Mango Crop Management : हापूसचा दर्जा राखण्यावर अधिक भर

Shetkari Niyojan : ग्राहकांना दर्जेदार हापूस मिळावा यासाठी रासायनिक खतांचा कमी वापर आणि नैसर्गिक पद्धतीवर दर्जेदार आंबा उत्पादन घेण्याचा प्रयत्न रत्नागिरीतील बागायतदार जयवंत बिर्जे करतात. या वर्षी उन्हाचा कडाका लक्षात घेऊन त्यांनी मागील महिन्यापासूनच काटेकोर सिंचनावर भर दिली आहे.
Mango Crop Management
Mango Crop Management Agrowon
Published on
Updated on

शेतकरी नियोजन । हापूस आंबा

शेतकरी ः जयवंत महादेव बिर्जे

गाव ः मालगुंड, ता.जि. रत्नागिरी

एकूण शेती ः १५ एकर

एकूण कलमे ः १७५५

Alphanso Mango : ग्राहकांना दर्जेदार हापूस मिळावा यासाठी रासायनिक खतांचा कमी वापर आणि नैसर्गिक पद्धतीवर दर्जेदार आंबा उत्पादन घेण्याचा प्रयत्न रत्नागिरीतील बागायतदार जयवंत बिर्जे करतात. या वर्षी उन्हाचा कडाका लक्षात घेऊन त्यांनी मागील महिन्यापासूनच काटेकोर सिंचनावर भर दिली आहे. जेणेकरून कलमांवर उष्म्याचा त्रास कमी प्रमाणात जाणवेल. आंबा बागेमध्ये रासायनिक निविष्ठांचा जास्त वापर केला, तर वाढत्या उष्णतेने कलमांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेला आणि पिकविलेला आंबा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असतो.

श्री. बिर्जे यांची स्वतःकडील अडीच एकरांत ५५ कलमे, तर करारावर घेतलेल्या बागेत सुमारे १७०० कलमे घेतली आहेत. या सर्व कलमांची जोपासना करताना सेंद्रिय निविष्ठांवर अधिक भर दिला जातो. त्या माध्यमातून फळांचा दर्जा राखणे शक्य होते. त्यामुळे बाजारात दरही चांगले मिळतात, असे जयवंत बिर्जे यांनी सांगितले.

Mango Crop Management
Mango Farming : आंब्याचा दर्जा राखण्यावर भर

व्यवस्थापनातील बाबी

मे महिन्याच्या अखेरीपासून बागेतील कामांचे व्यवस्थापन करण्यास सुरुवात केली जाते. कलमांच्या वयानुसार आणि आकारमानानुसार युरिया, एसएसपी आणि १०ः२६ः२६ या खतांच्या मात्रा दिल्या जातात. प्रत्येक कलमांची खतमात्रा ही निश्चित केलेली असते. त्यानुसार कलमनिहाय खतमात्रा दिली जाते. जून महिन्यात कामगार उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे खते देण्याचे काम लवकरात लवकर करण्याचे नियोजन केले जाते.

ऑगस्ट महिन्यात टाळ-माती केली जाते. पावसाळ्याच्या कालावधीत उगवलेले गवत, पालापाचोळा गोळा करून बागेची साफसफाई केली जाते. त्याचवेळी प्रत्येक कलमाला २५ किलो गांडूळ खत दिले जाते. सेंद्रिय खतांमुळे कलमांच्या पानांना चमकी येतो, लवकर पालवी येते. शिवाय पानगळही होत नाही.

दसरा झाल्यानंतर पुन्हा बागेची स्वच्छता केली जाते.

सप्टेंबर महिन्यात पालवी येण्यास सुरवात होते. त्यानंतर काही कालावधीत मोहोर येतो. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रासायनिक फवारणीचे नियोजन केले जाते. कलमाच्या बुंध्यापासून शेंड्यापर्यंत संपूर्ण कलम भिजेल या पद्धतीने रासायनिक फवारणी केली जाते. जेणेकरून बागेची साफसफाई झाल्यानंतर कीड-रोगांच्या अवस्था नष्ट होतील. नोव्हेंबर महिन्यात दुसरी रासायनिक फवारणी घेतली जाते.

मागील कामकाज

यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस वातावरणात झालेल्या बदलांमुळे कलमांना मोहोर येण्याची प्रक्रिया काहीशी विलंबाने झाली.

