Summer Cucumber Cultivation : किनारी प्रदेशातील उन्हाळी काकडी लागवडीमधील समस्या अन् उपाययोजना

Cucumber Farming : काकडीचे उत्पादन वाढविण्यासाठी योग्य वाणाच्या निवडीसोबतच व्यवस्थापनामध्ये प्रकाशाची उपलब्धता, आर्द्रता, तापमान, कार्बन डायऑक्साइड प्रमाण, विद्राव्य खतांचे व्यवस्थापन इ. बाबीही महत्त्वाच्या ठरतात. पिकामधील सूक्ष्म वातावरणाची निर्मिती विशेषतः तापमान, आर्द्रता आणि पर्णछाया निर्देशांक या बाबीही तितक्याच महत्त्वाच्या असतात.
Cucumber
Cucumber Agrowon

तेजस लिंगावळे, डॉ. एच. टी. जाधव, दत्तात्रय पवार

कृषी -हवामान परिस्थिती

Problems and Solutions in Summer Cucumber Cultivation : पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी हरितगृहामधील नुसते तापमान नियंत्रित करून चालत नाही, तर अन्यही हवामानाशी संबंधित घटक नियंत्रित करणे आवश्यक असते. काकड्यांची उत्पादकता ही प्रकाशाची उपलब्धता (६००-१००० मायक्रो मोल /चौ.मी./सेकंद), तापमान फरक (१८ अंश ते २४ अंश सेल्सिअस), कर्बवायूचे प्रमाण (१००० ते १२०० पीपीएम), फर्टिगेशन, लागवडीची पद्धत आणि वापरलेल्या विशिष्ट जाती अशा अनेक घटकांवर अवलंबून असते.

सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचा सामू व विद्युत वाहकता यांवरही ती अवलंबून असते. पिकाने पाणी शोषल्यानंतर माध्यमांतून बाहेर पडणाऱ्या अतिरीक्त पाण्याची (म्हणजेच लिचेटची) विद्युत वाहकता ही पिकांना दिलेल्या खतांच्या विद्युतवाहकतेपेक्षा (EC) जास्त असावी.

हवामानाच्या परिस्थितीला पिके कसा प्रतिसाद देतात, या संदर्भात २००५ मध्ये मार्सेलिस व अन्य शास्त्रज्ञांनी काही प्रयोग केले होते. त्यातील निष्कर्षानुसार, वनस्पतींपर्यंत पोहोचणाऱ्या सौर उत्सर्जनात केवळ ०.८ ते १ टक्का घट झाल्यामुळे भाजीपाला उत्पादनात सुमारे १ टक्का घट होते.

शास्त्रज्ञ ल्युओ आणि अन्य यांनी जैव उत्पादन आणि ऊर्जा संवर्धन या दोन्ही गोष्टींचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी हिवाळ्यातील काकडी लागवडीतील दिवस आणि रात्रीचे हवेचे तापमान अनुक्रमे १९ अंश सेल्सिअस व १५ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक असेल पाहिजे. तसेच पर्णछाया निर्देशांक (LAI) २.० ते ३.० या दरम्यान असणे सर्वोत्तम ठरते.

सिंचन आणि पोषक तत्त्वांचे व्यवस्थापन

रोपांच्या यशस्वी वाढीसाठी कोकोपीटमधील सिंचन व पोषक तत्त्वांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. कोकोपीट माध्यम हे पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि पोषक द्रव्ये टिकवून ठेवण्याच्या क्षमतेसाठी लोकप्रिय आहे.

सिंचनाचे वेळापत्रक योग्य प्रकारे पाळल्यास कोकोपीटमधील ओलावा निरीक्षण, सामू (pH) नियंत्रण, विद्युत वाहकता (EC) मापन, लिचेटचे व्यवस्थापन, पोषक द्रव्यांचे व्यवस्थापन होण्यास मदत होते. नियमित देखरेखीमुळे पिकाला पोषक तत्त्वांची कमतरता भासत नाही. त्याच प्रमाणे खतांचा अतिवापर, आणि सिंचन व पोषक तत्त्वांशी संबंधित समस्या टाळता येतात.

