
डॉ. भगवानराव मा. कापसे
Mango Orchard Management: मारे पंधरा वर्षांपूर्वी महाराष्ट्रासह जवळच्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्येही केसर आंब्याची अतिघन लागवड सुरू झाली. जुन्या शेतकऱ्यांच्या बागेतून येणाऱ्या उत्पादनाचे प्रमाण लक्षात आल्याने अन्य शेतकऱ्यांचाही कल अतिघन लागवडीकडे वाढत आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत नवीन आंबा लागवडीचा वेग वाढला असून, नव्या बागा मोठ्या प्रमाणात दिसून येतात. बहुतेक बागांमध्ये दोन झाडातील अंतर चार ते पाच फूट आणि ओळीतील अंतर बारा ते पंधरा फूट या अंतरावर ठेवले गेले आहे. अशा नवीन लागवडीच्या पहिल्या एक दोन वर्षांतील बागांमध्ये या उन्हाळ्यामध्ये कोणती काळजी घ्यावी, याची माहिती घेऊ.
कलम जोड
नवीन लागवडीवेळी आपण कलमाच्या बाजूला आणखी तीन कोयी लावलेल्या असतील. त्यांची रोपे उगवून आल्यानंतर ती कलमाला जोडली असतील. मात्र ती जोडलेली नसल्यास ती किंवा काही ठिकाणी जोडायची राहिलेली असल्यास ती कलमाला लगेच जोडून घ्यावीत. हे काम शक्यतो कुशल व्यक्ती किंवा प्रशिक्षित माळ्याकडून करून घ्यावे.
छाटणी
बागेमध्ये आपण पहिली छाटणी ५० सेंटिमीटरवर घेतलेली असेल. मात्र ज्यांच्याकडे ही छाटणी झालेली नाही, त्यांनी उन्हाळ्यातील वाढत्या तापमान व उष्णतेच्या काळात ती करणे टाळावे. साधारणतः २० ते २५ मेच्या दरम्यान मॉन्सूनपूर्व पावसाच्या काळात तापमान थोडे कमी होते आणि एखादा पाऊस झालेला असल्यास वातावरणातील आर्द्रताही वाढलेली असते, अशा काळात रोपांच्या पन्नास सें.मी. अंतरावर पहिली छाटणी करून घ्यावी.
गेल्या वर्षी लागवड केलेल्या बागेमध्ये ही ५० सें.मी. वरील पहिली छाटणी झाल्यानंतर आता त्यावर वाढलेल्यापैकी तीन मजबूत फांद्या वाढू दिल्या असतील. या तीन फांद्यावर जर ४० ते ५० सें.मी. इतक्या वाढल्या असतील तर त्यावरही कट घ्यावा. त्यानंतर वाढलेल्या फांद्यापैकी पुन्हा तीन फांद्या ठेवायच्या आहेत. अशा प्रकारे एकास तीन, तिनास नऊ, नवास २७ या प्रमाणे तिसऱ्या वर्षी सर्वसाधारणपणे २७ फळफांद्या आल्यास एकदम उत्तम होईल.
आधार
पहिल्या वर्षीच्या कलमांना लागवडीनंतर लगेच आधार द्यावा. आधार दिलेला नसल्यास तातडीने चांगल्या दणकट काठ्या कलमाशेजारी रोवून घ्याव्यात. या काठ्यांना कलमांच्या उंचीनुसार एक किंवा दोन ठिकाणी हलके बांधून घ्यावे. काठी रोवण्यापूर्वी काठीला खालील बाजूस डांबर लावून घ्यावे, म्हणजे जमिनीत गाडला गेलेला काठीचा भाग लवकर कुजणार नाही.
सावली करणे
नवीन लागवड केलेल्या कलमाच्या बाजूला फेब्रुवारी महिन्यामध्ये नऊ इंचाच्या अंतरावर गोल अशी रांगोळी पद्धतीने तागाची लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांनी ती केलेली नसेल, ते अजूनही तागाची लागवड करू शकतात. या दिवसात ताग फक्त दोन अडीच फूट उंचीपर्यंत वाढून कलमांना व त्यांच्या मुळाच्या परिसरातील सावली देतो. हा ताग पावसाळा सुरू होईपर्यंत तसाच राहू द्यावा. नंतर तो जमिनीत गाडून घेतल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.
आच्छादन
कलमांभोवती बहुतेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय आच्छादन केलेले असेलच. मात्र ज्यांनी अद्याप सेंद्रिय आच्छादन केलेले नाही, त्यांनी उसाचे पाचट, गव्हाचा भुस्सा, वाळलेले गवत किंवा भाताचे तणस अशा कोणत्याही उपलब्ध सेंद्रिय घटकांचे आच्छादन कलमाभोवती दीड दोन फूट गोलाकार करून घ्यावे. या आच्छादनाची जाडी निदान तीन-चार इंच असावी. हे आच्छादन करताच त्यावर बाजूने खोऱ्याने थोडीशी माती टाकून घ्यावी, म्हणजे वाहत्या हवेने उडणार नाही. अशा आच्छादनामुळे पाणी कमी लागतेच, परंतु मुळाच्या परिसरातील मातीचे तापमानही फारसे वाढत नाही. परिणामी पांढरी मुळे वाढून चांगली कार्यरत झाडाला अन्नद्रव्याची उपलब्धता वाढू शकते. मात्र आच्छादनामध्ये वाळवीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी शिफारशीत कीडनाशकाची (क्लोरपायरिफॉस ३ मिलि प्रति लिटर - ॲग्रेस्को शिफारस) एखादी फवारणी नक्की घ्यावी.
