Hivargaon Exhibition : हिवरगावच्या प्रदर्शनाने दिली अश्‍वपालनास चालना

Article by Suryakant Netke: हिवरगाव पावसा (जि. नगर) येथे दरवर्षी ग्रामदैवत खंडोबाची माघी पौर्णिमेनिमित्त यात्रा भरते. या निमित्ताने सात वर्षांपासून अश्वप्रदर्शन भरवण्याची परंपरा अखंड सुरू आहे.
Horse Hivargaon Exhibition
Horse Hivargaon ExhibitionAgrowon

Success Story of Horse Hivargaon Exhibition : नाशिक- पुणे राज्य मार्गावरील हिवरगाव पावसा (ता. संगमनेर, जि. नगर)) येथे ग्रामदैवत खंडोबाची दरवर्षी माघी पौर्णिमेनिमित्त यात्रा भरते. यंदाही ही यात्रा नुकतीच पार पडली. देवगड संस्थान नावाने हे ठिकाण प्रसिद्ध आहे. जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांमधून यावेळी भाविक येतात.

सुमारे सात वर्षांपूर्वी यात्रेतील पालखीसाठी तालुक्यातून अश्व आणण्यात आले. त्यावेळी संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख उपस्थित होते. अनेक वर्षांपासून त्यांना अश्वपालनाची आवड असल्याने यात्रेनिमित्त अश्व प्रदर्शन भरवण्याची संकल्पना त्यांनी मांडली. आणि ती सुरूही झाली.

सुरुवातीला संगमनेर, राहाता, अकोलेसह जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजण्याएवढे अश्वपालक होते. संगमनेर अश्वप्रेमी असोसिएशन स्थापन झाल्यानंतर अश्‍वपालक शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली.

आता शेजारील नाशिक भागातील अश्वपालकही प्रदर्शनात सहभागी होताना दिसतात. शेतीला पूरक अशा या अश्वांच्या पालनासाठी शेतकऱ्यांना प्रेरित करण्यासाठी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही प्रदर्शनाला प्रोत्साहन दिले.

Horse Hivargaon Exhibition
Vegetable Farming : कुटुंबाने बनविला भाजीपाला शेतीत ‘ब्रॅण्ड’

अश्‍व प्रदर्शनाचे स्वरूप

यात्रा चार दिवस तर त्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी अश्‍वप्रदर्शन भरते. सलग सात वर्षांपासूनही परंपरा सुरू आहे. सांगली, फलटण, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, मुंबई, नांदेड, विदर्भासह पंजाब, राजस्थान, गुजरात भागातील अश्‍वांचा यात सहभाग असतो. मारवाड, सोनपुरी, सिंधी, पंजाबी, काठेवाडी, नुकरा, सिंदे मारवाड आदी जातींची विविधता या वेळी पाहण्यास मिळते.

केवळ अश्व व त्यांची स्पर्धा पाहण्याचे अप्रूप म्हणून येणारे शेतकरी व शौकींनाची संख्या देखील मोठी असते. पहिल्या वर्षी प्रदर्शनात सहभागी अश्‍वांची संख्या केवळ १० होती. आता ही संख्या साडेतीनशेपर्यंत पोहोचली आहे. यंदाही ती लक्षणीय होती. राज्यात होणाऱ्या अश्व प्रदर्शनांपैकी हिवरगाव पावसा हे ठिकाण आता नावारूपास आले आहे. प्रदर्शनात आता देशी जनावरांचाही सहभाग होऊ लागला आहे.

वैशिष्ट्ये व स्पर्धांचे आयोजन

येथे अश्वांची खरेदी विक्रीही होते. तीन लाखांपासून ते उच्च म्हणजे काही लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत अश्वाला दर मिळतो. मारवाड घोड्याला वीर्यमात्रेसाठी अधिक मागणी असते. तर सफेद नुकरा अश्वाला पालन, लग्न व अन्य समारंभातील व्यवसायासाठी अधिक मागणी असते.