पिकांच्या लागवडीसाठी कोकोपीटप्रमाणेच पर्लाइट, रॉकवूल, पीट आणि अन्य काही मातीविरहित माध्यमांचा वापर केला जातो. मातीमध्ये मुळातच पिकांच्या वाढीसाठी पोषक अशी काही अन्नद्रव्ये आणि खनिजे असतात. तशी ती अन्य मातीविरहित माध्यमांमध्ये नसतात. हे लक्षात घेऊन पिकांच्या शिफारशीप्रमाणे खतांचे योग्य प्रकारे नियोजन करणे आवश्यक असते. अन्यथा, पिकांमध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरता भासून पिकांवर ताण येऊ शकतो. त्याचा फटका पिकाच्या उत्पादनाला बसू शकतो.

Cucumber
Healthy Cucumber : काकडीचे आरोग्यदायी फायदे

सिंचनासाठी पोषक द्रावणासाठी इष्टतम सामू पातळी ५.५ ते ६.५ ही आहे. आपल्या पाण्याचा सामू लक्षात घेऊन त्यात आम्ल मिसळून ती नियंत्रित करता येते. सामूमध्ये बदल करत असताना नायट्रेट /अमोनियम गुणोत्तराचे सूक्ष्म समायोजन समाविष्ट असते. पोषक द्रावणाच्या विद्युत वाहकतेची पातळी २.२ डेसिसायमन प्रति मीटरपेक्षा कमी ठेवावी.

ती मुळांच्या कक्षेमध्ये ३.० डेसिसायममन प्रति मीटर इतकी असली पाहिजे. पोषक द्रावण आणि निचरा पाणी यांच्यातील विद्युत वाहकतेचा फरक १.५ ते २.० dS/m पेक्षा जास्त नसावा. निचरा झालेल्या पाण्यातील नायट्रेटची पातळी वाढीच्या टप्प्यानुसार बदलती असली तरी ती २०० ते ३०० पीपीएम दरम्यान असावी.

नायट्रेट/अमोनियमचे प्रमाण ५:१ पेक्षा कमी नसावे. मुळांचे कार्य बिघडू नये म्हणून नायट्रेटची उपस्थिती शून्यतेच्या पातळीवर सुनिश्‍चित करावी. अमोनिया किंवा अमोनियमची वाढलेली पातळी ही मुळांद्वारे पोटॅशिअम शोषणामध्ये अडथळा आणते. काकडीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी अशा प्रकारे सिंचन आणि पोषक तत्त्वांचे व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे.

कीड व रोगनियंत्रण

पिकाचे उत्पादन कमी होण्यामध्ये सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे कीड रोगांचा प्रादुर्भाव होय. कोकणासारख्या अधिक आर्द्रता असलेल्या प्रदेशामध्ये हे आव्हान अधिकच खडतर होते. कारण हरितगृहातील वातावरण समतोलामध्ये व्यत्यय आल्यास बुरशीजन्य व अन्य रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार अधिक वेगाने होतो.

काकडी पिकामध्ये मुळांच्या कक्षेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे फ्युजॅरियम विल्ट (मर रोग) प्रारंभिक अवस्थेत दिसून येतो. नंतरच्या टप्प्यात पावडरी मिल्ड्यू या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. याबरोबरच, प्रचलित असलेला केवडा रोग (डाउनी मिल्ड्यू) हा काकडी पिकातील सर्वांत घातक रोग आहे.

त्यामध्ये सुरुवातीच्या लक्षणांमध्ये सामान्यत: वरच्या पानांच्या पृष्ठभागावर कोनीय, पिवळे ठिपके दिसतात. त्याचप्रमाणे पानांचे नेक्रोसिस आणि कपाच्या आकाराची पाने आढळतात. फळमाशीसुद्धा काकडीसारख्या पिकांना घातक ठरते. तिच्यापासून नुकसान टाळण्यासाठी संरक्षक सापळे बसवणे गरजेचे ठरते.

Cucumber
Summer Cucumber : किनारी प्रदेशातील उन्हाळी काकडी लागवडीमधील समस्या अन् उपाययोजना

अन्य काही आव्हाने

हरितगृहातील काकडी लागवडीमध्ये सामान्यतः आढळणाऱ्या प्रमुख आव्हानांचा आपण विचार केला असला तरी अन्य काही छोटी आव्हानेही येतात. उदा. प्रत्येक फर्टिगेशन दरम्यान टाकीच्या तळाशी खतांचे अंश तसेच शिल्लक राहतात. ते रोखण्यासाठी ढवळणीच्या साह्याने टाकीतील खतद्रावण सातत्याने ढवळणे आवश्यक ठरते. हरितगृहामध्ये रोपांची अनावश्यक वाढ होऊन उत्पादनक्षम अवयवांची संख्या कमी राहणे.

