Fish Conservation : तिलापिया माशांच्या संवर्धनात घ्यावयाची काळजी

Fisheries : आपण तिलापिया माशांच्या संवर्धनयोग्य प्रजातींची ओळख पहिल्या भागामध्ये करून घेतली. तिलापिया माशांचे प्रत्यक्ष संवर्धन आणि मत्स्यपालन करताना जैवसुरक्षेच्या दृष्टीने विशिष्ट काळजी घ्यावी लागते. त्यासह संवर्धनातील विविध बाबी समजून घेऊ.
Fish Conservation
Fish ConservationAgrowon

डॉ. भूषण सानप, अमिता जैन

Tilapia Fish : सर्वांत प्रथम तिलापिया मत्स्यशेती करण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाची पूर्व परवानगी घ्यावी लागते. हे लक्षात ठेवा. त्यासाठी इच्छुक शेतकऱ्याने मत्स्य व्यवसाय विभागाकडे अर्ज करावा. या विभागामार्फत केवळ एकलिंगीय नर नाईल तिलापिया, संप्रेरकाद्वारे लिंग बदल तंत्र किंवा निवड प्रजनन तंत्रज्ञानाद्वारे तयार होणाऱ्या तिलापिया प्रजातींच्या मत्स्यशेतीसाठी परवानगी दिली जाते. त्यासाठी असलेल्या विविध अटींची पूर्तता शेतकऱ्यांने गरजेचे असते.

अ) तलावातील तिलापिया संवर्धन

जागेची निवड

जागेची निवड करताना प्रकल्पाची जागा ही पूरप्रवण भागात, घोषित अभयारण्य, बायो-रिझर्व्ह किंवा नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाशेजारी म्हणजेच ओढा किंवा नदी शेजारी नसावी. या माशांचा मोकळ्या नैसर्गिक पाणवठ्याकडे प्रसार होऊ नये, यासाठी या अटींची पूर्तता करणे अत्यावश्यक असते.

तलावाची बांधणी

तलाव शक्यतो आयताकृती असावा. पूर्व-पश्‍चिम असेल तर खोली कमीत कमी दोन मीटर असावी. ज्या बाजूला पाणी बाहेर काढणार आहात, तिकडे जमिनीस हलकासा उतार असावा. पाणी बाहेर सोडण्याच्या ठिकाणी बारीक मेशच्या जाळ्या असाव्यात. बाहेरच्या बाजूला बायोफिल्टर टँक व सेटलिंग टँक तयार केलेला असावा. या टाकीमुळे वापरलेले पाणी पुन्हा तळ्यात वापरता येऊ शकते. काही काळानंतर हे खतयुक्त पाणी पिकांना देण्याचीही तरतूद करून ठेवावी. शेतीचे क्षेत्रफळ १ एकरपेक्षा कमी आणि १० एकरांपेक्षा जास्त नसावे.

साठविल्या जाणाऱ्या बीजांचा आकार

तलावामध्ये १० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे व ३० दिवसांहून अधिक वय असलेले लिंग बदल तिलापिया नर्सरीमध्ये साठवलेले असतात.

त्याची साठवण घनता : कमाल ५ नग/ चौ.मी.

Fish Conservation
Dried Fish Rate : तुटवड्यामुळे सुकी मासळी महागली

जैव-सुरक्षा

अ) जे तलाव किंवा शेततळे हे नैसर्गिक जलस्रोतांपासून दूर आहेत, अशाच प्रकल्प स्थळांची निवड केली पाहिजे. कारण हे मासे जर परिसरातील नैसर्गिक जलस्रोतांमध्ये शिरले तरी तेथील स्थानिक माशांची संख्या वेगाने कमी करत त्यांना नष्ट करून टाकतात. त्यामुळे शेत व तळ्याची जैवसुरक्षेचे नियम व मानकांचे पालन करण्याची क्षमता असलेल्या मत्स्यपालकांनीच तिलापिया पालनाकडे वळावे.

ब) जैवसुरक्षेसाठी आवश्यक त्या सुविधा, अडथळे करणारी संरचना शेतावर असली पाहिजे.

क) या तलावामधून किंवा शेतीमधून नाले, कालवे किंवा नद्यांमध्ये पाणी सोडू नये. जर तिकडे पाणी जाण्याची शक्यता असेल, तर ते सोडण्यापूर्वी माशांची अंडी बाहेर जात नाहीत, यासाठी सातत्याने पाणी तपासणी व पाण्यावरील प्रक्रिया कराव्या लागतात.

आ) जलाशयातील पिंजरा संवर्धन

तिलापियाचे पिंजरा संवर्धन हे जलाशयांना तिलापिया संवर्धनासाठी परवानगी मिळालेली आहे व तिथे ते स्थापित आहेत अशा तलावापुरतेच मर्यादित असावे, अशी अट आहे. त्यामुळे जलाशयांमधील तिलापियांची उपस्थिती व संख्या तपासून मूल्यांकनाची प्रक्रिया ही संबंधित राज्य मत्स्य व्यवसाय विभागांकडून करून घेणे आवश्यक असते.

