वासाच्या भांडवलावर २०१६ मध्ये पुण्यापासून काही किलोमीटरवरील शिक्रापूर येथे २० गुंठे क्षेत्रावरील पॉलिहाउस भाडेतत्त्वावर घेतले.
सुरुवातीची खडतर वाटचाल
पॉलिहाउसमधील सुरुवातीची काही वर्षे अत्यंत खडतर गेली. पहाटे पाच वाजता उठायचे, घरची आवराआवर, स्वयंपाक करायचा. मग पुण्याहून शिक्रापूरसाठी बसमार्गे पाबळ फाटा गाठायचा. तेथे ठेवलेल्या दुचाकीवरून साडेसात किलोमीटर अंतर कापून शेताच्या ठिकाणी यायचे. त्वरित शेतातील कामे सुरू करून राबायचे. पुन्हा याच मार्गाने संध्याकाळी घरी परतायचे.
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशी कोणतीही पर्वा केली नाही. या काळात मशागतीपासून ते रोपे लावणे, फवारणी, खते देणे, फुलांची काढणी, काढणीपश्चात विक्री नियोजन, माल गुलटेकडी येथे स्थानिक वाहनातून पाठवणे अशी सर्व कामे हर्षदा शिकल्या. आज गुलाबशेतीतील अनुभव सुमारे सात ते आठ वर्षांचा झाला आहे.
शिक्रापूर येथील ही शेती कोरोना संकटामुळे थांबवावी लागली. मग खेड शिवापूर येथे एक एकर क्षेत्रावरील पॉलिहाउसमध्ये ही गुलाब शेती सुरू आहे. सर्व आव्हानांवर मात करत हर्षदा या शेतीत चांगल्या स्थिरावल्या आहेत.
...अशी आहे गुलाबशेती
एक एकरात डच गुलाब जातीच्या सुमारे २७ हजार रोपांचे व्यवस्थापन होते. सल्लागाराची मदतही घेतली जाते. त्यामार्फत खते, कीडनाशके यांचा वापर होतो. खरे तर अधिकाधिक सेंद्रिय निविष्ठांचा वापर करूनच गुलाब उत्पादन घेण्याचा माझा प्रयत्न असतो. मात्र रासायनिक कीडनाशकांचा वापर अनिवार्य ठरतो असे हर्षदा म्हणतात.
एप्रिल-मे महिन्यांत कडक ऊन असते. अशा वेळी तापमान नियंत्रित राहावे यासाठी पडदे लावून अथवा सकाळी लवकर ‘बेड’वर सिंचन करून गारवा तयार केला जातो. वर्षभरातील काही महिने वा कालावधी उत्पादन थंडावते. मात्र एकूण सरासरी पाहिल्यास महिन्याला सव्वा लाखांपर्यंत फुलांचे उत्पादन मिळते.
विक्री व्यवस्था
जानेवारी ते एप्रिल तसेच लग्नसराई, परीक्षांच्या काळात गुलाबाला मोठी मागणी असते. त्या दृष्टीने काढणीचे नियोजन करावे लागते. कारण एकदा फूल तोडल्यानंतर दुसरे फूल येण्यास ४० दिवसांचा कालावधी लागतो. दररोज ८०० ते १२०० फुलांचे ‘हार्वेस्टिंग’ केले जाते. गुलटेकडी येथे व्यापारी निश्चित केला आहे.
त्यालाच फुलांचा पुरवठा होतो. पुणे शहरातील काही फूल व्यावसायिकांनाही काही प्रमाणात विक्री होते. वीस फुलांचा बंच असतो. प्रति बंच ४० रुपयांपासून ते कमाल २५० रुपयांपर्यंतही दर मिळतो. अनेक वेळा दर नीचांकी देखील घसरतात. एक एकर पॉलिहाउसचे मासिक भाडेशुल्क ३० हजार रुपये आहे. तर कामगारांचे वेतन, निविष्ठा आदी सर्व मिळून महिन्याला ८० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र सुनियोजन व व्यवस्थापनातून महिन्याला समाधानकारक नफा मिळविण्यापर्यंत हर्षदा यांनी यश मिळवले आहे. सणासुदीला तसेच ‘व्हॅलेंटाइन डे’च्या काळात उत्पन्नात वृद्धी होते.
शेतीने दिले समाधान
पूर्वी नोकरीत ठरावीक शिफ्टमध्ये काम करण्याचे बंधन होते. आता गुलाबशेतीतून स्वतः मालक झाल्याचे समाधान मिळाले आहे. नोकरीपेक्षही चांगले उत्पन्न मिळत असून चार व्यक्तींना रोजगारही देता आला आहे याचा आनंद वेगळाच असल्याचे हर्षदा सांगतात. पूर्वी बस व दुचाकीवरून शेताला जायचे.
आता स्वतः ‘कार ड्राइव्ह’ करून हा प्रवास करते असेही त्या अभिमानाने सांगतात. पती प्रशांत यांची मोठी साथ त्यांना मिळते. मुलगी खुशी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. हर्षदा सांगतात, की नियोजनबद्ध काम केल्यास शेती फायद्याची होते. पण मुळात कामगारांवर आपली मदार असल्याने त्यांना सांभाळणे तसेच एकूणच आर्थिक नियोजन या बाबी महत्त्वाच्या असतात. फुलांना योग्य पद्धतीने हाताळावे लागते. कारण त्यांच्या दर्जावर बाजारात दर ठरत असते. इच्छाशक्ती, कष्ट करण्याची तयारी व चिकाटी असेल तर तर महिलांपासून कोणतेही यश दूरचे नाही हाच संदेश हर्षदा यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केला आहे.
हर्षदा सोनार ९७३०९३६००४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.