Grape Plant Production : उतिसंवर्धनाद्वारे रोगमुक्त द्राक्ष रोपांची निर्मिती

Grape Farming : २००० ते २०२१ या दरम्यान भारतातील द्राक्षाखाली क्षेत्र ६.३५ टक्के वाढले असून, उत्पादन ५.०७ टक्के वाढले आहे. मात्र द्राक्षाची उत्पादकता १.२ टक्क्याने वाढल्याचे दिसते.
Grape Farming
Grape FarmingAgrowon
Published on
Updated on

शर्मिष्ठा नाईक, प्रतीक्षा यानभुरे, प्रशांत निकुंभे

Disease Free Grape Plants : भारत आणि महाराष्ट्रामध्ये काही ठरावीक भागामध्ये असलेली द्राक्षाची लागवड आता अन्य भागांतही वेगाने पसरत आहे. गेल्या वीस वर्षाचा आढावा घेतल्यास, २००० ते २०२१ या दरम्यान भारतातील द्राक्षाखाली क्षेत्र ६.३५ टक्के वाढले असून, उत्पादन ५.०७ टक्के वाढले आहे. मात्र द्राक्षाची उत्पादकता १.२ टक्क्याने वाढल्याचे दिसते. द्राक्षाचे उत्पादन वाढविण्यासाठी उच्च उत्पादनक्षम जातींच्या विकासासोबतच त्यांची रोगमुक्त रोपांची उपलब्धता वाढविण्याची आवश्यकता आहे. रोगमुक्त रोपांच्या निर्मितीसाठी उतिसंवर्धनाचे (टिश्यू कल्चर) तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरत आहे.

द्राक्षवेलींवर वेगवेगळ्या विषाणूंचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे होणाऱ्या रोगांमुळे द्राक्ष उत्पादनावर आणि एकूणच उत्पादकतेवर गंभीर परिणाम होतात. द्राक्ष बागा दीर्घकाळ टिकण्यासाठी आणि त्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी रोगमुक्त द्राक्ष रोपांची गरज आहे. सध्या भारतात नवीन द्राक्ष लागवड करण्यासाठी द्राक्ष रोपांची मागणी खासगी रोपवाटिकांद्वारे पूर्ण केली जाते. त्यात प्रामुख्याने कटिंग, बडिंग आणि ग्राफ्टिंग या पारंपरिक पद्धतीचा वापर केला जातो.

मात्र या प्रक्रियेमध्ये जर विषाणू वा अन्य रोगांनी प्रादुर्भावग्रस्त कटिंग, बड वापरले गेले तर या रोगांचा प्रसार नव्या बागेतही लवकरच होतो. परिणामी, बागेचे एकरी उत्पादन घटते व बाग दीर्घकाळ चालण्यात अडचणी येतात. म्हणजेच एका छोट्या चुकीमुळे दुहेरी नुकसान होते. भारतामध्ये अद्याप विषाणूजन्य रोगामुळे होणाऱ्या नुकसानीच्या प्रमाणाचा अभ्यास झालेला नाही. मात्र नवीन लागवड करताना विषाणूमुक्त द्राक्ष रोपांची लागवड करणे ही काळाची गरज आहे. कारण त्यातूनच भविष्यातील मोठे नुकसान टाळणे शक्य आहे.

Grape Farming
Grape Production : द्राक्ष उत्पादनात प्रकाशाची भूमिका

विषाणू व अन्य रोगमुक्त द्राक्ष रोपांच्या निर्मितीसाठी ‘इन विट्रो कल्चर’ (मेरिस्टेम कल्चर आणि मायक्रोप्रोपॅगेशन) या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. इन विट्रो कल्चर तंत्रज्ञानाचे फायदे लक्षात घेऊन भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने (DBT), बियाणे कायदा १९६६ अंतर्गत उतिसंवर्धन पद्धतीने प्रसारित केलेल्या पिकांच्या गुणवत्ता व्यवस्थापनासाठी एक अनोखी प्रणाली (NCS-TCP)अधिसूचित केली आहे. (https://dbtncstcp.nic.in/) सध्या ही प्रणाली सफरचंद, केळी आणि मोसंबी या फळांच्या उत्पादनासाठी वापरली जात असून, या फळपिकांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. रोगमुक्त लागवड साहित्याच्या पुरवठ्यासाठी द्राक्ष पिकांमध्ये अशा आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे.

गेल्या काही दशकांमध्ये द्राक्षांमध्येही उती संवर्धित रोपांच्या निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यात ‘मायक्रोप्रोपोगेशन प्रोटोकॉल’ विकसित करण्यासोबतच ‘मेरिस्टेम कल्चर’ आणि ‘सोमेटिक हायब्रिडायझेशन’ यासारख्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. ही तंत्रे वनस्पतींमधून विषाणूंचे समूळ उच्चाटनासाठी महत्त्वाची ठरतात.

