
Turmeric Farming : हळद हे महत्त्वाचे तसेच बहुउपयोगी मसाला पीक म्हणून प्रचलित आहे. राज्यातील एकूण हवामानाचा विचार केला असता हळद पीक उत्तमरीत्या घेता येते. निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी पूर्वमशागतीपासून हळद प्रक्रिया, हळद बेणे साठवणुकीपर्यंत पिकाचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे असते.
सध्या हळद काढणीचा हंगाम सुरू आहे. खांदणी करून काढलेले कंद २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले सुकू द्यावेत. कंद सुकल्यामुळे कंदांना पाणी सुटते, त्यामुळे कंदास चिकटलेली माती पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते. त्यानंतर २ दिवसांनी हळदीच्या कंदाची मोडणी करावी. हळद कंदाचा गड्डा हळूच आपटला असता गड्ड्याला चिकटलली माती वेगळी होण्यास मदत होते.
त्या वेळी जेठागड्डे (मातृगडडे), बगल गड्डे, सोरागड्डे, हळकुंडे आणि या व्यतिरिक्त रोग व कीडग्रस्त हळकुंडे अशा प्रकारे कच्च्या मालाची प्रतवारी करावी. प्रतवारीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी. बेणे निवड करताना रोग व कीडग्रस्त अथवा अर्धवट कुजलेले गड्डे साठवणीमध्ये येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. यापैकी जेठागड्डे, बगलगड्डे आणि हळकुंडे लागवडीसाठी बेणे म्हणून वापरता येतात.
बेणे निवडताना शास्त्रीय पद्धतीने काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. निवडलेले बेणे जातिवंत, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, सुप्तावस्था संपलेले, निरोगी, रसरशीत व चांगले असेल तर उत्पादन देखील चांगले मिळते.
अ) जेठागड्डा ः
- मुख्य रोपाच्या खाली वाढणाऱ्या कंदास ‘जेठागड्डा’ अथवा ‘मातृकंद’ असे म्हणतात. प्रामुख्याने पुढील वर्षी लागवडीसाठी बेणे हे मातृकंदाचेच ठेवावेत. त्यानुसार हळद कंदापासून मातृकंद वेगळे करावेत.
- सशक्त, निरोगी, जाड मातृकंद (गड्डे) बेणे म्हणून निवडून काढावेत. बेण्यासाठी निवडलेल्या मातृकंदाचे वजन ५० ग्रॅमपेक्षा जास्त, आकाराने त्रिकोणाकृती असावे. काढणीनंतर हे गड्डे ताबडतोब सावलीमध्ये ठेवावेत.
ब) बगल गड्डे ः
- जेठे गड्ड्याला आलेला फुटव्यांच्या खाली येणाऱ्या गड्ड्यांना ‘बगल गड्डे’ असे म्हणतात. त्यास ‘अंगठा गड्डे’ असेही म्हणतात.
- ४० ग्रॅम पेक्षा जास्त वजन असणाऱ्या गड्ड्यांचा वापर बेणे म्हणून केला जातो.
क) हळकुंडे ः
- बगल गड्ड्यांना आलेल्या कंदास ‘हळकुंडे’ असे म्हणतात. हळकुंडे देखील बेणे म्हणून वापरले जातात. मातृकंद कमी पडत असतील, तर हळकुंडे बेणे म्हणून वापरावेत.
- बेण्यासाठी निवडलेल्या हळकुंडांचे वजन ३० ग्रॅम पेक्षा जास्त असावे. निवडलेली हळकुंडे ठळक, लांब, जाड, ठसठशीत वाढलेली, निरोगी आणि एकसमान आकाराची भेसळमुक्त असावीत.
ड) सोरागड्डा ः
- लागवडीच्या वेळेस वापरलेले जेठागड्डे (मातृकंद) हळद पिकाच्या नऊ महिने वाढीच्या कालावधीत ५० ते ६० टक्के कुजून जातात. उर्वरित ४० ते ५० टक्के कंदांना ‘सोरागड्डे’ असे म्हणतात.
- सोरागड्डे हे काळपट रंगाचे तसेच मुळ्या विरहित असतात. बेणे म्हणून सोरागड्डे वापरता येत नाही.
बेण्याची साठवणूक ः
- निवडलेले हळद बेणे त्वरीत झाडाखाली सावली असलेल्या थंड ठिकाणी ढीग करून साठवावेत. बेण्याचा ढीग करताना हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. अन्यथा, बेण्याच्या उगवणीवर परिणाम होण्याची शक्यता असते.
- बेण्याचा ढीग करताना थोडासा उंचवटा करून कोन पद्धतीने ढीग करून रचावेत.
- बेण्याच्या ढिगावर हळदीच्या वाळलेल्या पानांचा १० ते १५ सेंमी जाडीचा थर द्यावा. जास्त तापमान असलेल्या ठिकाणी हळदीच्या वाळलेल्या पाल्यावर गोणपाट टाकावे आणि केवळ गोणपाट भिजेल एवढेच पाणी गोणपाटावर मारावे.
- साधारणपणे दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीपर्यंत बेणे सुप्तावस्थेत जाते. या कालावधीत केवळ बेण्याच्या अंतर्गत बदल अथवा शरीरक्रिया घडून येत असतात. कोणत्याही स्वरुपात बाह्य बदल दिसून येत नाही.
- सुप्तावस्था संपेपर्यंत बेण्यावर पाणी शिंपडू नये. दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीत सर्व बेण्यांची सुप्तावस्था पूर्ण होते.
- सुप्तावस्था संपल्यानंतर बेण्यामध्ये बदल दिसून यायला सुरुवात होते. या वेळी बेण्यावरील डोळे फुगीर होतात. डोळे फुटण्यास प्रारंभ होतो. त्यानंतर मात्र बेणे पुन्हा निवडावेत, बेण्यावरील मुळ्या काढाव्यात, पानांचे शिल्लक राहिलेले अवशेष काढावेत आणि मुळ्याविरहित रसरशीत निरोगी बेणे लागवडीसाठी वापरावेत.
- निवडलेल्या बेण्यात कंदकुज या रोगाचे अथवा कंदमाशी या किडीचे कोणतेही अवशेष राहणार नाही याची पूर्णत: खात्री करावी. जेणेकरून रोगांचा वा किडींचा प्रादुर्भाव शेतात होणार नाही. यासाठी हळकुंडे बेणे मध्यभागी दोन भाग करून बघावे.
- लागवड करण्यास थोडाफार अवधी असेल, तर दिवसातून दोन वेळेस बेण्यांच्या ढिगावर पाणी शिंपडावे. पाणी शिंपडल्यामुळे बेण्यांची एकसारखी उगवण होण्यास मदत होते.
- उष्ण सूर्यप्रकाश, वारा यांचा बेण्याशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. बेणे दर्जेदार असेल तर उत्पादन वाढीस निश्चितच हातभार लागतो.
- डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४
(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.