World Bee Day : मधमाशी संवर्धन काळाची गरज

Beekeeping : दरवर्षी ‘२० मे’ हा ‘जागतिक मधमाशी दिवस’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने मधमाशी पालनाविषयी जागरूकता आणि मधमाशीपासून मिळणाऱ्या उत्पादनांचे महत्त्व लोकांमध्ये पटवून दिले जाते.
Beekeeping
BeekeepingAgrowon

सुनील पोकरे

Beekeeping Conservation : जगभरातील नागरिकांची अन्नाची गरज भागविण्यासाठी अप्रत्यक्षपणे मधमाशा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. मधमाशीपालनातून मधाचे उत्पादन तर मिळतेच पण त्यासोबत विविध पिकांच्या परागसिंचनामध्ये मधमाश्या महत्त्वाच्या ठरतात. मात्र, वाढते शहरीकरण, हानिकारक रासायनिक कीडनाशकांचा अमर्यादित वापर, प्रदूषण आदी कारणांमुळे मधमाश्यांच्या वसाहती आणि संख्या दिवसेंदिवस वेगाने कमी होत चालली आहे.

याचा एकूण परिणाम परागीभवन प्रक्रियेवर होऊन पीक उत्पादनात घट होताना दिसून येते. त्यामुळे भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येची अन्नाची गरज लक्षात घेऊन पीक उत्पादकता वाढीसाठी मधमाश्यांचे संवर्धन ही काळाची गरज बनली आहे.

Beekeeping
Beekeeping : मधमाशी संवर्धनासाठी जैविक कीडनाशके वापरा

आजच्या दिवसाचे महत्त्व

आधुनिक मधमाशीपालनाचे जनक म्हणून ‘एन्टोन जान्सा’ यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म २० मे १७३४ मध्ये एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब पारंपरिक पद्धतीने मधमाशीपालन व्यवसाय करत होते. त्यामुळे घरी मधमाशीपालनाविषयी कायम चर्चा होत असे. त्यातून एन्टोन जान्सा यांची मधमाशीपालनाबाबतची आवड अधिकच वाढली. त्यानंतर १७६९ मध्ये त्यांनी मधमाशीपालक म्हणून पूर्णवेळ काम करण्यास सुरुवात केली.

त्यांनी विविध ठिकाणी फिरून लोकांमध्ये मधमाश्यांचे महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली. एन्टोन जान्सा यांच्या कार्याची आठवण म्हणून दरवर्षी ‘जागतिक मधमाशी दिवस’ साजरा केला जातो. मानवी जीवनातील मधमाश्यांचे महत्त्व सर्वांपर्यंत पोचवून मधमाश्यांचे संवर्धन व्हावे व मधमाशीप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी हा यामागील मुख्य उद्देश आहे.

Beekeeping
Government Scheme On Beekeeping : बंपर सबसिडी! मधमाशी पालनासाठी 'हे' सरकार देतयं ९० % पर्यंत सबसिडी

जर पृथ्वीवरील मधमाश्यांचा नाश झाला तर काही वर्षांतच पृथ्वीवरील मानवाचा अंत होईल, अशी प्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रा. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी नोंद करून ठेवली आहे. कारण, पीक उत्पादनामध्ये मधमाश्या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. मधमाशा एका फुलातून परागकण गोळा करून दुसऱ्या फुलांमध्ये टाकतात. त्यातून दर्जेदार फळे, फुले आणि पिकांचे उत्पादन घेता येते. मधमाशीकडून होणाऱ्या परपरागीभवनामुळे पीक उत्पादनात सरासरी ३० ते ४० टक्के वाढ होते.

आज वाढते शहरीकरण, जंगल तोड, रासायनिक कीडनाशकांची अमर्यादित वापर, वाढते प्रदूषण इत्यादी कारणांमुळे मधमाशी सारख्या इतरही उपयुक्त कीटकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यासाठी व्यापक स्वरूपात मधमाशी संवर्धनाचे महत्त्व लोकांमध्ये निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे.

याच निमित्ताने मधमाश्यांचे महत्त्व जगभरातील लोकांमध्ये पटवून देण्यासाठी मधमाशी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजच्या दिवशी मधमाशीप्रेमी एकत्र येऊन हा मधुमहोत्सव साजरा करतात. मधमाश्यांची रंगीत चित्रे व इतर साहित्याची सजावट केली जाते, विविध व्याख्याने, चर्चासत्रे, प्रदर्शने, मधापासून बनविलेल्या विविध पदार्थांची प्रदर्शने आयोजित करून मधमाशीपालनाचे महत्त्व लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला जातो.

सुनील पोकरे, ७३८५२८९७०९

(लेखक पुणे येथील केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त सहायक संचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com