- शर्मिष्ठा नाईक, ७७६९८०४७७७ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Grape Farming
Grape Farming : द्राक्ष उत्पादकांशी जोडला गेलो

टिश्यू कल्चर म्हणजे काय?

उतिसंवर्धन, अर्थात टिश्यू कल्चर म्हणजे वनस्पतींच्या पेशिका कृत्रिम माध्यमात वाढवणे होय. उच्च दर्जाच्या रोगमुक्त वनस्पतीच्या पेशी, उती,

इंद्रिये किंवा इतर अवयव वेगळे करून त्यांची प्रयोगशाळेत नैसर्गिक वातावरणामध्ये वाढ केली जाते. या तंत्रात वनस्पती किंवा प्राण्यांच्या जिवंत पेशी

ठराविक तापमान असलेल्या वृद्धी माध्यमात वाढविल्या जातात.

उतिसंवर्धनाची कार्यपद्धती :

मायक्रोप्रोपॅगेशनसाठी द्राक्षवेलींच्या नोडल सेगमेंटचा वापर एक्सप्लांटस म्हणून वापर केला जातो. त्यातून मिळवलेल्या मेरिस्टेमचा वापर विषाणूमुक्त वनस्पती तयार करण्यासाठी केला जातो. मर्क्युरिक क्लोराइड किंवा अल्कोहोल वापरून एक्सप्लांटस निर्जंतुक केले जातात. त्यानंतर वेगवेगळ्या हार्मोनल मात्रा असलेल्या माध्यमात ठेवून ठरावीक तापमानात वाढवले जातात. त्यानंतर या एक्सप्लांट्‍सपासून नवीन रोप निर्मिती होते. रोप तयार झाल्यानंतर पक्वतेपर्यंत काही काळ प्रयोगशाळेमध्ये वाढविले जाते. त्यानंतर रोपवाटिकेमध्ये अर्ध सावलीमध्ये त्याचे हार्डनिंग केले जाते. पूर्ण परिपक्व झालेली रोपे बागेमध्ये लागवडीसाठी पाठवली जातात.

उतिसंवर्धनाचे फायदे :

उच्च-गुणवत्तेचे द्राक्षारोपांचे उत्पादन : उतिसंवर्धनामुळे रोगमुक्त आणि आनुवांशिकदृष्ट्या एकसमान गुणधर्माच्या रोपांची मोठ्या प्रमाणात निर्मिती शक्य होते. रोपांच्या उपलब्धतेमुळे आवश्यकतेनुसार योग्य वेळी रोपे उपलब्ध होतात.

हवामानाचे परिणाम : उतिसंवर्धनाद्वारे तयार केलेल्या रोपांवर बाहेरील हवामानाचा फारसा परिणाम होत नाही.

पीक सुधारणा आणि आनुवंशिक वाढ : उतिसंवर्धनातून आनुवांशिकदृष्ट्या शुद्ध अशा रोपांची निर्मिती होते. त्यातून रोपांमध्ये अवर्षण प्रतिकार, रोग प्रतिकारशक्ती आणि उच्च उत्पादन क्षमता यासारख्या वैशिष्ट्ये असलेल्या नव्या जातीची रोपे उपलब्ध होतात. त्याचा फायदा शेतकऱ्यांची उत्पादकता वाढण्यासाठी होतो.

विशिष्ट पीक वाण : उतिसंवर्धनामुळे दुर्मीळ किंवा विशिष्ट पीक वाणांचे उत्पादन करणे शक्य होते. त्यांना बाजारात जास्त मूल्य मिळू शकते.

लुप्तप्राय प्रजातींचे संवर्धन : लुप्तप्राय प्रजातींच्या मर्यादित नमुन्यातून मोठ्या प्रमाणात वनस्पतींचे उत्पादन करता येते.

कमीत कमी कीटक आणि रोगांचे संक्रमण : उतिसंवर्धन तंत्राद्वारे तयार केलेली झाडे कीटक आणि रोगांपासून मुक्त असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक संरक्षणावरील खर्चात बचत होते. बागेचे आयुष्य वाढण्यास मदत होते.

क्षमता निर्माण आणि कौशल्य विकास : टिश्यू कल्चर तंत्रज्ञान हे प्रयोगशाळेमध्ये वापरले जाते. मात्र त्यापासून तयार केलेली रोपे शेतात लावल्यानंतर अन्य व्यवस्थापन सामान्य पिकांप्रमाणेच करायचे असते. त्यामुळे शेतकऱ्यांना फारशा तांत्रिक कौशल्याची आवश्यकता नसते. तरिही रोपांच्या सुरुवातीच्या काळात घ्यावयाच्या काळजी संदर्भात प्रशिक्षण आणि कार्यशाळा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com