Grape Production : द्राक्ष उत्पादनात प्रकाशाची भूमिका

Agriculture Technology : कॅनॉपी व्यवस्थापनाद्वारे फुटी व पानांची योग्य रचना केल्यास सूर्यप्रकाशाचा अधिक कार्यक्षमतेने वापर करणे शक्य आहे. प्रकाश संश्‍लेषणासाठी उपलब्ध असलेल्या प्रकाशाचे प्रमाण, गुणवत्तेप्रमाणेच वेलीची निरोगी पाने यावर द्राक्ष वेलींची वाढ अवलंबून असते
Grape Production
Grape ProductionAgrowon
Published on
Updated on

डॉ. निशांत देशमुख, सुदर्शन गाट, श्रद्धा टकले, डॉ. शर्मिष्ठा नाईक

सूर्यप्रकाशाची गुणवत्ता विशेषत: त्याची तीव्रता आणि वर्णपट (स्पेक्ट्रम) हे द्राक्षाच्या वाढीमध्ये आणि बेरीच्या गुणवत्तेत महत्त्वाची भूमिका बजावते. त्याचा द्राक्षांमधील साखर आणि आम्लतेच्या संतुलनावरही परिणाम होतो. अपरिपक्व द्राक्षांमध्ये आढळणाऱ्या प्रमुख मॅलिक ॲसिडचे उत्पादनास सूर्यप्रकाश उत्तेजित करतो. जसजशी द्राक्षे पिकत जातात आणि अधिक सूर्यप्रकाश मिळत जातो, तसतसे मॅलिक ॲसिडचे हळूहळू टार्टरिक आम्लामध्ये रूपांतर होते. त्यामुळे आम्लता वाढते.

द्राक्ष वेलींचा वाढीचा वेग हा आपल्या हवामानामध्ये ८००ते १२०० पीपीएफडी प्रकाशाच्या तीव्रतेमध्ये राहतो. प्रामुख्याने ‘थॉमसन सीडलेस’ या वाणामध्ये २५ पीपीएफडी प्रकाशाची तीव्रता प्रकाश भरपाई बिंदू म्हणून ओळखली जाते. (पीपीएफडी : पानावर पडणाऱ्या प्रकाश संश्‍लेषणयोग्य अशा फोटॉनची संख्या प्रति सेकंद प्रति वर्गमीटर कॅनॉपी.)

दाट कॅनॉपीमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश आत पोहोचत नाही. अशा सावलीतील पानांमधील प्रकाश संश्‍लेषणाचा दर हा २५ ते ५० टक्क्यांनी कमी असल्याचे अभ्यासात आढळले आहे. पानांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी वेलीचे कॅनॉपी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे.

Grape Production
Rabi Irrigation : रब्बी, उन्हाळी हंगामासाठी नियोजनाप्रमाणे आवर्तन सोडा

सूर्यप्रकाश आणि वातावरण परस्पर संबंध

प्रकाश, तापमान आणि आर्द्रता हे वातावरणातील घटक द्राक्षाच्या शरीरशास्त्रीय हालचालींवर प्रभाव टाकतात. मुख्य शरीरशास्त्रीय हालचालींपैकी तापमानातील फरकांमुळे थेट प्रभावित होणारी प्रकाश संश्‍लेषण ही पहिली प्रक्रिया आहे. जेव्हा तापमान अनुकूल मर्यादेपेक्षा जास्त वाढते किंवा कमी होते, तेव्हा द्राक्ष वाणांमध्ये खालील लक्षणे दिसतात.

प्रकाश संश्‍लेषण क्रियेसाठी २५ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान तापमान अनुकूल मानले जाते. जेव्हा तापमान १० अंशांपेक्षा खाली जाते, तेव्हा बहुतेक शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग मंदावतो. कमी तापमानामुळे सामान्यतः बेरीमधील सामू (pH) आणि प्रोलिनचे प्रमाण कमी होऊन आम्लतेचे प्रमाण वाढते. ४० अंशांपेक्षा जास्त तापमानात वेलीतील उष्णतेची अनुकूलता यंत्रणा सक्रिय होते. उच्च तापमान हे अँथोसायनीन संयुगांच्या निर्मितीस प्रतिबंध करते. अँथोसायनीनची रचनासुद्धा बदलू शकते. क्रिमसन सीडलेस जातीमध्ये अनेकदा समाधानकारक लाल रंग न येण्यामध्ये रात्रीच्या उच्च तापमानामुळे अँथोसायनीनचे संचय कमी होणे हे मुख्य कारण दिसते. तसेच साखर जमा होण्यास अडथळा निर्माण होतो. तापमानातील वाढीच्या स्थितीमध्ये परिस्थितीनुसार सिंचनाचे नियोजन करून वातावरणातील तापमानापेक्षा पानांचे तापमान ३ ते ४ अंशांनी कमी करता आल्यास अन्ननिर्मितीचा वेग वाढू शकतो.

बहुतांश जाती या प्रकाश आणि तापमानाला वेगवेगळा प्रतिसाद देतात. त्यांच्यातील आनुवंशिक घटक प्रकाशाची तरंग लांबी आणि तापमानातील बदलाप्रमाणे सक्रिय किंवा निष्क्रिय होतात. प्रकाश पानांद्वारे शोषून घेण्यासाठी वेलींच्या पानांत ७५ ते ८० टक्के आर्द्रता आवश्यक असते. अशी आर्द्रता असलेल्या पानांमध्ये रासायनिक प्रक्रिया चांगली होते.