आंतरपीक
नवीन लागवड केलेल्या आंबा बागेत पहिले दोन-तीन वर्षे आपण खरिपात किंवा रब्बी आंतरपीक घेणे हे चांगलेच असते. मात्र पाण्याची उपलब्धता असल्यास मार्च - एप्रिल - मे या काळातही बागेमध्ये कमी उंचीचे आंतरपीक घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे बागेमध्ये गारवा राहून पिकाची वाढ अतिशय चांगली होण्यास मदत होते. काही शेतकऱ्यांनी आताच कलमाच्या बाजूला ठिबकच्या खाली चार बाजूला चार टरबूज बिया टाकून आंतरपीक घेतलेले आहे. त्यांचा वेल वाढल्यावर त्या दोन्ही ओळींच्या मध्ये पसरवून घ्याव्यात. परिणामी, त्यांच्या पानांची सावली पसरून फळांचे उत्पादनही मिळते.
आंतरमशागत
औताच्या साह्याने आंतरमशागत करताना झाडांना व त्यांच्या मुळांचा कोणत्याही प्रकारे इजा होणार नाही, याकडे लक्ष द्यावे.
कुंपण
तिसऱ्या वर्षापासून बागेपासून चांगले उत्पन्न मिळवण्याची आपली अपेक्षा नक्कीच असते. अशा वेळी बागेच्या संरक्षणासाठी कुंपण करण्याकडे दुर्लक्ष करणे परवडत नाही. कारण बागेला वन्यप्राणी उदा. गवे, रानडुक्करे, हरणे, सांबर इ. किंवा भटके पाळीव प्राणी यांच्यामुळे नुकसान होऊ शकते. असा त्रास टाळण्यासाठी किमान तारेचे तरी कुंपण करून घ्यावे.
वारा प्रतिबंधक झाडांची लागवड
मराठवाड्यासह अन्य भागांमध्ये उन्हाळा हा अतिशय कोरडा आणि ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाचा सातत्याने राहतो. या उष्ण वाऱ्यांपासून बागेचे व पुढे संभाव्य फळांचे नुकसान होऊ शकते. हे उष्ण वाहते बागेतील ओलावाही उडवून नेते. म्हणून सिंचनासाठी पाणीही अधिक लागते. हे प्रमाण कमी करण्यासाठी वारा प्रतिबंधक म्हणून बागेभोवती उंच वाढणाऱ्या आणि सदाहरित अशा वृक्षांची लागवड करून घ्यावी. उदा. सरू, बांबू, महागणी इ. मुळे खोलवर जाण्यासाठीचे तंत्र (Root dipening technique) नवीन लागवड केलेल्या आंबा कलमामध्ये ठिबकने दररोज थोडे थोडे पाणी दिले जाते. हे पाणी मातीच्या दीड -दोन फुटांच्या खाली पाणी फारसे जात नाही.
परिणामी, नवीन कलमांच्या मुळांची वाढही या खोलीपर्यंत होते. ती अधिक खोलवर जात नाही. त्यासाठी दररोज दहा लिटर पाणी द्यायच असेल, तर त्या ऐवजी आठ, दहा दिवसांत एकदाच ८० ते ९० लिटर पाणी द्यावे. म्हणजे हा ओलावा अधिक ओलवर उतरेल. परत आठ-दहा दिवसांत वरील थरातील पाणी कमी झाल्यामुळे मुळेही या ओलाव्यासोबत वाढत खोल जातील.
विशेषतः कलमांच्या सुरुवातीच्या काळात (पहिल्या व दुसऱ्या वर्षी) हे तंत्र वापरल्यास अधिक फायदा होतो. मात्र हे तंत्र फळधारणा सुरू झाल्यानंतर फारसे फायद्याचे ठरत नाही.
खते
कलमांच्या तीन बाजूला जमिनीवर आठ, नऊ इंच खोलीची व सहा इंच व्यासाची छिद्रे काठीने करावीत. त्या छिद्रामध्ये ५० ग्रॅम युरिया, १०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, ५० ग्रॅम पोटॅश आणि अडीचशे ग्रॅम निंबोळी पावडर यांचे मिश्रण समप्रमाणात विभागून टाकावे. त्यानंतर ही छिद्रे मातीने बुजवून घ्यावीत. यासोबतच बेळापत्रकाप्रमाणे ठिबकद्वारे सुरू असलेली खते सुरू ठेवावीत. (वेळापत्रक तक्ता १ मध्ये दिलेले आहे.)
- डॉ भगवानराव मा. कापसे, ९४२२२९३४१९ (लेखक निवृत्त फळबाग शास्त्रज्ञ आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.