Summer Cucumber : किनारी प्रदेशातील उन्हाळी काकडी लागवडीमधील समस्या अन् उपाययोजना

Agriculture Crop Scientific Measure : कोकणासारख्या उष्ण व दमट किनारी प्रदेशात पिकाच्या लागवडीची आव्हाने समजून घेऊन, त्यातून मार्ग काढण्यासाठी शास्त्रीय उपाययोजना जाणून घेऊ.
Scientific Measure
Scientific MeasureAgrowon
Published on
Updated on

तेजस लिंगावळे, डॉ. एच. टी. जाधव, दत्तात्रय पवार

Problems and Solutions in Summer Cucumber Cultivation : काकडी हे वेलवर्गीय पीक असून, त्यातील पाण्याच्या अधिक (सुमारे ९६ टक्के) प्रमाण, कमी कॅलरी यामुळे कोशिंबीर, सॅलडमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते. उन्हाळ्यामध्ये तिची मागणी व दरही वाढतो. मात्र कोकणासारख्या किनारपट्टीच्या प्रदेशात उन्हाळी हंगामात काकडीची लागवड करण्यात येणाऱ्या अडचणींमुळे शेतकरी लागवड करण्यास धजावत नाहीत.

शेतकऱ्यांना जाणवणारे अडथळे व आव्हाने यांच्यावर मात करताना आधुनिक तंत्रज्ञानाची मदत होऊ शकेल. त्यासाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (कृषी संरचना आणि पर्यावरण व्यवस्थापनासाठी प्लॅस्टिक अभियांत्रिकी - AICRP-PEASEM) राबवला जात आहे. त्या अंतर्गत एक गॅल्वनाइज्ड आयर्न (जीआय)पासून बनवलेले ६४४ चौ.मी. व दुसरे बांबूपासून बनविलेले ७४० चौ.मी. क्षेत्राचे अशी दोन पॉलिहाउसेस उभारण्यात आली आहेत.

त्यातील जास्त उंचीच्या बांबू पॉलिहाउसमध्ये बिगरहंगामी (उन्हाळी) काकडी उत्पादन घेण्याचे प्रयोग करण्यात आले. खरेतर त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच सुरू असलेल्या प्रकल्पामध्ये आम्हालाही योग्य धोरणात्मक नियोजन आणि अंमलबजावणी असतानाही काकडी लागवडीदरम्यान अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. परिणामी, उत्पादनात घट झाली. या घटलेल्या उत्पादनासाठी कारणीभूत घटक आणि आव्हाने यांचा विचार करण्यात आला.

काकडी लागवडीतील आव्हाने व उपाय

शेततळ्याच्या पाण्यात शेवाळाची वाढ होणे

या प्रकल्पामधील संशोधन क्षेत्रावर सिंचनाचे पाणी साठविण्यासाठी बांधण्यात आलेल्या पाण्याच्या लहान तलावामध्ये वारंवार शेवाळांची लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून आले. (चित्र क्र. १). शेवाळ वाढीमुळे पाण्याचा सामू (pH) व विद्युत वाहकता वाढू शकते.

यातील एकपेशीय वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साइड वापरतात. त्यांच्या चयापचय प्रक्रियेदरम्यान पाण्यात संयुगे सोडली जाऊन विद्युत वाहकता वाढू शकते. त्याचा विचार विद्राव्य खते देताना केला पाहिजे. अन्यथा, खतांची कार्यक्षमता घटल्यामुळे पीक उत्पादन घटते. पोषक द्रव्ये पिकापर्यंत पोहोचण्यासाठी शेवाळाचे नियंत्रण महत्त्वाचे आहे.

सिंचनाच्या पाण्यात शेवाळ वाढ नियंत्रित करण्यासाठी तांबे आधारित शैवालनाशके उदा. कॉपर सल्फेट, क्वाटरनरी अमोनियम संयुगे (क्वाट्‍स), हायड्रोजन पेरॉक्साइड, पोटॅशिअम परमॅग्नेट इ. प्रमुख रसायने बाजारात उपलब्ध आहेत. त्याचा योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यक ठरते.

Scientific Measure
Zero Tillage Technique : शून्य मशागत तंत्राने फळबाग यशस्वी केलेले शिक्षक

मातीविराहित माध्यमाची हाताळणी :

पॉलिहाउसमध्ये मातीविरहित माध्यमामध्ये पिकांची लागवड केली जाते. त्यापूर्वी संबंधित माध्यमाची हाताळणी (कंडिशनिंग) ही पिकाची वाढ व उत्पादन या दोन्हींवर प्रभाव पाडणारा महत्त्वाचा घटक आहे. आम्ही नारळापासून बनविलेल्या कोकोपीटमध्ये काकडी लागवड केली होती. यात मागील पिकांसाठी वापरलेल्या कोकोपीटचा पुनर्वापर करण्यापूर्वी त्याचे बफरिंग करणे गरजेचे असते.

त्यामुळे पिकांसाठी पोषक मूल्ये (विशेषत: कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम) यांची उपलब्धता वाढते. त्याच प्रमाणे ठरावीक पोषक द्रव्ये पिकाच्या सुरुवातीलाच कमी प्रमाणात माध्यमांत पुरवले पाहिजेत. त्यामुळे पिकांची सुरुवातीची वाढ ताणरहित स्थितीमध्ये होते.

बफरिंगसाठी पूर्णपणे विरघळणारे कॅल्शिअम नायट्रेट वापरण्याची शिफारस केली जाते. फील्ड ग्रेड कॅल्शिअम नायट्रेट वापरणार असल्यास मिश्रणातील कण व्यवस्थित विरघळण्यासाठी ढवळणी वापरावी. माध्यमामधील क्षारांचे संतुलन करण्यासाठी सामू व विद्युत वाहकता यांची पातळीही योग्य राहील, याचे नियोजन करावे लागते.