त्यासाठी योग्य प्रकारे छाटणी तंत्राची अंमलबजावणी करणे. मातीजन्य रोगांचा धोका कमी करण्यासाठी माध्यमांची (ग्रोबॅग -प्लॅस्टिक पिशवी) आणि माती यांचा थेट संपर्क रोखण्यासाठी ती योग्य उंचीवर असली पाहिजे. हरितगृहामध्ये होणारा अनावश्यक मानवी हस्तक्षेप कमीत कमी असावा.

त्याच प्रमाणे आत येणारी हवाही रोगकारकांच्या प्रवेशास कारणीभूत ठरू शकते. संपूर्ण लागवड क्षेत्राचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करून घेतल्यास भविष्यातील रोगांचे प्रादुर्भाव कमीत कमी पातळीवर राखणे शक्य होते. पॉलिहाउसमध्ये किडींचा प्रवेश रोखण्यासाठी ४० मेश अतिनील स्थिर (UV) कीटकरोधक जाळी वापरणे गरजेचे असते. पॉलिहाउसच्या प्रवेशद्वारावर दुहेरी दरवाजे आणि स्वच्छतेची सुविधा केलेली असावी.

पाण्याची टाकी व लॅटरल्सच्या वाढलेल्या तापमानाचे नियंत्रण

उन्हाळी हंगामात पाण्याची टाकी, पाइप्स आणि ठिबकच्या लॅटरल्स उन्हामुळे गरम होतात. त्यातून फार गरम पाणी पिकांस दिले गेल्यास त्याचा मुळांवर विपरीत परिणाम होऊ शकतात. उन्हाळी हंगामात मूळ जलस्रोतांतील पाण्याचे तापमान वाढणे ही प्राथमिक समस्या भेडसावते.

त्यासाठी मुख्य पाणी स्रोत हा शक्यतो सावलीच्या ठिकाणी असावा. किंवा पाण्याच्या टाकीवर आच्छादन करून सावली करून घ्यावी. अशा प्रकारे तिथे थेट सावली करणे शक्य नसेल तर प्राथमिक स्रोतापासून दुय्यम स्रोतामध्ये पाणी नेऊन सावलीमध्ये साठवणे फायद्याचे ठरते.

पॉलिहाउसमधील वाढत्या तापमानाचे नियंत्रण

पॉलिहाउसमधील वाढत्या तापमानाचे नियंत्रण करण्यासाठी आणि योग्य ती सापेक्ष आर्द्रता (RH) पातळी राखण्यासाठी वारंवार फॉगिंग करणे आवश्यक आहे. मात्र वाढलेल्या आर्द्रतेमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.

असा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असते. काकडी पिकात उन्हाळी हंगामात साधारणतः २६ अंश ते २९ अंश सेल्सिअस तापमान व ६० टक्के ते ७० टक्के इतकी सापेक्ष आर्द्रता राखणे आवश्यक असते. जास्त तापमानामुळे काकडीच्या वरच्या बाजूच्या कळ्या जळतात. त्याअगोदर परिपक्व फळे जळतात आणि वरच्या पानांचे देखील नुकसान होते.

त्यामुळे, काकडीच्या वेलांची वाढ पॉलिहाउसच्या गटरच्या उंचीच्या ५० टक्के ते ७० टक्क्यांच्या वर जाऊ न देणे हे उपयोगी ठरते. कारण उन्हाळ्यात पॉलिहाउसच्या वरील भागातील तापमान खूप जास्त राहते. सापेक्ष आर्द्रतेचे जास्त प्रमाण हेही वायुविजनामध्ये अडथळे निर्माण करते. उन्हाळी हंगामात पॉलिहाउसमधील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जागरूक राहण्याची आवश्यकता असते.

तेजस लिंगावळे, ९१७५९३३९७८,

दत्तात्रय पवार, ९९८६४७६६६९,

(अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प - कृषि संरचना व पर्यावरण व्यवस्थापनासाठी प्लॅस्टिक अभियांत्रिकी, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com