डिसेंबर अखेर ते जानेवारी पहिला आठवडा या कालावधीत पहिल्या टप्प्यातील मोहरातून फळधारणा सुरू झाली. मात्र तीही कमी प्रमाणात होती. त्यामुळे यंदा उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.

या कालावधीत वाटाणा आकाराची फळे

दिसू लागल्यावर सेटिंग व्यवस्थित

होण्यासाठी जिब्रेलिक ॲसिडची फवारणी घेण्यात आली.

फेब्रुवारी महिन्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला होता. त्यामुळे बारीक कणी पिवळी पडून गळ होऊ लागली. त्यासाठी बागेत उपाययोजनांवर भर दिला. आठवड्यातून दोन वेळा प्रत्येक कलमास ३० ते ३५ लिटर पाणी देण्यास सुरवात केली. या पद्धतीने आतापर्यंत पाच वेळा पाणी दिले आहे. यामुळे फळगळ रोखण्यात यश मिळाले.

सुरुवातीच्या काळात फुलकिडींचा प्रादुर्भाव दिसून येत होता. त्यासाठी मोहोर आलेल्या फांद्या जमिनीला चिकटून राहणार नाहीत याची काळजी घेतली. फांद्यांची त्याप्रमाणे छाटणीही केली. तसेच मोहराची हलवणी केल्यामुळे फुलकिडी जमिनीवर पडल्या.

त्यानंतर कलमांची हलवणी करण्याचे काम सुरू केले. जेणेकरून सुकलेला मोहोर गळून पडण्यास मदत होऊन झाडावरील कैरीची वाढ व्यवस्थित होण्यास मदत मिळेल. तसेच सेंद्रिय घटकांच्या फवारणीवर भर दिला आहे. जेणेकरून फळांची गुणवत्ता आणि दर्जा उत्तम राखला जाईल.

आगामी नियोजन

पुढील आठवड्यात २५ मार्चच्या दरम्यान आंबा काढणी योग्य होईल असा अंदाज आहे. सध्या उन्हाची तीव्रता पाहता सकाळी किंवा सायंकाळच्या सत्रात आंबा तोडणी करण्यात येईल. काढलेला आंबा त्वरित सावलीत ठेवण्यावर भर असतो.

काढणी करताना फळाला देठ राहील याची काळजी घेतली जाते. त्यासाठी झेल्याचा ब्लेड वारंवार बदलणे, जाळे व्यवस्थित ठेवणे, दोन किंवा तीनच फळांची एकावेळी काढणी करणे या प्रमाणे काळजी घेतली जाईल. देठ तुटलेला आंबा झेल्यात किंवा टपामध्ये राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. चिक आलेले, डागाळलेली फळे बाजूला काढली जातील. जेणेकरून अन्य आंबा फळांचा दर्जा खालावणार नाही.

काढणीनंतर फळांची प्रतवारी करण्यावर भर दिला जाईल. साधारणपणे ३५० ते ४१० ग्रॅम, ३०० ते ३५० ग्रॅम, २५० ते ३०० ग्रॅम, २०० ते २५० ग्रॅम, १५० ते २०० ग्रॅम अशी प्रतवारी केली जाईल.

साधारणपणे ४ ते ८ डझनाच्या पेट्या भरण्यात येतील. प्रतवारीनंतर आंबा पिकविण्यासाठी गवतामध्ये तीन थरांत ठेवला जाईल. अशा पद्धतीने साधारण ८ ते ११ दिवसांत आंबा पिकतो. नैसर्गिकरित्या आंबा पिकवण्यावर भर दिला जातो. पिकलेला आंबा पेटीत भरून त्वरित विक्रीसाठी पाठविला जातो.

आंबा विक्रीसाठी मुंबई, पुण्यासह अहमदाबाद, नागपूर, बडोदा, इंदूर या ठिकाणी पेट्या पाठविल्या जातात. आंबा नैसर्गिकरित्या पिकवल्यामुळे पाच डझनाच्या पेटीला गतवर्षी सर्वसाधारण २४०० रुपये इतका दर मिळाला होता. मागील वर्षी सुमारे १५०० पेटी आंबा उत्पादन मिळाले होते. मात्र यावर्षी वातावरणातील बदलांमुळे १००० पेटी आंबा उत्पादन येईल अशी शक्यता आहे, असे जयवंत ब्रिर्जे सांगतात.

- जयवंत बिर्जे, ८४४६३२८१७१, ९४२२६२५३३०

(शब्दांकन ः राजेश कळंबटे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com