अश्वाचे सौंदर्य, वजन, उंची, बाळभवरी, समयसूचकता, चाल, झेप या बाबी त्याची किंमत ठरवतात. अश्वांची स्पर्धाही घेण्यात येते. यात सर्वोत्कृष्ट अश्वासाठी सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रासह ५१ हजार, ३१ हजार, २१ हजार, ११ हजार असे प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ व सात हजारांचे उत्तेजनार्थ अशी बक्षिसे दिली जातात. याशिवाय सर्वोत्कृष्ट अश्व व घोडी, सर्वोत्कृष्ट लहान अश्व (घोडा- घोडी) आदंत व दोन दात यासाठी

प्रत्येकी ११ हजार, सात हजार व पाच हजार, सर्वोत्कृष्ट चालींसाठी सात हजार, पाच हजार व तीन हजार, नुकरा अश्व व घोडीसाठी प्रत्येकी पाच हजार, तीन हजार व दोन हजार अशी एकूण २६ वेगवेगळी पारितोषिके देऊन सन्मान केला जातो. त्यामुळे दरवर्षी अश्वसहभागींची संख्या वाढत आहे. नगर जिल्ह्यातील सचिन अरुण जगताप यांचा ‘बी जस्पर’ हा राज्यातील सर्वांत उंच समजला जाणारा अश्व यंदाच्या प्रदर्शनातील आकर्षण ठरला.

Horse Hivargaon Exhibition
Sugarcane Production : एकरी ८० टन ऊस उत्पादनात राखले सातत्य

भीमथडी जातीची झाली नोंद

महाराष्ट्रात पूर्वी स्थानिक वाणांच्या अश्वाचे पालन व्हायचे. प्रामुख्याने भीमा नदीच्या पट्ट्यातील अश्वाला ‘भीमथडी’, तर नीरा नदीच्या पट्ट्यातील अश्वाला ‘निरथडी’ संबोधले जाई.

खडकाळ, डोंगराळ भागांत सहजपणे चालणारे, उंचीला व वजनालाही लहान आणि चपळ अशा या अश्वांचा शिवकालापासून लढायांसाठी वापर होई. अलीकडील वर्षांत त्यांचे पालन कमी झाले आणि या जाती नामशेष होऊ लागल्या. भटकंती करणाऱ्या लोकांकडे काही प्रमाणात त्या आढळतात. या स्थानिक

जातींच्या संवर्धनासाठी बारामती येथील रणजीतअण्णा पवार यांनी पुढाकार घेतला आहे. यंदा केंद्र सरकारकडे ‘भीमथडी’ जातीच्या अश्वांची अन्य जातीसोबत नोंद झाली आहे.

ज्याच्याकडे घोडदळ भक्कम, त्यांना जिंकण्याची संधी हे जुन्या काळचे ब्रीदवाक्य होते. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, सिकंदर यांच्या अश्वांचा नावलौकिक अजून कायम आहे. अलीकडील काळात शेतीशी निगडित अश्वांचे पालन सुरू झाले. परंतु हे प्रमाण अपेक्षित नसल्याने आम्ही देवगड (हिवरगाव पावसा) येथील यात्रेच्‍या निमित्ताने अश्वप्रदर्शन सुरू केले. आता अश्वांचे महत्त्व व अश्‍वपालकांची संख्याही वाढू लागली आहे.
रणजितसिंह देशमुख, अध्यक्ष, अश्वप्रेमी असोसिएशन
अश्वपालन हा शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय आहे. मात्र त्याबाबत फारसे प्रोत्साहन दिले जात नसल्याने त्याचे व्यावसायिक पालन केले जात नव्हते. अश्व प्रदर्शनामुळे त्यास प्रेरणा मिळून आमच्या गावांत शंभराहून अधिक अधिक अश्वाचे पालन केले जात आहे.
किरण गुंजाळ, ९८२२५३४०७५ अश्वपालक, संगमनेर खुर्द, ता. संगमनेर

संपर्क : सुरेश जोंधळे (ॲड) ९६७७६९३८९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com