माध्यमांचे निर्जंतुकीकरण

माध्यमांतील हानिकारक ठरणारे सूक्ष्मजीव नष्ट करण्यासाठी विशिष्ट पद्धतीद्वारे तापमान वाढविण्याची निर्जंतुकीकरण प्रक्रिया वापरली जाते. या प्रक्रियेमध्ये पिकांसाठी उपयुक्त जिवाणू नष्ट होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागते. सामान्यतः ७० ते ८० अंश सेल्सिअस तापमान विशिष्ट सूक्ष्मजीव उदा. बुरशी, जिवाणू, कीटक, सूत्रकृमी आणि तणांचे बियाणे इ.

नष्ट करण्यासाठी प्रभावी ठरते. वाफेच्या साह्याने निर्जंतुकीकरणाची दुसरी पद्धतीही वापरली जाते. गरम (सामान्यत: ८० ते १०० अंश सेल्सिअस तापमान) वाफेमध्ये कोकोपीट उघडे ठेवले जाते. त्यासाठी उपकरणाच्या प्रकारानुसार १५ मिनिटे ते एक तास इतका वेळ लागू शकते. प्रक्रिया झाल्यानंतर कोकोपीट पूर्ण कोरडे झाल्यावर त्याचा वापर केला जातो.

तिसरी एक रासायनिक पद्धत असून, त्यात माध्यमाचा पृष्ठभाग किंवा संपूर्ण माध्यमांमध्ये रसायनाचा वापर केला जातो. उदा. सामान्यत: इथिलिन ऑक्साइड (ईटीओ), हायड्रोजन पेरॉक्साइड, पेरासिटिक, फॉर्मल्डिहाइड, ग्लुटाराल्डिहाइड, सोडिअम हायपोक्लोराइट (ब्लीच), ओझोन इ. यापैकी एका घटकांचा वापर केला जातो. त्यामुळे जिवाणू, विषाणू आणि बुरशींचे बीजाणू नष्ट होण्यास मदत होते. सद्यःस्थितीमध्ये रसायनांचा वापर टाळणारी वाफेद्वारे निर्जंतुकीकरण ही पद्धत प्रभावी आणि पर्यावरणपूरक ठरू शकते.

Scientific Measure
Contract Farming : स्वतःच्या शेतीला करारशेतीची जोड!

पिकांची वाणाची निवड

हरितगृहामध्ये लागवड करताना त्यासाठी योग्य अशा वाणाची निवड करणे गरजेचे असते. काकडीच्या बहूसंख्य जाती या मध्यम तापमान हवामानासाठी अनुकूल आहेत. हवामान तुलनात्मक उष्ण झाल्यास त्यांचे उत्पादन घटते.

हे लक्षात घेऊन आपल्या प्रदेशातील तापमान व हवामानाचा विचार करून पिकांचा वाण निवडणे अत्यंत गरजेचे आहे. संरक्षित लागवडीमध्ये पार्थेनोकार्पिक (म्हणजेच परागीकरण न करता फळे देणाऱ्या) वाणांचा पर्याय निवडणे फायदेशीर ठरू शकते. अशा वाणांमध्ये बीजांड फलनासाठी परागीकरणाची आवश्यकता नसते.

बाह्य लागवडीमध्ये परागीकरणासाठी मधमाश्या फायदेशीर ठरत असल्या तर अलीकडे परिसरात शेतामध्ये रासायनिक कीडनाशकांचा वापर वाढल्यामुळे त्यांची संख्या वेगाने कमी होत आहे. असे पार्थेनोकार्पिक वाण उपलब्ध न झाल्यास परागीकरणासाठी मधमाश्यांच्या छोट्या पेट्या हरितगृहामध्ये बसवाव्यात.

कीड व रोग नियंत्रण

पिकाचे उत्पादन कमी होण्यामध्ये सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे कीड रोगांचा प्रादुर्भाव होय. कोकणासारख्या अधिक आर्द्रता असलेल्या प्रदेशामध्ये हे आव्हान अधिकच खडतर होते. कारण हरितगृहातील वातावरण समतोलामध्ये व्यत्यय आल्यास बुरशीजन्यव अन्य रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार अधिक वेगाने होतो.

काकडी पिकामध्ये मुळांच्या कक्षेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे फ्युजॅरियम विल्ट (मर रोग) प्रारंभिक अवस्थेत दिसून येतो. नंतरच्या टप्प्यात पावडरी मिल्ड्यू या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. याबरोबरच, प्रचलित असलेला केवडा रोग (डाउनी मिल्ड्यू) हा काकडी पिकातील सर्वात घातक रोग आहे.

त्यामध्ये सुरुवातीच्या लक्षणांमध्ये सामान्यत: वरच्या पानांच्या पृष्ठभागावर कोनीय, पिवळे ठिपके दिसतात. त्याचप्रमाणे पानांचे नेक्रोसिस आणि कपाच्या आकाराची पाने आढळतात. फळमाशीसुद्धा काकडीसारख्या पिकांना घातक ठरते. तिच्यापासून नुकसान टाळण्यासाठी संरक्षक सापळे बसवणे गरजेचे ठरते.

पुढील भागामध्ये (गुरुवार, ता.२८) पॉलिहाउसमधील वाढत्या तापमानाचे नियंत्रण, सिंचन व्यवस्थापन, कृषी हवामान परिस्थिती यांची माहिती घेऊ.

तेजस लिंगावळे, ९१७५९३३९७८

दत्तात्रय पवार, ९९८६४७६६६९

(अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प - कृषि संरचना व पर्यावरण व्यवस्थापनासाठी प्लॅस्टिक अभियांत्रिकी, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com