द्राक्ष हे C३ प्रजातीतील वेल आहे. द्राक्षाच्या पानांवरील अभ्यासातून असे स्पष्टपणे दिसते, की ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात प्रकाश संश्‍लेषणाचा वेग लक्षणीय प्रमाणात कमी होतो. या कमी झालेल्या दरामुळे जैवरासायनिक प्रक्रिया विस्कळीत होतात. पानांतील हरितद्रव्यांचे प्रमाण कमी होऊन पाने पिवळी पडतात. ठरावीक तापमानाच्या वर वेलाची पाने त्यांची पर्णरंध्रे बंद करून बाष्पोत्सर्जन कमी किंवा बंद करतात, त्यामुळे पानांतील पाण्याची अपेक्षित पातळी (टर्गर) टिकून राहते.

तापमानाचा द्राक्ष मण्यावर होणारा परिणाम

मण्यामध्ये मुख्यतः पाणी, शर्करा, सेंद्रिय आम्ल, नायट्रोजन संयुगे, खनिजे, पेक्टिन्स, फिनोलिक संयुगे आणि सुगंधी संयुगे असे विविध घटक आढळतात. त्यावर कमी जास्त होणाऱ्या तापमानाचा परिणाम होतो.

मण्याचे चयापचय सभोवतालच्या तापमानावर अवलंबून असते. तापमानात वाढ झाल्यामुळे आम्लता कमी होते आणि साखरेचे प्रमाण वाढते. त्याचा साखर-आम्ल गुणोत्तरावर देखील परिणाम होतो.

Grape Production
Advance Crop Insurance : सोयाबीन उत्पादकांच्या बँक खात्यावर ८० कोटींची अग्रिम जमा

उच्च तापमानामुळे मॅलिक ॲसिडचे चयापचय देखील टार्टरिक आम्लापेक्षा वेगाने होते. मॅलेट संचयनासाठी अनुकूल तापमान २० ते २५ अंश सेल्सिअस असून, तापमान ४० अंशांवर गेल्यास त्यात घट दिसून येते.

जेव्हा दिवसाचे तापमान तुलनेने जास्त असते, तेव्हा मण्यामधील सामू (pH) कमी राखण्यासाठी रात्रीचे तापमान कमी असणे आवश्यक असते.

जेव्हा तापमान ३० अंशांपेक्षा जास्त असेल, तेव्हा अँथोसायनिन निर्मितीमध्ये घट दिसून येते.

महत्त्वाच्या बाबी

रसायनाच्या फवारणीदरम्यान स्टिकर्सचा वापर कमी करावा. म्हणजे पानांच्या पृष्ठभागावर त्यांचा लेप तयार होणार नाही. पानांवर सूर्यप्रकाश व्यवस्थितरीत्या विभागला जाऊन प्रकाशसंश्‍लेषण क्रिया सुरळीत पार पडेल.

पानावर पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश पडल्यामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी होईल. कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे पानांचे क्षेत्रफळ कमी होऊन प्रकाश संश्‍लेषण क्रियेत अडथळा येऊ शकतो.

प्रकाश संश्‍लेषण क्रिया सुरळीत पार पडण्यासाठी दोन फांद्यामध्ये योग्य अंतर ठेवावे. अतिरिक्त फांद्यांची छाटणी करावी. प्रत्येक फांदीवर फक्त १७ ते १८ पाने ठेवावीत. प्रत्येक भागात सारख्या तरंगलांबीचा सूर्यप्रकाश मिळेल. तसेच फवारणीचे कव्हरेज पूर्ण कॅनॉपीमध्ये होऊ शकेल.

सूर्यप्रकाशाच्या दिशेने असलेल्या कळीमध्ये फळधारणा योग्यप्रकारे होते. योग्य घड निर्मितीसाठी किमान ३० टक्के सूर्यप्रकाश कॅनॉपीमधून जाणे आवश्यक आहे. सावलीमध्ये घड निर्मिती योग्य प्रकारे होत नाही.

संजीवकांचा वापर योग्य प्रमाणात करावा. संजीवकांच्या जास्त वापरामुळे पाने कडक होतात आणि फाटतात, त्यामुळे पाने पूर्ण क्षमतेने अन्ननिर्मिती करू शकत नाहीत.

काडीवरील प्रत्येक डोळ्यावर एकसारख्या तीव्रतेचा सूर्यप्रकाश मिळाला तरच सूक्ष्मघड निर्मिती होते. दाट कॅनॉपी किंवा ढगाळ वातावरण यामुळे डोळ्यावर सूर्यप्रकाश न मिळाल्यास त्या डोळ्यातील प्रथिनांचे उत्पादन न झाल्याने सूक्ष्मघडाऐवजी त्याचे बाळीमध्ये रूपांतर होते.

मंडप पद्धतीमध्ये फांद्या आडव्या वाढत असल्यामुळे सूर्यप्रकाशाची ऊर्जा कमी कार्यक्षमतेने वापरली जाते. त्यात दाट कॅनॉपीमुळे सूर्यप्रकाश पानांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या थरांना व्यवस्थित मिळत नाही. खालच्या थरातील पाने पोषक घटकांसाठी अन्य पानांवर अवलंबून राहतात. सूर्यप्रकाशाच्या योग्य वापरासाठी ‘Y’ ट्रेलीस वळण पद्धतीचा अवलंब करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com