जलाशयातील पिंजऱ्याचे क्षेत्रफळ प्रभावी पाणी क्षेत्राच्या (EWA) १ टक्क्यापेक्षा जास्त नसावे. पिंजऱ्यातील साठवणीचा आकार ५० ग्रॅम वजनापेक्षा जास्त असावा. त्यानुसार पिंजऱ्याच्या जाळ्याला योग्य जाळीचा आकार असावा. प्रथिनांचे प्रमाण २५ टक्के असलेले तरंगते कृत्रिम खाद्य वापरास प्रोत्साहन दिले जाते.

Fish Conservation
Tilapiya Fish Farming : तिलापिया माशांचे संवर्धन फायद्याचे

तिलापिया पुनरुत्पादन नियंत्रित करण्याच्या सात पद्धती

अन्नासाठी स्पर्धा कमी करण्यासाठी तिलापिया बीज आणि बोटुकली आकाराच्या माशांची जाळीने वेळोवेळी काढणी करणे.

लहान तलावांमध्ये प्रभावी.

प्रारंभिक वाढीच्या कालावधीनंतर लिंगनिहाय मासे वेगळे करणे (एकलिंगीय संवर्धन).

मादीच्या तुलनेत नर वेगाने वाढतात. नर वेगळे काढून त्यांचे संवर्धन करणे. ही बाब मोठ्या तलावांसाठी कठीण ठरते. कारण त्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणेची आवश्यकता असते आणि प्रक्रिया वेळखाऊ आहे. प्रशिक्षित कामगार आवश्यक आहेत.

सर्व नर बोटुकली आकाराचे असल्यास लिंग बदलाची शक्यता टाळता येते.

तलावाच्या तळाच्या वर तरंगत्या पिंजऱ्यांमध्ये संवर्धन.

उबवलेली अंडी पिंजऱ्यातून पडतात आणि पालक सुरक्षा न मिळाल्याने मरतात.

तलाव किंवा रेसवेमध्ये अतिशय उच्च घनतेवर संवर्धन.

गर्दीमुळे पुनरुत्पादनाचा वेग कमी राहतो.

तलावात बोटूकली किंवा प्रौढ आकाराची काही मासे ठेवणे.

ते काही पिले खाऊन अतिरिक्त पुनरुत्पादन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

सुरुवातीला प्रौढ तिलापिया सोडणे आवश्यक, अन्यथा त्यांचाच फडशा पडू शकतो.

‘सर्व-नर’ बोटुकली तयार करण्यासाठी तिलापिया फ्राय नर हार्मोन्ससह खायला देणे.

मत्स्यबीज व बोटुकली उपलब्धता

मरीन प्रॉडक्ट्स एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटीची (MPEDA) संशोधन आणि विकास शाखा, राजीव गांधी सेंटर फॉर अॅक्वाकल्चर (RGCA), विजयवाडा येथे मोनो-सेक्स तिलापियाचे दोन प्रकारांमध्ये उत्पादन घेतले जाते. या प्रकल्पामध्ये भारतातील तिलापियाच्या गिफ्ट प्रजातीसाठी सॅटेलाइट न्यूक्लियसची स्थापना,

आनुवंशिक सुधारणा कार्यक्रमाची रचना आणि प्रसार धोरणांचा विकास आणि निवडक प्रजनन आणि स्थानिक क्षमता वाढविण्यासंदर्भात काम केले जाते. आनुवंशिकदृष्ट्या शुद्ध व उच्च उत्पादनक्षम तिलापिया जातीचा विकास करणे आणि योग्य त्या निकष व मानकांचे पालन करणाऱ्यांमार्फत संवर्धन यातून आर्थिक फायद्यामध्ये भरपूर वाढ होऊ शकते.

सघन तिलापिया संवर्धन

पुनर्परिवर्तनीय शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसाय विभागाकडे नोंदणी केलेली असावी. ज्याची साठवण घनता १५० नग प्रति घनमीटरपेक्षा जास्त नसलेल्या आणि तरंगते कृत्रिम खाद्याची तरतूद करणाऱ्या शेतकऱ्यांना परवानगी मिळते. अर्थात, त्यासाठीही सर्व जैवसुरक्षा उपाय व मानकांचे पालन करणे बंधनकारक असते.

तिलापिया संवर्धनाचे प्रकार व उत्पन्न तपशील

संवर्धन पद्धती संचयन घनता उत्पादन

मत्स्यतळी संवर्धन (Pond Culture) ३० ते ५० हजार बोटुकली/ हेक्टर १० ते १५ टन

ॲक्वापोनिक्स (Aquaponics) ५० ते १०० बोटुकली/ घन मी. १५ ते ३० किलो/ घन मीटर

पिंजरा संवर्धन (Cage Culture) ७५ ते १५० बोटूकली/ घन मी. २५ ते ५० किलो/ घन मीटर

पाणी पुनर्वापर मत्स्य संवर्धन प्रणाली (Recirculatory Aquaculture System (RAS) ५० ते १५० बोटुकली/ घन मी. २५ ते ७० किलो/ घन मीटर

जैवपुंजाद्वारे तिलापिया संवर्धन (Biofloc Technology -BFT) ५० ते १५० बोटुकली/ घन मी. २५ ते ७० किलो/ घन मीटर

प्रवाहप्रणाली संवर्धन (Raceway Aquaculture) ३०० ते ५०० बोटुकली/ घन मी. ९० ते १५० किलो/ घन मीटर

डॉ. भूषण सानप,

९५०३७४६४९७/८३२९९७१५२७

(सहा. मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, प्रादेशिक कार्यालय, अमरावती)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com